अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेख शफी बोल्डेकर निमंत्रित कवी
लातूर (प्रतिनिधी):- हिंगोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी तथा ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष कवी शेख शफी बोल्डेकर यांची उदगीर जि. लातूर येथे २२ ,२३ व २४ एप्रिलला होणा-या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सीमावर्ती भागातील निमंत्रितांच्या कवीसंमेलनासाठी हिंगोली जिल्ह्यातून एकमेव निमंत्रित कवी म्हणून निवड झाली. या संदर्भात संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील ( नागराळकर) आणि प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरूके यांनी संमेलनाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. कळमनुरी तालुक्यातील बोल्डा येथील शेख शफी बोल्डेकर यांनी हिंगोली जिल्ह्यातील पहिली प्रकाशन संस्था ( बोल्डागांव येथील प्रसिद्ध सूफी संत मिस्कीनशाहवली चिश्ती यांच्या नावे ) “मिश्कीनशाहबाबा ” प्रकाशनाची स्थापना (१९९९ )ला करून हिंगोली जिल्ह्यातील साहित्यिकांच्या तीस पुस्तकांचे प्रकाशन केले .जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करून प्रकाशनाच्या वतीने ” सूफी संत शेख महंमद मराठी साहित्य ” पुरस्कार देऊन अनेक साहित्यिकांचा गौरव केला.
मराठी मुलखात जगत असताना साहित्याच्या अंगाने आपले अनुभव विश्व निर्भिडपणे मराठीतून अभिव्यक्त करणारा तोच खरा मुस्लिम मराठी साहित्यिक अशी मुस्लिम मराठी साहित्यिकांची व्याख्या शफी बोल्डेकर यांनी केली असून ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची सुरूवात ह्याच हिंगोली जिल्ह्यातील बोल्डा या एका खेडेगावातून झाली आहे. आजघडीला ही चळवळ सा-या महाराष्ट्रात ओळखली जाते . या चळवळीच्या उपक्रमातून “युगस्री फातिमाबी शेख ” हा ऐतिहासिक प्रातिनिधिक काव्यग्रंथ साकार झाला. या चळवळीतून ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था या नावाने शासकीय नोंदणीकृत संस्था स्थापन करण्यात आली आहे. शफी बोल्डेकर यांचे ” मिलाफ ” काव्यसंग्रह, १९९९.” आम्ही मराठी मुसलमान ” काव्यसंग्रह, २००७ “डिझेलगाडी ” बालकाव्यसंग्रह २०१४ ” रमजान ईदच्या कविता” संपादन २०२० हे ग्रंथ प्रकाशीत आहेत. रमजान ईदच्या कविता या संपादित काव्यग्रंथावर सोलापूरचे ज्येष्ठ गजलकार साबिरभाई सोलापूरी यांनी वृत्तपत्रातून रमजान २०२१ हे विशेष सदर रमजानभर चालविले. शेख शफी बोल्डेकर यांना हिंगोली येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा पहिला शिवछत्रपती गौरव पुरस्कार, कवी कुसुमाग्रज काव्य अंकुर साहित्य पुरस्कार , श्री चक्रधरस्वामी वाड्ःमय पुरस्काराने सन्मानित केले असून , नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ” सूफी ” या शिर्षक कवितेचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या साहित्यावर पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या विद्यापीठात संशोधन झाले आहे. सूफी साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.