संगम हायटेक नर्सरीचे संगमेश्वर बोमणे यांचे निधन.
लातूर-
आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत पर्यावरणाचा व हरित लातूरचा ध्यास घेतलेले संगम हायटेक नर्सरीचे उमदे उद्योजक व ऑल इंडिया नर्सरीमेन अससोसिएशन चे संचालक व लातूर रोटरी क्लबचे सचिव संगमेश्वर महालिंगप्पा बोमणे यांचे रविवारी सायंकाळी मुंबईत उपचार सुरु असताना निधन झाले.ते 36 वर्षाचे होते.
गेल्या सव्वा महिन्यापासून मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधे ते कोरोनावर उपचार घेत होते.दुर्दैव हे की,गेल्या महिन्यातच त्यांचे वडील महालिंगप्पा व त्यांची आई मुद्रिकाबाई यांचे कोरोनामुळेच लातूर येथे निधन झाले होते.आपल्या अजोड कष्टाच्या व मितभाषी स्वभावाच्या आणि नम्रतेच्या जोरावर संगमेश्वर बोमणे यांनी शून्यातून विश्व उभे केले होते.प्रतिकूल परिस्थिवर मात करीत त्यांनी स्वतःच्या जीवनाचीही बाग फुलविली होती.परंतु नियतीने घाला घातला आणि संगमेश्वर यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
संगम फाऊंडेशन इंडिया चे अध्यक्ष,लातूर रोटरी क्लबचे सचिव,माध्यम,वनश्री मित्र मंडळाचे सदस्य,लातूर वृक्ष चळवळीचे कोअर कमिटी सदस्य आणि लातूर डेअरी फार्मचे चेअरमन अशा विविध संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.त्यांना महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार,समाजभूषण पुरस्कार,शिवरत्न पुरस्कार,दीपस्तंभ पुरस्कार आदी अनेक पुरस्कार मिळाले.लोकमतच्या आयकॉन ऑफ लातूर ग्रंथातही त्यांच्यावरील लेखाचा समावेश होता.मांजरा साखर कारखाना परिसरातील नयनमनोहर उद्यान,दयानंद शिक्षण संस्थेचे हरित क्रिकेट स्टेडियम तसेच साई मंदिर,गोल्ड क्रेस्ट हायस्कुल,जिल्हा परिषद,माऊंट लिटेरा झी स्कुल,औसा व निलंगा नगरपरिषद,मराठवाडा कृषी विद्यापीठ आदी अनेक उद्याने त्यांनी विकसित केली.
त्यांच्या पश्चात पत्नी पूजा,एक कन्या,एक मुलगा,बंधू अमोल,एक बहीण,भावजय असा परिवार आहे.स्व.संगमेश्वर यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळीच मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
*संगमेश्वर बोमणे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि* *धक्कादायक*
*बोमणे यांच्या आकस्मित जाण्याने लातूरच्या वृक्ष* *चळवळीचे न भरून निघणारे नुकसान*
- ना.अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी) लातूर येथील संगम हायटेक नर्सरीचे प्रमुख संगमेश्वर बोमणे या तरूण उद्योजकाचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि व्यक्तिशः माझ्यासाठी मनस्वी दु:खदायक आहे. अशा शब्दात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
ना.अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, संगम हायटेक नर्सरीची अगदी शुन्यातुन सुरूवात करून, तीला नावारूपाला आणणारे संगमेश्वर बोमणे यांचे वृक्ष चळवळीतील योगदानही मोठे आहे. काही दिवसांपुर्वी कोरोनामुळे संगमेश्वर यांचे वडील महालिंगअप्पा आणि आई मुद्रिकाबाई या दोघांचेही निधन झाले होते. आता संगमेश्वर यांच्या निधनाचे वृत्त आले आहे. त्यामुळे बोमणे कुटुंबीयावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लातूर येथील एक होतकरू तरूण उद्योजक आणि लातूर येथील हरीत चळवळ वाढवण्याच्या योगदानामुळे त्यांच्याशी माझा वैयक्तिक पातळीवरही जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या आकस्मित जाण्याने आपले वैयक्तिक आणि लातूरच्या वृक्ष चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माझी भावना आहे.
बोमणे कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी ही प्रार्थना करीत आहे. असे शोकसंदेशात नमूद करून शेवटी पालकमंत्री ना देशमुख यांनी संगमेश्वर बोमणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे .
-------------------------------–------------
संगमेश्वर बोमणेंचे निधन अत्यंत वेदनादायी
***********************
लातूर येथे जिल्हाधिकारी पदावर रूजू झाल्यानंतर शासकीय निवासस्थानासमोरची संगम हायटेक नर्सरीची हिरवळ आल्हाददायक वाटायची. 30-32 वर्षे वय असलेला संगमेेश्वर बोमणे हा तरूण ही नर्सरी चालवतो हे तर अधिकच आश्चर्यकारक होते. काही दिवसांतच या नर्सरीला भेट दिली. ऑफिसबॉय म्हणून काम करीत असतानाच उद्योजक, व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्याची कमाल संगमेश्वर यांनी करून दाखवली होती, याचे मला विशेष कौतुक होते. लातूरमध्ये मनपाच्या आयुक्तपदाचा कार्यभार असताना लोकसहभागातून दुभाजकात झाडे लावण्याच्या उपक्रमात त्यांनी पुढाकार घेतला होता. तसेच दयानंद महाविद्यालयाच्या आवारात उभारलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये आणि ऑफिसर्स क्लबच्या आवारात त्यांनी हिरवळ फुलवली होती. माझ्या सूचनेवरून त्यांनी 'ट्री एम्बुलन्स' संकल्पना प्रत्यक्षात उतरवली होती. लातूर वृक्षच्या माध्यमातून मोठ्या ड्रममध्ये मोठी झाडे लावण्याच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
जिद्द, मेहनत, चिकाटी, प्रामाणिकता या गुणांच्या बळावर त्यांनी कमी वयात केलेली प्रगती कौतुकास्पद होती. काही दिवसांपूर्वीच ऊस रोप वाटिका सुरू केली होती. या सर्व माध्यमातून उद्योजक म्हणून प्रगती करतानाच त्यांनी अनेकांना रोजगार पुरवला होता. सतत काहितरी नवीन करण्याची ऊर्मी असलेले संगमेश्वर यांचे आज निधन झाले ही अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक बाब आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आई-वडिलांचेही निधन झाल्याचे कळाले. बोमणे कुटुंबियांवर झालेला हा आघात अत्यंत दुर्देवी आहे. त्यांच्या रूपाने लातूरने एक उद्योजक, व्यावसायिक, एक चांगला माणूस गमावला आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
जी. श्रीकांत (आयएएस),
सहआयुक्त, राज्य विक्रीकर विभाग,
औरंगाबाद.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.