विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
जिल्ह्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान !
· सहाही मतदारसंघातील मतदान पथके रवाना
· सकाळी ७ पासून होणार मतदानाला सुरुवात
लातूर, दि. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी २ हजार १४३ मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान पथके रवाना झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या मतदान साहित्य वाटप केंद्रांना भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला.
उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, लातूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी या अधिकारी, कर्मचारी यांनी काळजीपूर्वक काम करावे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या. यावेळी त्यांनी मतदान पथकातील अधिकारी, कमर्चारी यांच्याशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना आणि पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना मतदान साहित्य वितरीत करण्यात आले. मतदान साहित्य प्राप्त करून घेतल्यानंतर ही पथके आपल्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्राकडे रवाना झाली.
२० नोव्हेंबर र्जोई सकाळी ७ पासून राष्ट्रीय कर्तव्यासाठी सज्ज असलेले झोनल अधिकारी, मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांची शासकीय तंत्रनिकेतन येथे मतदान साहित्य हस्तगत करण्याची लगबग सुरु होती. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपले आदेश, मतदान केंद्राबाबत माहिती, ओळखपत्र हस्तगत करुन मतदान केंद्राचा मार्ग याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लगबग दिसून आली. सर्व कर्मचारी मतदान साहित्य हस्तगत करुन त्या साहित्यांची तपासणी करुन मतदान केंद्राकडे रवाना झाले.
जिल्ह्यातील २ हजार १४२ मतदान केंद्र आणि १ सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील २० लाख ४५ हजार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. त्यांना निर्भयपणे आणि शांततामय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलीस, गृहरक्षक दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मदतीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध राहणार आहेत. तसेच प्रथमोपचार कीटसह एक आरोग्य कमर्चारी यांचीही मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, सावलीसाठी मंडप, वयोवृद्ध, गरोदर महिला यांना बसण्यासाठी खुर्ची यासारख्या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक युवा संचलित मतदान केंद्र, दिव्यांग संचलित मतदान केंद्र, महिला संचलित मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. यासोबत प्रत्येक मतदारसंघात एक अभिनव मतदान केंद्र (युनिक पोलिंग स्टेशन) तयार करण्यात आले आहे. वयोवृद्ध मतदार, गरोदर महिला यांना रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्याने प्रवेश देवून त्यांचे मतदान करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. निवडणूक, मतदानविषयक तक्रारींसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या कक्षाचा संपर्क क्रमांक ०२३८२-२२४४७७ आहे.
मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून १२ कागदपत्रे ग्राह्य धरणार
मतदारांनी मतदानासाठी येताना भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र सोबत आणावे. मतदान ओळखपत्राशिवाय आणखी १२ कागदपत्रे ग्राह्य धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफीसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र अथवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम अथवा पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना अथवा आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र आदी ओळखपत्रांचा समावेश आहे.
मतदान केंद्र परिसरात मोबाईल वापरावर बंदी
विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंध करण्यात आला आहे.
मतदान, मतमोजणीदिवशी मद्यविक्री राहणार बंद
लातूर जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिले आहेत. निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासापासून म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या सायंकाळी ६ वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण दिवस आणि २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. तसेच मतमोजणी निमित्त २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे.
राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर; कामगारांना मिळणार एका दिवशीची सुट्टी अथवा सवलत
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत राज्य शासनाने ७ नोव्हेंबर २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. कामगारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, यासाठी मतदान होत असलेल्या क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्य शासनाने २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
Collector & District Magistrate, Latur
Latur Police Department
Chief Electoral Officer Maharashtra
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.