अखेर हल्लेखोर राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला हा पत्रकारांच्या एकजुटीचाच विजय : एस. एम. देशमुख

 अखेर हल्लेखोर राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला


हा पत्रकारांच्या एकजुटीचाच विजय : एस. एम. देशमुख











मुंबाई--  आमदारांच्या संदर्भात बातमी दिल्याने लातुर जिल्ह्यातील चाकुर येथील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विकास स्वामी यांच्या कार्यालयासमोर धुडगूस घालून त्यांना अर्वाच्च शिविगाळ करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर काल गुन्हा दाखल करण्यात आला.. गेली सहा दिवस पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करीत होते.. मात्र अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने गुन्हा दाखल न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस सरळ झाले.. संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार स्वामींच्या पाठिशी आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला. या घटनेचे प्रसिद्ध झालेले  वृत्त व पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. पत्रकारांच्या एकजुटीचे हे यश आहे, असे नमुद करून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी चाकुरसह राज्यातील पत्रसृष्टीचे आभार मानले आहेत.


एस. एम. देशमुख यांनी पत्रकारत पुढे म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसात पत्रकारांवरील अत्याचाराच्या तीन घटना घडल्या असून राज्यात पत्रकारिता करणे अवघड झाले आहे. चाकुरच्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला असला तरी इतर दोन्ही ठिकाणच्या घटनांची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला. 


मुंबईतील लालबागचा राजा येथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी धक्काबुक्की करत पत्रकार  अभिषेक मुठाळ यांना मांडवातून बाहेर काढले.. तोंडाला मास्क न लावता कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे संजय निकम हे महाशय "तुला हात नाही तर पाय ही लावतो" अशा धमक्या देत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून दिसत आहे.  दुसरी घटना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील आहे.. वाळू तस्करीच्या बातम्या छापतो, पोलिसांना लोकेशन देतो म्हणून वाळू माफियाने पत्रकार प्रमोद आहेर यांना लाठ्या काठयांनी, बिअरच्या बाटल्यांनी  मारहाण केली आहे.. माफियांनी रिव्हॉल्वर देखील आहेर यांच्या कानशिलावर लावत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बेलवंडी पोलिसात पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. वाळू माफिया, राजकारणी आणि पोलीस या घटकांकडून पत्रकारांचा सर्वाधिक छळ होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. वरील घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त  किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, सोशल मिडीया राज्य प्रमुख बापूसाहेब गोरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, महिला आघाडी प्रमुख जान्हवी पाटील आदींनी निषेध केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या