एकतेच्या बळावर आपण कोरोनाला हरवू या अन् आपण सर्वांनी मिळून लसीकरण करूया
कुटुंबातील कर्ते व्यक्तींनी आपल्या घरातील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे ः सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांचे आवाहन लातूर ः गेल्या दिड वर्षापासून कोरोना या जागतीक महामारीने सर्वांनाच हतबल करून सोडले आहे. या महामारीसमोर सर्व देशांनी नांगी टाकली असून अशाही परिस्थिती कोरोनाशी लढा देतांना सर्वच देशाची यंत्रणा अपुरी पडत आहे. आजपर्यंत जगावर एकाचवेळेस अशी कुठलीच महामारी आली नव्हती. आणि तीही एवढ्या मोठ्या कालावधीपर्यंत राहिली नाही. परंतू या कोरोना महामारीने सर्व आर्थिक गणिते बिघडवून टाकल्याने देशाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट ही मोठ्या झपाट्याने आपला फैलाव करत असल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यात कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज लोकांना या महामारीशी तोंड देतांना नाकी नऊ येत आहेत. तरीपण हि महामारी कांही संपण्याचे नाव घेत नाही. लोक सरकारने दिलेले आदेश पाळत आहेत परंतू आपल्यातीलच कांही महाभाग हे सर्व नियम झुगारून लावतात. त्यामुळे कोरोना सारखा आजार पसरतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज कोरोनाची दुसरी लाट ही महाभयंकर लाटेच्या स्वरूपात आली आहे. या महामारीमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून रूग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. आजपर्यंत कधी नव्हे ती आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे. तरीही या महामारीसमोर ती अपुरीच पडतांना दिसत आहे. रूग्णांना वेळेवर रुग्णालयात रेमडीसीवीर इंजेक्शन भेटत नाही, ना ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाने मृत्युचा दर वाढला असून पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत मरणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वेळीच आपण सजग राहिलो नाही तर येणार्या काळात कोरोनाला रोखणे कठीण होऊन बसेल. ही जर परिस्थिती लवकरात लवकर निवळली नाहीतर येणार्या काळात अत्यंत वाईट दिवस भारताला येतील. आज आपण रुग्णालयातील पेशंटला ऑक्सिजन देण्यासाठी आपली यंत्रणा कमी पडत आहे. पेशंट वाढल्यामुळे हा तुटवडा जाणवत आहे. देशातील सर्व भागातून ऑक्सिजन गोळा केले जात आहे. आज विमानाने ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. माणूस हा आजपर्यंत स्वतःची काळजी न घेता पैशाच्या पाठिमागे लागून आरोग्याची हेळसांड माणसाने केली आहे. या कोरोना महामारीमध्ये पैशापेक्षाही आरोग्याला महत्व आहे. या महामारीने एक शिकविले ते म्हणजे “जान है तो जहाँन है.”
या महामारीच्या काळात जे कोणी अवैध मार्गाने आपल्या पोळया भाजून निघत आहेत. लोकांचा तळतळाटीचा पैसा गोळा करत आहेत अशा लोकांनी याप्रसंगी एक समाजाप्रती आपुलकीची भावना दाखवुन असे प्रकार थांबवायला हवेत. ही महामारी आज आपल्यातीलच एखाद्या कुटूंबवर आली आहे. ती उद्या तुमच्यावरही येवू शकते याचा विचार करूनच त्यांनी या काळात हे गोरख धंदे करावेत एवढेच आम्हाला याठिकाणी म्हणावेसे वाटते.
कोरोनापासून वाचयाचे असेल तर लसीकरण करून घेणे हे गरजेचे आहे. सर्वच देशांनी लसीकरणास सुरूवात केली असून सर्वांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळते. आतापर्यंत माणूस हा अर्विभावात होता की माझ्याकडे पैसे आहे. मी पैशाच्यावर जोरावर सर्व कांही मला मिळू शकते परंतू या कोरोनाने पैशालाही हरवले आहे. ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाही अशा दोघांनाही आज रूग्णालयात उपचारासाठी संघर्ष करावा लागत आहे. या कोरोनाच्या काळात माणुसकीच महत्वाची आहे. एकमेकाला मदत करणे, एकमेकाला धीर देणे, पाठबळ देणे, एकजुट होवून आपण या कोरोना महामारीच्या काळात संघर्ष केला पाहिजे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.