राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी
लोककलेच्या माध्यमातून योजनांचा जागर
हिंगोली, दि. 12 (जिमाका) : राज्यातील जनतेच्या विकासासाठी शासन विविध लोकाभिमुख योजना राबवित आहे. या योजना जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककलेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात गावोगावी जागर सुरु आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना साध्या आणि सोप्या भाषेत लोकगीते, भारुडे, गवळणी, बतावणी या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविणे हाच उद्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आहे. त्यामुळे जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली यांच्याकडून या कलापथकांचा जागर 17 मार्च पर्यंत सुरु आहे.
जयभवानी कला मंडळाचे नारायण घोंगडे यांनी गोंधळ, शाहिरी, लोकगिताच्या माध्यमातून रात्री वसमत तालुक्यातील कुडाळा येथे व आज वाई येथे मनोरंजनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करत माहिती दिली. संत गजानन महाराज लोककला व पथनाट्य मंडळाचे नामदेव कल्याणकर यांच्या पथकानेही रात्री सेनगाव येथे व आज रिधोरा, जांभरुण येथे लोककलेच्या माध्यमातून मनोरंजन करत शासनाच्या विविध योजनांची, उपक्रमांची जनजागृती केली. तर सूर्यप्रकाश बहुउद्देशीय सेवा संस्थेचे कलापथक प्रमुख शाहीर प्रकाश दांडेकर यांनी शाहिरी, पोवाडा, बतावणी, लोकगिताच्या माध्यमातून आज असोला, जवळा बाजार, शिरड शहापूर येथे शासनाच्या योजनांची, उपक्रमांची जनजागृती करण्यात आली. या कलापथकांच्या कार्यक्रमाला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या या जागराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.