पाशा पटेल यांच्या हस्ते बुधोडा येथे बांबू लागवडीचा शुभारंभ वर्षभरात ५० एकरावर होणार लागवड

 


पाशा पटेल यांच्या हस्ते बुधोडा येथे बांबू लागवडीचा शुभारंभ 

वर्षभरात ५० एकरावर होणार लागवड








 लातूर/प्रतिनिधी:लातूर व परिसरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सुनील कोचेटा यांनी लातूर-औसा महामार्गावर बुधोडा येथे ५० एकरावर बांबू लागवड करण्याचा निर्धार केला आहे. पहिल्या टप्प्यात १ हेक्‍टर क्षेत्रावर बांबू लागवड केली जात असून महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
  सुनील कोचेटा यांची इथेनॉल इंडस्ट्री आहे.यात बॉयलरसाठी त्यांना दररोज ४० टन दगडी कोळसा लागतो.दगडी कोळशाऐवजी बांबूचा इंधन म्हणून वापर केला तर त्यात ३० टक्के बचत होते.त्यामुळे कोचेटा यांनी ५० एकरमध्ये बांबू लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
   या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी पाशा पटेल यांच्यासह सुनील कोचेटा, संजीव करपे,द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष प्रा.एन.एच.कनामे, आनंद अग्रोया यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
   सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या निर्णयानुसार बॉयलरसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनामध्ये १० टक्के ग्रीन एनर्जीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर मोठ्या प्रमाणात बांबूची इंधन म्हणून गरज लागणार आहे.लातूरसह इतर ठिकाणी असणाऱ्या कीर्ती गोल्ड या केवळ एकाच कंपनीला दररोज ५०० टन दगडी कोळसा लागतो. याशिवाय परळी येथे वीज निर्मिती करणाऱ्या थर्मलसाठीही मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला जातो.न्यायालयीन निर्णयानुसार १० टक्के ग्रीन एनर्जी म्हणून बांबूचा वापर करण्याचे धोरण अवलंबले तर त्यासाठी मराठवाड्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी अर्ध्या भागावर बांबूची लागवड करावी लागणार आहे.
  दगडी कोळसा जाळल्यानंतर ३० टक्के राख शिल्लक राहते.बांबू मधून मात्र केवळ ३टक्के राख जमा होते.बांबूचा वापर केला तर खर्चात ३० टक्के व प्रदूषणात ९० टक्के कमी होणार आहे.या सर्व बाबींचा विचार करून सीए नितीन कोचेटा यांनी कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूची लागवड करण्याचा निर्धार केला आहे.बुधोडा येथे डेमो प्रोजेक्ट म्हणून त्यांनी अडीच एकर लागवड सुरू केली असून याचा शुभारंभ पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.
   याप्रसंगी मार्गदर्शन करताना पाशा पटेल म्हणाले की,२०१५ झालेल्या पॅरिस करारात दगडी कोळसा व लाकूड न जाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
टप्प्याटप्प्याने त्याचा वापर कमी केला जात आहे.
आगामी काही वर्षात कोळशासह डिझेल,पेट्रोल व प्लास्टिक बंद करण्याबाबत या करारात एकमत झाले आहे.मागील ३ वर्षांपासून आम्ही बांबू लागवडीची चळवळ सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांबूला झाड या व्याख्येतून गवतात समाविष्ट केले आहे.
त्यामुळे बांबू तोडण्यास व जाळण्यासाठी परवानगी आवश्यक नाही.नितीन कोचेटा,आनंद अग्रोया,
प्रा.कनामे यांच्यासारख्या मंडळींमुळे या चळवळीला अधिक बळ मिळणार असल्याचेही पाशा पटेल यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या