सत्ताकेंद्र काबीज करण्यासाठी राजकीय रणनीती आखायला सुरुवात

 सत्ताकेंद्र काबीज करण्यासाठी राजकीय रणनीती आखायला सुरुवात , उस्मानाबाद जिला वार्तापत्र 

उस्मानाबाद शहर विकास आघाडीचा प्रयोग आगामी निवडणुकीत राबविला जाणार, 

उस्मानाबाद प्रतिनिधी अल्ताफ शेख, 






उस्मानाबाद नगर परिषदेच्या निवडणुकीला अजुन बराच कालावधी आहे. जिल्ह्याचे प्रमुख राजकीय सत्ताकेंद्र अशी ओळख असलेले हे सत्ताकेंद्र काबीज करण्यासाठी राजकीय रणनीती आखायला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद नगर परिषद निवडणुकीसाठी उस्मानाबाद शहर विकास आघाडीचा निर्णय पक्का असुन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात ही आघाडी स्थापन केली जाणार आहे. या आघाडीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी व इतर पक्षातील काही नेते सहभागी होतील असा दावा केला आहे. निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. शिवसेनेत अंतर्गत वाद टोकाला गेला असुन वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीत नेतृत्वाची पोकळी कायम असुन सक्षम नेतृत्वाचा उदय होऊ दिला नाही. शिवसेना राष्ट्रवादीत मतभेद कायम असुन राजकीय कुरघोडी सुरूच आहे. राणा पाटील यांच्यामुळे भाजपला अच्छे दिन आले असले तरी या नवीन शहर आघाडीच्या प्रयोगाला यश मिळणार का ? हे पाहावे लागेल. जनता वाऱ्यावर असून अनेक समस्या कायम आहेत तर नेत्यांना सत्तेची आतापासूनच स्वप्न पडत आहे. 


उस्मानाबाद शहरात डॉ पदमसिंह पाटील व त्यांचे पुत्र भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना मानणारा नगरसेवकांचा व कार्यकर्त्यांचा गट आहे. या सर्वासह इतर पक्षातील नाराज व उत्साही नेत्यांना एकत्र घेऊन उस्मानाबाद शहर विकास आघाडीचा प्रयोग आगामी निवडणुकीत राबविला जाणार आहे. पाटील कुटुंबाने भाजप प्रवेश केल्यानंतर उस्मानाबाद नगर परिषदेतील अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्याने तांत्रिक अडचणीमुळे ते राष्ट्रवादीत आहेत मात्र दिलसे ते पाटील कुटुंबासोबतच आहेत या सर्वांचे राजकीय पुनर्वसन या आघाडीच्या माध्यमातून केले जाणार आहे.


उस्मानाबाद शहरात डॉ पाटील यांचे वर्चस्व व वजन आजही कायम आहे मात्र त्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर राजकीय चित्र बदलले आहे. मुस्लिम भागात आजही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे वर्चस्व व नेते कार्यकर्ते यांची मोठी फळी आहे मात्र या भागात भाजपचे पक्ष चिन्ह असलेले कमळ फुलू शकत नाही याची जाणीव त्यांना आहे. जातीय समीकरण व बेरजेचे राजकरण करताना उस्मानाबाद शहरातील काही भागात शहर विकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो असा विश्वास असल्याने त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या शहर विकास आघाडीमुळे शहराची समीकरणे बदलणार असुन राजकारणाची खिचडी होणार आहेत. 


उस्मानाबाद नगर परिषदेवर सध्या नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या रूपाने शिवसेनेचे सत्ता आहे मात्र शिवसेनेत सध्या सुरु असलेल्या अंतर्गत सुप्त वाद व वयक्तिक मतभेदामुळे मोठा फटका बसु शकतो. उस्मानाबाद येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृह उदघाटनवेळी हा वाद प्रकर्षाने उघड झाला. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षांचे नाव उदघाटन कोनशीलेवर टाकण्यात आले नाही तसेच त्यांना व्यासपीठावरही मानाचे स्थान दिले गेले नाही, सत्ता असतानाच हा प्रकार जाणीव पूर्वक केल्याची चर्चा होत असून यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेनेत सध्याच्या काळात व्यवहार वाद चांगलाच रुजला व झपाट्याने वाढला असुन सत्ता असतानाही नेते कार्यकर्ते यांना विकास कामे करण्यासाठी नेत्यांना टक्केवारी द्यावी लागत असल्याने अनेक जण नाराज आहेत. सत्तेसाठी आयात,दलबदलू नेते व बाळासाहबांचे कट्टर शिवसैनिक अशी तिहेरी फळी कायम असून निष्ठावान शिवसैनिक नेहमीप्रमाणे दुर्लक्षित झाला आहे मात्र त्याच्यावरच यशाची कमान अवलंबुन आहे.  


