रिंगरोड दुरावस्थेच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन
पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखलयुक्त पाण्याचा अभिषेक
पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखलयुक्त पाण्याचा अभिषेक
लातूर/प्रतिनिधी ः- शहराच्या चारी बाजूने रिंगरोड आहे. त्यापैकी नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक या दरम्यान असलेल्या रिंगरोडची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावर खड्याचे साम्राज्य असून वाहनधारकांना व परिसरातील नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून आरोग्य धोक्यात येऊ लागलेले आहे. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढलेली आहे. या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत आहे मात्र पालकमंत्र्यांसह मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने अध्यक्ष गुरुनाथ मगे, मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखलयुक्त पाण्याचा अभिषेक करून मनपा प्रशासनासह पालकमंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
नवीन रेणापूर नाका ते गरुड चौक या रिंगरोडच्या दुरावस्थेबाबत पालकमंत्र्यासह मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापुर्वी सामाजिक संघटनासह परिसरातील नागरीक व राजकीय पक्षांनी निवेदने देऊन रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा केलेला आहे. मात्र याकडे होणारे दुर्लक्ष वाहनधारकासह परिसरातील नागरीकांसाठी जीवघेणे ठरू लागलेले आहे. या रस्त्यांवर असलेले खड्यांचे साम्राज्य आणि या खंड्यांमध्ये नाल्याचे साठणारे दुर्गंधीयुक्त पाणी यामुळे अपघात होऊन नागरीकांचे आरोग्यही धोक्यात येऊ लागेलेले आहे. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती असून अनेक व्यापारी संकुले सुद्धा आहेत. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अद्यापही कोणतीच कार्यवाही होत नाही. वास्तविक या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत सदर काम करण्यासाठी मनपाच्या वतीने निविदाही काढण्यात आली होती. मात्र आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून दुरुस्त होईल असे कारण सांगत त्याच्या दुरावस्थेकडे पालकमंत्री अमित देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे याच्यासह मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नी पालकमंत्री व मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर जिल्हा भाजपाच्या वतीने अध्यक्ष गुरुनाथ मगे, मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे व संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलन समयी पालकमंत्री अमित देशमुख व महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास रस्त्यावरील खड्यात ठेऊन चिखलयुक्त पाण्याने अभिषेक करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे व मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे, मनिष बंडेवार यांनी पालकमंत्री, महापौर यांच्या निष्क्रीय कारभाराचा पाढा वाचत त्यांचा कारभार लातूरकरांच्या हिताचा नसल्याचे सांगत निषेध व्यक्त केला. या आंदोलनाच्या वेळी पालकमंत्री, महापौर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यास भविष्यात यापेक्षाही तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात स्थायी समिती सभापती अॅड. दिपक मठपती, महिला अध्यक्षा मिना भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, भाजयुमो प्रदेश सचिव प्रेरणा होनराव, स्वाती जाधव, सरचिटणीस अॅड. दिग्विजय काथवटे, सुरेश राठोड, सभापती मंगेश बिराजदार, नगरसेवक सुनिल मलवाड, व्यंकट वाघमारे, हणमंत जाकते, महेश कौळखेरे, देवा साळुंके, राजु अवस्कर, मनोज सुर्यवंशी, नगरसेविका रागिनी यादव, श्वेता लोंढे, वर्षा कुलकर्णी, शोभाताई पाटील, स्वाती घोरपडे, सौ. शोभा कोंडेकर, सौ. शितल पाटील, मंडल अध्यक्ष रवि सुडे, ललित तोष्णीवाल, ज्योतीराम चिवडे, संजय गिर, सतिष ठाकूर, संतोष तिवारी, सुनिल सौदागर, अॅड. प्रदिप मोरे, किशन बडगिरे, मधुसुदन पारीख, विपुल गोजमगुंडे, श्रीराम कुलकर्णी, किशोर जैन, मुन्ना हाश्मी, प्रविण येळे, धनंजय हाके, विशाल हवा-पाटील, अनिल पतंगे, आनंद कोरे, शिवसिंह सिसोदिया, व्यंकटेश कुलकर्णी, विनोद मालु, गणेश गोमचाळे, दिगंबर माने, डॉ. नागोराव बोरगावकर, किशोर रासुरे आदींसह पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गंगाधामसह परिसरातील नागरीकांचाही सहभाग
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असून गंगाधाम सोसायटी सह अनेक विकसित वसाहती आहेत. या वसाहतील नागरीकांनाही रस्त्याच्या दुरावस्थेसह साचलेल्या घाण पाण्यामुळे मोठा त्रास होत आहे. त्यामुळेच या परिसरातील नागरीकांनीही भाजपाच्या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदविला होता. त्यामुळे या आंदोलनाला मोठे स्वरुप प्राप्त झालेले होते. आंदोलन सुरु असल्याने रस्त्यावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबलेली होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.