भारतरत्न मौलाना अबुलकलाम आजाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री

 भारतरत्न मौलाना अबुलकलाम आजाद






स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री थोर स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न मौलाना अबुलकलाम आजाद यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा हा लेख.....


मौलाना अबुल कलाम आजाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ साली सऊदी अरेबीयातील पवित्र मक्का शहरात झाला. मौलानांचे मुळ नाव फैरोजबख्त खैरुद्दीन, लकब (उपाधी) अबुलकलाम व तखल्लुस (उपनाम) उर्फ मोहिद्दीन अहमद अबुलकलाम आजाद. त्यांचे घराणे धार्मित होते. घरातील वातावरणही पुर्णतः धार्मिकच होते. वडिल गृहकलहामुळे मक्का येथे काही काळ स्थायिक झाले होते. तेथेच मौलानांचा जन्म झाला. लिहिणे वाचणे शिकल्यानंतर जे काही वाचण्यायोग्य साहित्य हातात येईल ते वाचुन घेत व पुढील पाठाचे तयारी करित. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक ताकद निर्माण झाली. त्यांच्या या बौध्दिक तयारीत आईचाही मोलाचा वाटा होता. ती आलेमा होती. मौलानांना बालपणातच वाचनाचा विलक्षण छंद जडला होता. खाऊसाठी मिळणारे पैसे जमा करुन ते पुस्तके व मेणबत्त्या खरेदी करित आजोबा लवकर झोपण्याचा आग्रह करित तेव्हा मौलाना चादर अंगावर घेऊन एका हातात पुस्तक व एका हातात मेणबत्ती घेऊन वाचन करित. अशामुळे एकदा त्यांनी आपली चादरही जाळून घेतली होती. त्यांच्यात नैसर्गितरित्या उपजत गुण होते. त्यांची बुध्दीमत्ता पाहून त्यांचे वर्गमित्र व शिक्षकही आश्चर्यचकित होऊन जात. वयाच्या १२ व्या वर्षी पर्शियन व अरबीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. वयात ते विविध मासिक व साप्ताहिकातून लेख लिहू लागले. १५ व्या वर्षी महाविद्यालयाच्या मुलांना शिकवू लागले. १९०४ साली त्यांनी कोलकत्ता येथून 'लिसानुस्सिदक्' हे मासिक सुरु केले. त्या काळातील त्यांचे लेख वाचून लोकांना आश्चर्य वाटे. साध्या सोप्या सरळ भाषेतील विचार जनमाणसांवर वेगळी छाप टाकून जात. तत्कालिन साहित्यावर सर सय्यद अहमद व त्यांच्या समकालिन यांचा वैचारिक पगडा होता. मोहम्मद हुसेन आजाद, शिवली नोमाणी, अल्ताफ हुसेन हाली, मोहसीन उल मुल्क, चराग मक्की, वकार मलिक, नजिर अहमद असे नामवंत विचारवंत त्या काळात समाजमनावर अधिराज्य गाजवत होते. त्या वातावरणात मौलाना आजादांनी विचारांची नवी श्रृंखला निर्माण केली.


त्याचकाळात इंग्रजांविरुध्द बंडाचा झेंडा भारतीयांनी हातात घेतला होता. मौलाना सुध्दा इंग्रजांविरुध्द लेख लिहून समाजात जागृती करित होती. त्यासाठी १९१२ ला त्यांनी 'अलहिलाल' हे साप्ताहिक सुरु केले. या माध्यमातून ब्रिटिशांच्या धोरणांना कडाडून विरोध केला. इंग्रजांच्या साम्राज्यशाही धोरणामुळे भारतीयांना होणारा त्रास त्यांनी जगापुढे मांडला. त्यामुळे चिडून इंग्रजांनी प्रेस अॅक्ट नावाचा कायदा तयार करुन 'अलहिलाल' बंद पाडले. पण त्यामुळे घाबरून न जाता मौलानांनी पुढे 'अलबलाग' नावाने दुसरे वृत्तपत्र सुरु केले. याचकाळात खिलाफत चळवळ उभी राहिली. त्यामुळे इंग्रज चिडले, लोकांत होणारी जागृत पाहून त्यांनी डिफेन्स ऑफ इंडिया रेग्युलेशन अॅक्ट नावाचा कायदा करुन 'अलबलाग' हे वृत्तपत्रही बंद केले व मौलानांना अटक करून रांची तुरुंगात घातले. १९२० साली त्यांची सुटका झाली. त्याचवेळी गांधीजींनी इंग्रजांविरुध्द असहकार चळवळ सुरु केली. मौलाना आजाद, मौलाना मोहमद अली व मौलाना शौकत अली यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत शाळा, कॉलेज, न्यायालय व सरकारी नोकऱ्याचा बहिष्कार करून स्वदेशीचा प्रचार सुरु केला. त्याचकाळात मौलानांनी आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन 'जामिया मिलिया इस्लामिया' या विश्वविद्यालयाची स्थापना केली. पुढे काँग्रेसमध्ये सक्रिय होत त्यांनी महात्मा गांधीच्या चळवळीला पुर्ण पाठिंबा दिला. सविनय कायदेभंग आंदोलनात भाग घेतल्याबद्दल मौलानांना पुन्हा तुरुंगात जावे लागले. त्यांचे मत होते की स्वातंत्र्य हा माणसाचा जन्मसिध्द अधिकार आहे. कोणीही व्यक्ती कोणाही माणसाला गुलाम बनवू शकत नाही. भारत स्वतंत्र होईल याला जगाची कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. आजादांचे विचार आणि त्यांची भक्ती कधीही विसरता येणार नाही.


