दिशा'मुळे गरीब मनीषाला मिळाले नवे आयुष्य, नवी दृष्टी
लातूर : मोलमजुरी करून कुटुंबातल्या सदस्यांची पोटं भरायची आणि रोजचा दिवस ढकलायचा, अशी परिस्थिती असलेल्या कुटुंबात एखाद्याला आजारपण यावे अन् त्याच्या जीवाला धोका निर्माण व्हावा आणि कुणी तरी देवासारखे येऊन त्यांना आधार देत त्यांचा जीव वाचवावा. अशी एखाद्या शोकांतिकेच्या कथानकाला साजेशी घटना लातुरात समोर आली आहे. परभणी जिल्ह्याच्या इळेगावातील शेतमजूर कुटुंबातील १७ वर्षीय तरुणी तापाने फणफणली. घरातल्या गरिबीमुळं पालकांनी प्राथमिक उपचार केले. मात्र तेवढ्याने काहीच झाले नाही. यात दीड महिना गेला अन् ताप मुलीच्या डोक्याला भिनला. मेंदूत ट्युमर तयार होऊन तिची दृष्टी गेली, जीवाला धोका निर्माण झाला. अशा वेळी लातूरच्या दिशा प्रतिष्ठानने या कुटुंबाला व तरुणीला आधार देत तिच्या उपचाराचा खर्च उचलला आणि तिला केवळ दृष्टीच नाही, तर आयुष्य पुन्हा नव्याने मिळाले.
परभणीच्या इळेगाव (ता. गंगाखेड) येथे अंकुश धापसे हे पत्नी शांता यांच्यासह शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. दीड महिन्यापूर्वी त्यांची १७ वर्षीय मुलगी मनीषा हिला ताप आला. सुरुवातीला प्राथमिक उपचार केले, मात्र त्याने फरक पडला नाही. तेव्हा २० हजारांचे कर्ज काढून तिला परभणी आणि नांदेड येथे उपचारासाठी नेले. मात्र तरीही मनीषाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. यात दीड महिन्याचा काळ गेला. ताप मनीषाच्या मेंदूला भिनला आणि मेंदूत ट्युमर तयार झाला. मेंदूतील रक्तवाहिन्या सुकून तिची दृष्टी गेली. आता हा आजार तिच्या जीवावर बेतणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, लातुरात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक असलेल्या व मूळचे इळेगावचे असलेल्या गंगाधर पवार यांना गावी गेल्यानंतर ही घटना समजली. त्यांनी मनीषाला लातूरला आणण्याचा सल्ला तिच्या पालकांना दिला. १५ जुलैला तिला लातुरात आणल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉ. हनुमंत किणीकर यांच्याकडे उपचार सुरू केले. मात्र डॉक्टरांनी सांगितलेला खर्च या हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता. डॉक्टरांनी तिला मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र मुंबईिवषयी काहीच माहिती नसल्याने ते असमर्थ होते. ही बाब दिशा प्रतिष्ठानच्या ॲड. वैशाली यादव व नगरसेविका श्वेता लोंढे यांना समजली. त्यांनी दिशा प्रतिष्ठानचे प्रवर्तक अभिजीत देशमुख यांना याची कल्पना दिली. सर्वांनी मिळून रुग्णालयात जाऊन मनीषा व तिच्या नातेवाइकांची भेट घेत परिस्थिती समजून घेतली. उपचाराचा खर्च आपण उचलणार असल्याचा शब्द त्यांनी मनीषाच्या कुटुंबीयांना दिला. डॉक्टरांनीही आपल्याबाजूने सहकार्याचा शब्द दिला. त्यानुसार सह्याद्री हॉस्पीटलमध्येच डॉक्टरांनी मनीषावर उपचार सुरू केले. खरी परीक्षा तर पुढे होती. तिचा ट्युमर काढायचा होता. ऑपरेशननंतर मनीषाची दृष्टी परत येईलच, याची शास्वती नव्हती. पण तिचा जीव वाचवणे हे डॉक्टरांसाठी महत्त्वाचे होते. डॉक्टरांनी ऑपरेशन केले. ऑपरेशनच्या वेळी रक्ताची गरज भासली, त्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनने मदत केली. डॉक्टरांच्या उपचाराला अन् सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि भावी आयुष्याची स्वप्ने रंगवायच्या वयात नशिबी अंधत्व आलेल्या मनीषाची गेलेली दृष्टी तर परत आलीच; मात्र जिवावर बेतलेले हे संकट टळून तिला नवे आयुष्य मिळाले. तिच्यासह पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. केवळ आर्थिक मदत करून दिशा प्रतिष्ठान थांबले नाही तर त्यांनी या कुटुंबीयांची, मनीषाची सतत चौकशी करून त्यांना मायेचा आधार दिला. यासाठी मनीषा आणि तिच्या पालकांनी डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या दिशा प्रतिष्ठानसह सर्वांचे आभार आपल्या डोळ्यांतून आनंदाश्रू ढाळत मानले. यावेळी दिशा प्रतिष्ठानच्या सदस्यांनाही आपल्या भावला अनावर झाल्या.
आधारवड दिशा....
समाजातील अडचणीतल्या लोकांना मदत देण्यासाठी स्थापन झालेल्या दिशा प्रतिष्ठानने आतापर्यंत अनेक गरीब, गरजू, होतकरू विधार्थ्यांना आर्थिक मदत केली आहे. मृत्युशय्येपर्यंत पोहोचलेल्या अनेकांना आर्थिक, भावनिक आधार देत त्यांचे प्राण वाचविण्याचे काम केले आहे. गाव- खेड्यातील रुग्ण दवाखान्यांपर्यंत जात नाहीत. छोटे- मोठे आजार अंगावर काढून आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हे टाळण्यासाठी दिशा प्रतिष्ठानने फिरता दवाखाना चालू केला. त्यामध्ये डॉक्टरांची टीम वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या गावांत जाऊन आणि तेथील नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करते. या उपक्रमाला दिवसेंदिवस मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.