शांततामय वातावरणात मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज-जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत करता येणार मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024


शांततामय वातावरणात मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज-जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे






• २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत करता येणार मतदान

• जिल्ह्यातील मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे

• प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध

• वयोवृद्ध मतदार, गरोदर महिलांना रांगेत उभे न करता प्राधान्याने प्रवेश

• मतदान केंद्राच्या २०० मीटर परिघात मोबाईल वापरावर बंदी


 लातूर, दि. १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १०६ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. मतदान प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला अथवा दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपला मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले.


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी ६ वाजता संपला असून या कालावधीनंतर आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी भरारी पथके, स्थिर निगारणी पथके अधिक गतीने कार्यरत करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २ हजार १४२ मतदान केंद्र आणि १ सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून यासाठी २ हजार ३८३ मतदान पथके सज्ज करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, प्रथमस्तरीय मतदान केंद्र अधिकारी आणि दोन इतर मतदान केंद्र अधिकारी यांचा समावेश असून एकूण ९ हजार ५३४ अधिकारी, कर्मचारी या मतदान पथकांमध्ये राहतील. यासोबतच पोलीस, गृहरक्षक दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मदतीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध राहणार आहेत. तसेच प्रथमोपचार कीटसह एक आरोग्य कमर्चारी यांचीही मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.


भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, सावलीसाठी मंडप, वयोवृद्ध, गरोदर महिला यांना बसण्यासाठी खुर्ची यासारख्या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक युवा संचलित मतदान केंद्र, दिव्यांग संचलित मतदान केंद्र, महिला संचलित मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. यासोबत प्रत्येक मतदारसंघात एक अभिनव मतदान केंद्र (युनिक पोलिंग स्टेशन) तयार करण्यात आले आहे. वयोवृद्ध मतदार, गरोदर महिला यांना रांगेत उभे न करता प्रथम प्राधान्याने प्रवेश देवून त्यांचे मतदान करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. निवडणूक, मतदानविषयक तक्रारींसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या कक्षाचा संपर्क क्रमांक ०२३८२-२२४४७७ आहे.


मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून १२ कागदपत्रे ग्राह्य धरणार


मतदारांनी मतदानासाठी येताना भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र सोबत आणावे. मतदान ओळखपत्राशिवाय आणखी १२ कागदपत्रे ग्राह्य धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफीसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र अथवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम अथवा पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना अथवा आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र आदी ओळखपत्रांचा समावेश आहे.


मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश; मोबाईल वापरावर बंदी, जिल्ह्यात जमावबंदी लागू


विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंध करण्यात आला आहे.


तसेच कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.


आठवडी बाजार राहणार बंद


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानानिमित्त जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. लातूर तालुक्यातील मुरुड, टाकळी शी., औसा तालुक्यातील नागरसोगा, उजनी, रेणापूर तालुक्यातील खरोळा, निलंगा तालुक्यातील लांबोटा, कासार सिरसी, पानचिंचोली, हलगरा, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर अनंतपाळ, उदगीर तालुक्यातील वाढवाणा बु., अहमदपूर तालुक्यातील किनगाव, चाकूर तालुक्यातील चापोली आणि देवणी तालुक्यातील देवणी बु. या ठिकाणी होणारे आठवडी बाजार २० नोव्हेंबर २०२४ ऐवजी इतर दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.


शांततामय वातावरणातील मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान शांततेत पार पडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये १३९ पोलीस अधिकारी ४ हजार ४३० पोलीस अंमलदार, होमगार्ड आणि केंद्रीय सशस्त्र दलाच्या ६ तुकड्या आणि एक राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेत गुन्हेगारांकडून कोणताही व्यत्यय येवू नये, यासाठी ३ हजार १७९  गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये ६ जण तडीपार आणि ४ जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत ४२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ३७ लाख रुपयांचे मद्य, ४७ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले. तसेच मतदारांना कोणतीही तक्रार असल्यास ११२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.


मतदान, मतमोजणीदिवशी मद्यविक्री राहणार बंद


लातूर जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिले आहेत. निवडणूक कालावधीत मतदान  संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासापासून म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या सायंकाळी ६ वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण दिवस आणि २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. तसेच मतमोजणी निमित्त २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे.


राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर; कामगारांना मिळणार एका दिवशीची सुट्टी अथवा सवलत


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत राज्य शासनाने ७ नोव्हेंबर २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. कामगारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, यासाठी मतदान होत असलेल्या क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राज्य शासनाने २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Collector & District Magistrate, Latur

Latur Police Department

Chief Electoral Officer Maharashtra

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या