१९२३ साली अवघ्या ३५ व्या वर्षी ते काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. धारासना सत्याग्रहाचे ते प्रमुख क्रांतीकारक होते. पुढे १९४०-४५ या काळात सलग सहा वर्षे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच काळात १९४२ चे अंग्रेजो भारत छोड़ो ही चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्यासाठी एकूण साडे सात वर्षे त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक काळ कारावास 'भोगण्याचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आयुष्यातील सरासरी आठवड्यातील एक दिवस कारावासात गेला आहे.


१९४० साली लाहोरच्या अधिवेशनात मुस्लिम लिगने पाकिस्तानची मागणी पुढे केली. त्यावेळी मौलाना काँग्रेसच्या रामगढ अधिवेशनाचे अध्यक्ष निवडले गेले होते. ज्यावेळी मोहम्मद अली जिनांनी पाकिस्तान राष्ट्राची मागणी केली. त्या मागणीला मौलानांनी प्रखर विरोध केला एवढेच नव्हे तर लोकांना या मागणीनंतरचे धोके समजावून सांगितले. जिनांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिध्दांताचा त्यांनी समाचार घेतला. हिंदु व मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. या मागणीचा त्यांनी इन्कार केला. इस्लाम धर्माच्या त्या जाणकाराने इस्लामच्या आधारावर बनू पाहणाऱ्या देशाचा अस्विकार केला व सर्व मुस्लिमांना भारतातच राहण्याचे आवाहन केले. याचकाळात फाळणीच्या मागणीने जोर धरला. मौलानांनी त्यास प्रखर विरोध केला. धर्माच्या आधारावर उदयास येणाऱ्या देशाचा कमकुवतपणा त्यांना ज्ञात होता म्हणून धर्मनिरपेक्षतेला त्यांनी महत्व दिले. जिना हे तोट्याचा सौदा करित आहेत हे त्यांनी लोकांना सांगितले. दिल्लीच्या जामा मशिदीतून केलेल्या भाषणातून त्यांनी सांगितले की, जे लोक पाकिस्तानची मागणी करित आहे ते भरकटले गेले आहेत. पुढे देश स्वातंत्र्य झाला देशाच्या संविधानाचा प्रारुप तयार करण्यातही त्यांची महत्वाची भूमिका होती. महात्मा गांधींच्या तत्वांचे त्यांनी

समर्थन केले. हिंदु मुस्लिम एकतेसाठी त्यांनी कार्य केले. मौलाना आजाद स्वातंत्र्य सैनिक, राजकीय विश्लेषक, पत्रकार, राष्ट्रीय नेते, शिक्षणतज्ञ होते. त्याशिवाय ते धर्मपंडितही होते. एक यशस्वी पत्रकार, उत्तम वक्ते म्हणून ते सर्वपरिचित होते. त्यांना उर्दू, अरबी व पर्शीयन (फारसी) भाषांवर कमालीचे प्रभूत्व होते. भाषण करतांना तिन्ही भाषातील विचार ते मांडित. त्यांचे सर्व गुण पाहुन स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांची विचारधारा पाहून त्यांच्या या मंत्रीमंडळातील समावेशाला महात्मा गांधींचा विरोध होता, परंतु मौलानांची एकूण पात्रता पाहून गांधीजी हा विरोध जाहिरपणे करू शकतले नाही. मौलानांनी वयाच्या १२ व १३ व्या वर्षी जे विचार मांडले ते सामान्य माणूस वयाच्या चाळीशी नंतर मांडू शकतो. एवढे ते परिपक्व होते.


