हळद्या आणि बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनचे उत्पादन घटणार, शेतकऱ्याची चिंता...
औसा /प्रतिनिधी : - औसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर हळद्या आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे आणि आता हळद्दा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडून गळत आहेत. तसेच सोयाबीनच्या कोवळ्या शेंगा भरणे अवघड झाले आहे. पिकावर बुरशी आणि इतर रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनात घट होणार असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मागील वर्षी कापणीसाठी सोयाबीन आले असता अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकात पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. या वर्षीही 4 व 5 सप्टेंबर रोजी झालेली अतिवृष्टी व त्यानंतर पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा चपट्या झाल्या आहेत सध्या सोयाबीन पिकाला भाव समाधानकारक असला तरी शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी वर्ग चिंतेने ग्रासले आहेत. सतत निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यावर येणाऱ्या संकटाची मालिका सुरूच असल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या वर्षी सोयाबीन पिकामध्ये 25 टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळाला नाही, याहीवर्षी नुकसानीसाठी शेतकरी अर्ज करण्यासाठी कृषी कार्यालय व पिक विमा कंपनीकडे रांगा लावून आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.