मनपा शाळेचा गुणवत्तेचा झेंडा ! मनपा शाळा क्रमांक ९ चा शंभर टक्के निकाल

 

मनपा शाळेचा गुणवत्तेचा झेंडा !

मनपा शाळा क्रमांक ९ चा शंभर टक्के निकाल






लातूर /प्रतिनिधी: विविध शैक्षणिक उपक्रमात सतत अग्रेसर असणाऱ्या मनपाच्या शाळा क्रमांक ९ ने यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली.या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेतील विद्यार्थी,मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपली गुणवत्ता बावन्नकशी सोने असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या यशाबद्दल मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
   महानगरपालिकेची शाळा क्रमांक ९ ही दरवर्षी निकालात अग्रेसर असते.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे परिश्रम यामुळे या शाळेची गुणवत्ता कायम आहे.महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रभागात असणारी ही शाळा शिक्षणासोबतच विविध उपक्रमही राबवते .शिक्षणाची पंढरी असणाऱ्या लातूर शहरासाठी भुषणावह असेच या शाळेचे कार्य राहिलेले आहे.
  यंदा दहावीच्या निकालातही शाळेने यशाची परंपरा कायम राखली.शाळेचा निकाल १०० टक्के लागला.या शाळेतील ऋषिकेश गिरी याने ९८.६० टक्के गुण घेत पहिला क्रमांक पटकावला.भक्ती सपकाळ हिने ९१ टक्के व प्रतीक्षा मुठाळ हिने ९०.६०टक्के गुण घेत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.निकिता जाधव या विद्यार्थिनीला ८९.२०टक्के,अश्विनी घोलप हिला ८९ टक्के तर वेदांती फुलारी या विद्यार्थिनीला ८७.२० टक्के गुण मिळाले.या गुणवंत विद्यार्थ्यांचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी अभिनंदन केले.गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाची पताका अशीच फडकत ठेवावी,अशा शुभेच्छा देतानाच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक धोंडीराम भिंगोले आणि सर्व शिक्षकांचेही महापौरांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या