देशाच्या स्वातंत्र्यानंतर गांधीजी फार लवकर परलोकवासी झाले. त्यांच्या हौतात्म्यानंतर दोन वर्षात सरदार पटेल यांनीही जगाचा निरोप घेतला, अशा वेळी देशाचे पंतप्रधान पंडीत नेहरूंना देशाच्या एकूण विकासासाठी योजना तयार करणे व अंमलबजावणी करण्यासाठी चांगल्या सल्लागारांची गरज होती. मौलाना आजाद संसदेत काँग्रेस पक्षाचे उपनेतेही होते व पंडीत नेहरूंचे खास सल्लागार, शिक्षणमंत्री म्हणून देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्यासाठी शिक्षण सचिव म्हणून सर्वश्री डॉ. ताराचंद, हुमायुं कबीर, ख्वाजा गुलाम सय्यद्दीन अशा लोकांची मदत घेतली. शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत ते म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. अन्न वस्त्रा नंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे. त्यांचे असे मत होते की, देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट दोन कोटीचे होते. ते १९५८ साली ३० कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचचली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करून विकसित केल्या. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), इंडियन कौन्सिल फॉर अग्रीकल्चरल अॅण्ड साइंटिफिक रिसर्च, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, इंडियन कौन्सिल ऑफ सायन्स रिसर्च तसेच कुशल कारागिरांसाठी व व्यावसायिक शिक्षणासाठी कौन्सिल फॉर इंडस्ट्रीयल रिसर्च यासारख्या १२ राष्ट्रीय संस्था त्यांच्या काळात निर्माण झाल्या. ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तिचे शिक्षण हा कायदा त्यांनी अंमलात आणला. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बैंगलोर या संस्थेचा विस्तार केला. १९४५ पुर्वी च्या सरकारने नॅशनल कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संस्था निर्माण केली होती. १९५३ साली या संस्थेच्या घटनेत बदल करून शिक्षणमंत्र्यांना अध्यक्ष बनवले गेले. त्यानंतर मौलानांनी देशभर या संस्थेचा शाखा विस्तार करुन तांत्रिक शिक्षणाचे जाळे निर्माण केले. १९५१ साली आय. आय. टी. खडकपूर या संस्थेची निर्मिती ही देशाच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरणे. पश्चिम बंगाल सरकारने १२०० एकर जमीन या संस्थेस दिली. सुरुवातीला २०० विद्यार्थी, ज्यांची निवड ३००० विद्यार्थ्यांमधून करण्यात आली होती. १९५५ साली या संस्थेतून यशस्वी विद्यार्थ्यांची पहिली बॅच बाहेर पडली तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नोकरीच्या ३-३ ऑर्डर्स होत्या. तांत्रिक शिक्षणाच्या प्रसारासाठी १९४९ साली २८, १९५०-३७, १९५५-४३, इंजिनिअरींग कॉलेजेस निर्माण झाली. त्याचकाळात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या अनुक्रमे १६,२४,२५ इतकी होती. त्यातून अनुक्रमे ३००, ५०० व ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर मौलानांनी संगीत नाटक अकादमी (१९५३), साहित्य अकादमी (१९५४) व ललित कला अकादमी (१९५४) यांची स्थापना केली.


मौलाना आजादांना स्वातंत्र्यानंतर भारतातील मुस्लिमांची चिंता होती. अहमदनगर जेल मध्ये पंडीत नेहरु यांच्याबरोबर कैदेत असताना एके रात्री मौलाना मध्यरात्रीनंतर लिहिण्यात मग्न होते, जेलर त्यांना म्हणाले मौलाना साहेब पंडितजी झोपले तुम्हीही झोपा. मौलानांनी उत्तरे 'पंडितजी झोपले कारण त्यांचा समाज जागा आहे, मी जागतो आहे कारण माझा समाज झोपलेला आहे. देशाच्या फाळणीचे दुःख मौलाना सहन करु शकले नाही. १९४७ नंतर त्यांच्या विचारात खुप बदल झाले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढे काही करता येईल. तेवढे त्यांनी केले. वक्तशीरपणा हा त्यांचा असा गुण होता की ज्यावेळी मौलाना आपल्या कार्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडत तेव्हा लोक आपल्या घड्याळातील वेळ दुरुस्त करित. १९ फेब्रुवारी १९५८ रोजी मौलांना पक्षाघाताचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. २१ व २२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री २:१० वा. त्यांचे देहावसान झाले. दिल्लीतील जामा मशिदीसमोर मैदानात त्यांना दफन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या