राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते फळबाग लागवडीचा शुभारंभ
कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे फळ लागवड करण्यासाठी प्रबोधन करावे
लातूर, दि.18(जिमाका):- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत फळबाग लागवड शुभारंभ गुरधाळ येथे संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता व रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी उदगीर चे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने,उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर, पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, गट विकास अधिकारी महेश सुळे,माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटूरे, पर्यावरण प्रेमी व प्रतिष्ठित नागरिक रमेश आण्णा अंबरखाने,तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, जि. प. सदस्य कल्याण पाटील आदि उपस्थित होते.
प्रत्येक शेतकऱ्याने फळबाग लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी यासाठी पोखरा योजना आणि रोजगार हमी योजनेमुळे विविध प्रकारची फळबाग लागवड करता येते. त्यासाठी कृषी विभागामार्फत अनुदान दिले जाते यात सलग व बांधावर ही फळबाग लागवड करता येते. यामध्ये खड्डे खोदणे कलमे खरेदी करणे कलमे लागवड करणे ठिबक सिंचन यासाठी लागवडीपासून तीन वर्षापर्यंत अनुदान दिले जाते. फळबागेतून उत्तम आर्थिक फायदा मिळतो त्यामुळे पारंपरिक शेतीला जोडून फळबाग लागवड करण्याचे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.
यावेळी पंचायत समिती सभापती शिवाजी मुळे, कल्याण पाटील, राजेश्वर निटुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय दुसाने यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर फळबाग लागवड करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश तीर्थकर यांनी केले त्यात त्यांनी पोखरा अंतर्गत विविध घटकांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा योजनेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नितीन दुरुगकर यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी केले.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.