डॉ.अरुणा देवधर यांची रुग्णसेवा सदनला २५ लाख रुपयांची देणगी
लातूर/प्रतिनिधी:येथील रुग्ण सेवा सदन उभारणीसाठी विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अध्यक्षा डॉ.सौ.अरुणा महेश देवधर यांनी त्यांचे काका व काकू स्व.अनंत सदाशिव ओक व स्व.लीला अनंत ओक (रोहा, जि.रायगड )यांच्या स्मरणार्थ व्यक्तिगत देणगी म्हणून २५ लाख रुपयांचा धनादेश रुग्णसेवा प्रकल्पाचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे व पद्मभूषण डॉ.अशोकराव कुकडे काका यांच्याकडे सुपुर्द केला.
कर्करोगी रुग्णांना लातुरात मिळत असलेल्या योग्य उपचारामुळे धोका कमी झाला असला तरी रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे.या रुग्णांची विवेकानंद कँसर हॉस्पिटलमध्ये रेडिएशन व केमोथेरपीची सोय आहे. त्यासाठी रुग्णांना साधारण ८ ते ३०दिवस दररोज उपचारासाठी १ तास यावे लागते.असे १०० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दररोज येत आहेत.या रुग्णांची ये-जा करण्यात होणारी हेळसांड थांबवण्यासाठी लातूरचे सुपुत्र व टाटा कँसर हॉस्पिटलचे संचालक डॉ.कैलास शर्मा यांच्या सूचनेनुसार जलयुक्त लातूरच्या टीमने भव्य असे "रुग्णसेवासदन" लोकसहभागातून बांधण्याचा संकल्प केला आहे.विवेकानंद रुग्णालयाच्या अंतर्गतच रुग्णसेवा सदन समितीच्या माध्यमातून हे कार्य चालू असून १५० रुग्ण व प्रत्येकी एक नातेवाईक यांची निवास व भोजन व्यवस्था नाममात्र दरात करण्यात येणार आहे .
यासाठी MIDC मधील विवेकानंद कँसर हॉस्पिटल शेजारी दोन एकर जागा MIDC कडून घेतली असून या प्रकल्पात १२ डॉर्मेटरी, २४ जनरल रूम व ३६ स्पेशल रूम असणार आहेत.याबरोबरच अत्याधुनिक यंत्रणा असलेले २५०० चौरस फुटांचे सभागृह व १५०० चौरस फुटचा भोजन कक्ष असणार आहे.
या प्रकल्पाचे तीन मजली बांधकाम ८० हजार चौरस फुटमध्ये होणार आहे.एक एकर जागा बाग बगीचासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ९ कोटी रुपये खर्च येणार असून हा सर्व निधी लोकसहभागातून उभारला जाणार आहे.याकामी समाजातून उत्तम प्रतिसाद मिळत असून बांधकाम प्रगतीपथावर आहे. तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून गिलावा,प्लंबिंग आदी कामे सुरू आहेत.याच कार्यक्रमात डॉ.सौ.अरुणा देवधर यांनी मातोश्री वृद्धाश्रमासाठी २ लाख रुपयांचा निधी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ.महेश देवधर यांच्याकडे सुपूर्द केला.
डॉ.अशोकराव कुकडे काका यांच्या निवासस्थानी झालेल्या या छोट्याशा कार्यक्रमास डॉ.सौ. ज्योत्स्ना कुकडे,अनिल अंधोरीकर, रुग्ण सेवा सदनचे सहसचिव शिवदास मिटकरी यांची उपस्थिती होती.
कोविड केअर सेंटर सुरू करणार...
रुग्णसेवा सदनच्या पहिल्या मजल्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.लवकरात लवकर हे काम पूर्ण करून तेथे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. समाजाची गरज ओळखून किमान ७५ रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे बी.बी.ठोंबरे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
छायाचित्र:शाम भट्टड
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.