कापसाच्या प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांची जाहीर लागवड शेतकरी संघटनेकडून सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी भूमिकेचा निषेध

 

कापसाच्या प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांची जाहीर लागवड 

शेतकरी संघटनेकडून सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी भूमिकेचा निषेध








 लातूर/प्रतिनिधी: सरकारने प्रतिबंधित केलेल्या एचटीबीपी या कापसाच्या वाणाची जाहीरपणे लागवड करून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारच्या शेतकरी तंत्रज्ञान विरोधी भूमिकेचा निषेध करण्यात आला.
  शेतमालाला शेतीमध्ये अधिक उत्पन्न निघावे यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित केलेले बियाणे जगभर वापरले जात आहे.कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न देणारे हे बियाणे वापरून त्यापासून उत्पादित होणारा माल जगभरात विकला जात आहे. आपल्याकडे मात्र त्याच-
त्याच पद्धतीचे बियाणे वापरले जात असून यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.यातून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी स्वतःचे जीवन संपवत आहे.
  शेतकरी संघटना शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी १९७९ सालापासून आग्रही आहे.प्रतिकूल हवामानात व कमी खर्चात तग धरणारे वाण विकसित झालेले असले तरी ते भारतातील शेतकऱ्यांना मिळत नाही.ते उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करूनही बियाणे वापरास परवानगी मिळत नसल्याने मागील तीन वर्षांपासून संघटनेच्यावतीने तंत्रज्ञान स्वातंत्र्य भांडार हा आंदोलनात्मक कार्यक्रम राबविला जात आहे.त्या अनुषंगाने भारतात वापरण्यास प्रतिबंधित असलेले जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेले सोयाबीन, कापूस,वांगी आदी पिकांची लागवड करून सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा निषेध केला जात आहे.
 या आंदोलनाचा एक भाग यावर्षी दि.१० ते १६ जून या कालावधीत राज्यात एचटीबीपी बियाणांची लागवड केली जात आहे. त्यानुसार अहमदपूर तालुक्यातील रुई (दक्षिण) येथे शेतकरी माधव कंदे यांच्या शेतात एचटीबीपी कापसाची लागवड करण्यात आली.
 यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य माधवराव मल्लेशे, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, ज्येष्ठ नेते अशोक पाटील, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, तालुकाध्यक्ष जनार्दन डाके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती .
  यासंदर्भात जिल्हाधिकारी व कृषी उपसंचालकांना निवेदन देण्यात आले असून जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेले बियाणे वापरण्याची परवानगी शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.हे आंदोलन यापुढेही असेच चालू राहणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या