सोयाबीनवरील राष्ट्रीय परिषदेत होणार
पाशा पटेल यांचे मार्गदर्शन
लातूर/प्रतिनिधी:सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने दि.९ व १० ऑक्टोबर रोजी इंदौर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून माजी आमदार पाशा पटेल यांना निमंत्रित करण्यात आले आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितिन गडकरी हे या परिषदेचे उद्घाटक आहेत.
सोयाबीन लागवड,प्रक्रिया आणि त्या संदर्भातील विविध विषयासंदर्भात 'द सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया' काम करत असते. संपूर्ण भारत देशासह जगातील अनेक देशात सोयाबीन लागवड आणि प्रक्रिया उद्योगासंदर्भात ही संघटना विविध कारणांनी जोडली गेलेली आहे.
कोरोनामुळे सोयाबीन उद्योगालाही फटका बसला. त्यानंतरच्या काळात उभारी घेणाऱ्या या उद्योगा संदर्भात या दोन दिवसीय परिषदेमध्ये मंथन होणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
पाशा पटेल यांना शेती आणि शेती प्रश्नांसंदर्भात दांडगा अनुभव आहे.महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.
सोयाबीनचा दर १८०० रुपयांपासून १२ हजार रुपयांवर पोचवण्यात पाशा पटेल यांनी काढलेली ११०० किलोमीटरची पदयात्रा कारणीभूत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,पीयूष गोयल,सुरेश प्रभू,तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने देशातील उद्योगपतींच्या साक्षीने पाशा पटेल यांनी सोयाबीन दरवाढीसाठी घ्यायला लावलेले निर्णय सर्वांनाच ठाऊक आहेत.हाच धागा पकडून कुठल्याही शासकीय पदावर नसताना पाशा पटेल यांना या परिषदेचे निमंत्रण देण्यात आले असून ही अभिमानास्पद बाब आहे.
या परिषदेत शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारची धोरणे यासंदर्भात पाशा पटेल मार्गदर्शन करणार आहेत.या माध्यमातून देश-विदेशातील सोयाबीन उत्पादक आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या मान्यवरांच्या समवेत चर्चा होणार आहेत.राष्ट्रीय पातळीवरील परिषदेत प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून पाशा पटेल यांना देण्यात आलेले निमंत्रण हा लातूरकरांचा सन्मानच आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.