आमदार राणा पाटील राष्ट्रवादी सोडून गेल्यानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी अजुन कायम आहे किंबहुना ती जाणीवपूर्वक कायम ठेवण्याचे व संभ्रम निर्माण करण्याचे काम डॉ पाटील परिवाराशी बांधिलकी असलेली सुप्त यंत्रणा करीत आहे. डॉ पाटील पिता पुत्राचा वारसा राष्ट्रवादीत असलेले जीवनराव गोरे व त्यांचे पुत्र आदित्य गोरे कायम ठेवत आहेत. काळ व रूप बदलले तरी राष्ट्रवादीत घराणेशाही व एकाधिकार शाहीची परंपरा कायम असल्याने सक्षम चेहरा समोर येऊ दिला नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यात अनेकांनी गोरे यांच्यासह गटतटाच्या तक्रारीचा पाढा वाचला आहे मात्र या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्टीने कितपत गांभीर्याने घेतल्या हा प्रश्न आहे  केवळ राज्यात सत्ता राष्ट्रवादीची सत्ता आहे या आशेने आज ना उद्या कुठे तरी संधी मिळेल या हेतूने अनेक जण राष्ट्रवादीत ठाण मांडून बसले आहेत तर राजकीय लॉटरी लागून नशीब बदलेल अशी आस अनेकांना आहे. 


उस्मानाबाद राष्ट्रवादीला सक्षम मालक नसल्याने शिवसेनेकडून कायम खच्चीकरण केले जात असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते मात्र त्यांच्या हस्ते नियोजन भवनचे उदघाटन न करता २ दिवसानंतर शिवसेनेचे पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत खुद्द विक्रम काळे यांनी उघड नाराजी व्यक्त केली. अनेक योजना निधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी दिला तरी त्यांच्या स्थानिक नेत्यांना मात्र चार हात लांब ठेवले जाते. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी पक्की असली तरी स्थानिक पातळीवर समीकरण वेगळे दिसत आहे. उस्मानाबाद शहरात काँग्रेसचे वर्चस्व कमी आहे त्यामुळे त्यांना सोबत घेण्याचा आग्रह होताना दिसत नाही.


आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे भाजपात गेल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून अच्छे दिन आले आहेत. भाजप हा पक्ष म्हणून काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार कि उस्मानाबाद शहर विकास आघाडीचा गाडा चालविणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही त्यामुळे या आघाडीला कितपत यश मिळेल हा येणारा काळच ठरविणार आहे. आमदार पाटील यांनी या विकास आघाडीच्या मोहिमेची जबाबदारी माजी नगराध्यक्ष सुनील काकडे व गटनेते युवराज नळे यांच्यावर सोपवली आहे. पाटील हे तुळजापूरचे आमदार झाले तरी त्यांचा जीव उस्मानाबाद मतदार संघात कायम गुंतला आहे. शहर विकास आघाडीची स्थापना करतानाही जातीय समीकरण बदलू नये यासाठी धाराशिव नको उस्मानाबाद हे नाव कायम ठेवण्याचा आग्रह धरला गेला. 


उस्मानाबाद नगर परिषद भागात अनेक समस्या कायम आहेत, सत्ता राष्ट्रवादी किंवा शिवसेनेची असली तरी जनतेच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. शहरातील प्रमुख मार्गावर खड्डे ,रस्ते , पाणी यासह अनेक असुविधा आहेत. जनतेने समस्या मांडल्या की एकमेकांवर राजकीय आरोपांची चिखलफेक व बोट दाखविण्याचे काम समर्थपणे केले जाते. शहराचा विकास कोणामुळे रखडला याबाबत व्यापक चर्चा होणे गरजेचे आहे. आजवर जे नगर परिषदेचे कारभारी राहिले आहेत तेच वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून सत्तेची फळे चाखत आहेत तर जनता मात्र नेहमीप्रमाणे वाऱ्यावर आहे. जनतेला समस्यांनी ग्रासले आहे तर नेत्यांना सत्तेचा मोह अनावर झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या