सुवर्ण महोत्सवी भूजल पुनर्भरण अभियान राबविण्याचे आवाहन

 सुवर्ण महोत्सवी भूजल पुनर्भरण अभियान राबविण्याचे आवाहन


 



हिंगोली, (जिमाका) दि. 14 : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यंदा आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या प्रसंगाचे औचित्य साधून सर्वांनी  ‘‘सुवर्ण  महोत्सवी  भूजल पुनर्भरण अभियान’’ राबविण्यात येत आहे. भूजल पुनर्भरणामुळे भूजल पातळीमध्ये वाढ होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून भूजल पुनर्भरण करावे, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.) यांनी केले आहे.


वाढत्या लोकसंख्येबरोबर व शेतीसाठी पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्जन्यमानामधील दोलायमानता, वाढते प्रदूषण, जमिनीची  धूप, हवामानातील बदल इत्यादी कारणांमुळे पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. पाणी आपण निर्माण करु शकत नाही,  परंतु त्याचे जतन मात्र करु शकतो.  त्यामुळे पावसाचे पडलेले पाणी भूगर्भात कसे जिरवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याच बरोबर भूजलाच्या गुणवत्तेमध्ये सुध्दा बदल होत आहेत. या सर्व गोष्टींचा भविष्यामध्ये सामना करण्यासाठी आज पासूनच भूजल पुर्नभरण करणे अंत्यत आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाने सुध्दा “Catch the Rain”  हा महत्वकांक्षी  प्रकल्प हाती घेतला आहे. सर्वानी या सुवर्ण महोत्सवी भूजल अभियानामध्ये मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा व मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये भूजल पुर्नभरण व्हावे यासाठी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील भूगर्भशास्त्र, भूगोल, कृषि विषयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनांचे स्वयंसेवक, नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक, अटल भूजल योजनेतील ग्राम पंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी  इत्यादीची ऑनलाईन पध्दतीने भूजल साक्षरता वाढविण्यासाठी जाणीव जागृती बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षित अधिकारी, विद्यार्थी, स्वयंसेवक व कार्यकर्ते यांच्या सहभागामुळे राज्यातील बहुतांश गावामध्ये भूजल पुनर्भरण कार्यक्रम राबविण्यास फायदा होणार आहे.


या अंतर्गत विहीर पुनर्भरण, विंधन विहीर पुनर्भरण, छतावरील पाऊस पाणी संकलन, रिचार्ज शॉफ्टद्वारे भूजल पुनर्भरण असे विविध उपक्रम नागरिकांनी हाता घ्यावसाचे आहे. त्यानुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाचे संचालक डॉ. मल्लीनाथ कल्लशेटटी (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राधाबिनोद शर्मा तसेच यंत्रणेचे औरंगाबाद विभागाचे उपसंचालक श्री. मेश्राम, वरिष्ठ भूवैज्ञानिक  श्री. संगणवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात यंदा सुवर्ण महोत्सवी भूजल अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक  भूवैज्ञानिक रविंद्र मांजरमकर यांनी दिली.


पाण्याची वाढती मागणी व उपलब्धता लक्षात घेता भूजल पुनर्भरण काळाची गरज आहे त्याचे महत्व सर्वांनी ओळखले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर दैनंदिन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाणी वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या मागणी बरोबर पाण्याचा बेसुमार उपसा वाढला आहे. त्याच बरोबर पाणी व्यवस्थापनामध्ये कमतरता, निसर्गाचा ऱ्हास आदी अनेक गोष्टीमुळे भूजल स्तर झपाट्याने खालावला आहे, ही बाब चिंताजनक आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणनेद्वारे भूजलच्या उपलब्धतेबाबत, भुजलाच्या गुणवत्तेबाबत सुध्दा अभ्यास केला जातो, अशी माहिती सहाय्यक भूवैज्ञानिक रविंद्र मांजरमकर  यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या