नोकरीचा पहिला पगार दिला महाविद्यालयाला कॉक्सिटचा विद्यार्थी ऋषिकेश जाधवने असेही व्यक्त केले ऋण

 

नोकरीचा पहिला पगार
दिला महाविद्यालयाला
कॉक्सिटचा विद्यार्थी ऋषिकेश जाधवने असेही व्यक्त केले ऋण






 लातूर, दि.६- घरची परिस्थिती हलाखीची, अशातच आईचे हरवलेले छत्र. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण केले. कॅम्पस मुलाखतीत नामांकित आयटी कंपनीत नोकरी मिळाली. हे केवळ महाविद्यालयामुळेच शक्य झाले, या भावनेतून येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचा (कॉक्सिट) विद्यार्थी ऋषिकेश बालाजी जाधव याने नोकरीच्या पहिल्या पगाराचा धनादेश रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
  येथील बालाजी जाधव हे अत्यंत गरीब आहेत. ते खाजगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. अशातच त्यांच्या पत्नीचे मागील कांही वर्षांपूर्वी निधन झाले. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी दुसरे लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा ऋषिकेश याने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) बीएस्सी, सी. एस. शाखेत प्रथम वर्षात प्रवेश घेतला. त्याच्याकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठीही पैसे नव्हते. त्याची ही अडचण ओळखून रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी संपूर्ण शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्याच्यावरील शैक्षणिक शुल्काचा ताण कमी झाला. तो अभ्यासात रमू लागला.
 अशातच पदवीच्या तृतीय वर्षात शिकत असताना महाविद्यालयात सुरू असलेल्या विप्रो इंटिग्रेटेड लर्निंग प्रोगाममध्ये (विल्प) त्याने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. हा विल्प प्रोग्राम पूर्ण होवून याचा अंतिम निकाल हाती आला. यात ऋषिकेश याची विप्रो या नामांकित आयटी कंपनीत नोकरीसाठी निवड झाली होती. त्याने केलेल्या कष्टाचे व महाविद्यालयाने दिलेल्या शिक्षणाचे चीज झाले. तो नोकरीवर गेला. परवा त्याचा एक महिन्याचा पगार खात्यावर जमा झाल्याचे त्याला समजले. ही आनंदाची बातमी त्याने लातूरला येवून डॉ. एम. आर. पाटील यांच्या कानावर घालून पहिला पगार महाविद्यालयाला देण्याचे जाहीर केले.
  डॉ. पाटील यांनी ऋषिकेशच्या या निर्णयाचे स्वागत केले. डॉ. पाटील यांच्या कार्यालयात आज (बुधवारी) सायंकाळच्या सुमारास ऋषिकेश जाधव याने त्याच्या पगाराचा धनादेश सुपूर्द केला.
   यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. बी. एल. गायकवाड, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. एच. महामुनी, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. कैलास जाधव, विल्पचे मार्गदर्शक प्रा. तानाजी खरबड, ऋषिकेशचे वडील बालाजी जाधव उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने ऋषिकेशचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या