*एस टी कामगारांमध्ये असंतोषाची लाट;आंदोलनाचा सरकारला इशारा,आत्महत्येचे पाऊल उचलले तरी एसटी कामगारांचा पगार नाही!*
अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद,
रखडलेल्या पगारी आणि कर्जाचा बोजा यामुळे हतबल झालेल्या एसटी कामगारांवर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली तरी सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाची लाट खदखदत आहे. 28 तारखेपर्यंत पगार होतील, असे सांगण्यात आले तरी या महिन्यातही सरकारने कामगारांच्या तोंडाला पानेच पुसली. त्यामुळे कळंब आगारातील कामगारांनी आगारप्रमुख राकेश कोमटवार यांच्यामार्फत उस्मानाबाद विभाग नियंत्रकांना जाहीर निषेधाचे निवेदन पाठवले आहे. देखील सरकारने तत्काळ मार्ग काढावा अन्यथा आम्हांला आंदोलनाचा हत्यार उगारावं लागेल, असा इशारा सरकारला दिला आहे.
एसटी महामंडळात केवळ निधी अभावी कर्मचार्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या ताफ्यातील 90 हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचारी सध्या हवालदिल झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात कर्मचार्यांचे पगार अद्याप झाले नाहीत. त्यामुळे साक्री व दारव्हा आगारातील कर्मचारी कमलेश गोडसे, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी जीवनयात्रा संपवली. कर्मचार्यांचे पगार लवकरात लवकर व्हावेत यासाठी राज्यातील विविध संघटनांनी राज्य सरकारने एसटी महामंडळाला कमीतकमी 5 हजार कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी केली आहे.
दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत कर्मचार्यांचे पगार होतात. मात्र आज 28 तारीख उलटली तरी देखील कर्मचार्यांचे पगार झाले नाहीत. त्यामुळे याबाबत देखील सरकारने तत्काळ मार्ग काढावा. अन्यथा आंदोलनाचा हत्यार उपसावं लागेल असा इशारा देत कळंब आगारातील वाहक चालक व कर्मचार्यांना अॅडव्हान्स म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये सानुग्रह मदत म्हणून तात्काळ द्यावी, ही रक्कम पगारात पुन्हा कपात करावी अशी मागणी काही कर्मचार्यांनी लावून धरली आहे. या निवेदनावर डी.जे. पुरी, एम.ए. जगताप, पी.डी.चौधरी, बी.आर. बांगर, ए.एन. शिंदे, के.बी. शिंदे, एस.डी. माळी, नामदेव जगताप, संध्या सोनटक्के आदींची स्वाक्षरी आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.