कोरोनाविरुद्धच्या लढाईस सातासमुद्रापारचे बळ महापौरांचा परदेशातील लातूरकरांशी संवाद आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सहकार्याचे आवाहन

 

कोरोनाविरुद्धच्या लढाईस सातासमुद्रापारचे बळ 

महापौरांचा परदेशातील लातूरकरांशी संवाद

आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सहकार्याचे आवाहन




    लातूर/प्रतिनिधी: प्रत्येक लातुरकर सुरक्षित रहावा, आरोग्यदृष्ट्या सुदृढ रहावा यासाठी लातूर महानगरपालिका सक्षमपणे कार्यरत आहे.  अशीच काहीशी भावना परदेशात राहणाऱ्या लातुरकर मंडळींचीही आहे. त्यामुळेच
कोरोनाविरुद्धच्या या लढाईला आता सातासमुद्रापारचे बळ मिळणार आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी परदेशात राहणाऱ्या लातुरकरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी मदत करण्याचा मनोदय या परदेशस्थ लातुरकरांनी व्यक्त केला आहे.
   लातूर शहरातील कोरोना बाधित व्यक्तींकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.त्या अधिक बळकट करण्याकरिता आपणही पुढाकार घ्यावा असे आवाहन  महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी परदेशात राहणाऱ्या या लातूरकरांना केले होते. 
झूम मिटींग द्वारे साधलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून दुबई,मस्कत,जर्मनी,
अमेरिका,सिंगापूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या आपल्या लातूरकरांशी संवाद साधता आला.मान्यवर वैद्यकीय तज्ञ देखील या संवादात जोडले गेले होते. त्यांनी अतिशय उपयुक्त सूचना मांडल्या.
सध्याची कोरोनाची परिस्थिती तसेच भविष्यात येऊ शकणारी तिसरी लाट, यामध्ये लहान मुलांना असणारा धोका तसेच नव्याने निर्माण झालेल्या म्युकरमायकोसिस या संसर्गाचा धोका अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.
   या संवादाकरिता दुबई स्थित हरीश दुनाखे व जर्मनी येथे स्थायिक मनोज येलगटे यांनी पुढाकार घेतला.  आपल्या माणसांशी साधलेला संवाद ऊर्जा देणारा आहे.त्यांनी गाठलेला हा उत्तुंग यशाचा पल्ला आम्हा लातूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.सातासमुद्रा पार असून देखील या सर्वांचे लातूरशी घट्ट नाते जोडले आहे आणि यातूनच अशा संकट काळात त्यांनी लातूकरांच्या आरोग्य सेवेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. 
 या अनोख्या चर्चेमध्ये डॉ.नरेंद्र काळे,डॉ.सुजित निलेगावकर, डॉ.उन्मेष सेलूकर,डॉ.विष्णू बिराजदार, डॉ.अनय देशमुख, अर्चना अमलापुरे, डॉ.नामदेव सूर्यवंशी, नरेंद्र शिवणे, प्रमोद चिंचनसुरे, प्रविण शास्त्री, संगीता शिंदे, शेखर जोशी , शुभांगी जोशी आदी मान्यवर सहभागी झाले होते.

घार उडे आकाशी ....
   "घार उडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी" ही म्हण या प्रसंगाला तंतोतंत लागू पडते.विविध कारणांनी हे लातुरकर परदेशात आहेत.अनेकांचे तर संपूर्ण कुटूंब परदेशातच आहे.त्यांचे लातुरात कोणीही नाही.पण आपली जन्मभूमी व कर्मभुमीला ते विसरू शकत नाहीत.या भुमीशी त्यांचे नाते जोडले गेलेले आहे.कधीही न तुटणारे हे नाते आहे.याच भावनेतून या मंडळींनी सहकार्याचा हात पुढे केला आहे.या माध्यमातून अद्ययावत माहिती,तंत्रज्ञान तसेच आर्थिक स्वरुपात मदत मिळू शकणार आहे.
जगभरात वेळोवेळी होणारे बदल,आजाराचे बदलते स्वरूप आणि त्यावर केले जाणारे उपचार आपल्याला लवकरात लवकर ज्ञात होणार आहेत.हे पाठबळ अत्यंत महत्वाचे असल्याचे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या