डॉक्टर कफिल खान यांनी जम्बो सिलेंडर मिळविण्याचा बऱ्याच प्रयत्न केला

10 ऑगस्ट 2017 बाबा राघवदास जिल्हा रुग्णालय, गोरखपूर येथील द्रवरूप ऑक्सिजन साठा संपतो. 63 मुलं आणि 18 प्रौढ  यांच्या मृत्युंची नोंद होते. प्रत्यक्षात आकडा जास्त असू शकतो.


आर्थिकदृष्ट्या कमकुवत  असणाऱ्या अभागी जीवांना सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नसतो. अपुरे मनुष्यबळ, ढिसाळ नियोजन, कामं टोलवाटोलवी करण्याची प्रवृत्ती, असंवेदनशीलता  आदी कारणामुळे बहुतांशी सरकारी रुग्णालय बदनाम झाले आहेत. त्यातील बाबा राघवदास जिल्हा रुग्णालय, गोरखपूर हे  एक.

या पुस्तकाद्वारे, 10 ऑगस्ट 2017 च्या रात्री आणि त्यानंतर हॉस्पिटल मधील मृत्यूसत्र, आणि डॉ कफिल खान यांची रुग्ण वाचविण्याची तळमळ आपण अनुभवतो.
कामचुकार, बेजबाबदार वरिष्ठ अधिकारी लॉबीन्ग करून स्वतःचा बचाव करतात. हे सर्वकालिक सत्य डॉ कफिल खान यांच्या मुळे पुन्हा अधोरेखित होते.

स्वतंत्र विचार, नविन्याचा ध्यास सरकारी नोकरीत चालतो का? डॉ कफिल म्हणतात,आला दिवस काढण्याची वृत्ती असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करायला लागण हे सरकारी नोकरीच मोठं दुखणं आहे. डॉ कफिल खान यांना हे पेलवत नाही आणि त्यांच्या आयुष्याची ससेहोलपट होते, पण त्यांनी हिम्मत शाबूत ठेवली आहे.

त्या दोन दिवसात BRD हॉस्पिटल मध्ये नेमक काय घडलं ? त्यामुळे त्यांच्या आयुष्यात झालेली उलथापालथ, तुरुंगावासाचे भयानक अनुभव, सरकारी सिस्टीम कशी काम करते  याचा थरारून टाकणारा अनुभव या पुस्तकात आहे. प्रत्येक सरकारी कर्मचारी, जिज्ञासू यांनी आवर्जून वाचावे.

ठळक घटना

👉🏽10 ऑगस्ट 2017 मध्यरात्रींनंतर  डॉक्टरांच्या व्हाट्सअप ग्रुप वर ऑक्सिजन संपल्याचा संदेश येतो. द्रवरूप ऑक्सिजन आणि राखीव ठेवलेले 50 जंबो सिलेंडर ही संपलेले असतात.

👉🏽बालरोग विभाग प्रमुख - डॉ महिमा मित्तल
अनेस्थेशिया विभागाचे प्रमुख - डॉ सतीशकुमार
BRD चे प्रिन्सिपॉल - डॉ राजीव मिश्रा त्यांच्या पत्नी डॉ रश्मी शुक्ला

 हे सर्व जण त्या व्हाट्सअप ग्रुप वर होते. डॉक्टर कफिल खान यांनी यांना परिस्थिती फोनवर कळविली. तरीही यातील एकही जबाबदार व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली नाही.

 वरिष्ठ डॉक्टर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून हॉस्पिटलमध्ये का आले नाहीत ?

👉🏽 मेंदूज्वर ची साथ असल्याने 313 रुग्ण ऍडमिट होते. यातील बहुतांश ऑक्सिजनवर होते. ऑक्सिजन संपल्याने त्यांना आकडी येऊ लागली. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर महिमा मित्तल यांनी घरूनच ऍम्ब्यु बॅग वापरण्याचा सल्ला दिला.

 तितक्या ॲम्ब्यु बॅग  आहेत का? प्रशिक्षित स्टाफ आहे का? याचा कसलाही विचार न करता व प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांनी फोनवर सल्ला दिला. उंटावरून शेळ्या हाकणे ते हेच का?

👉🏽 ऑक्सीजन संपल्यानंतर नवीन ऍडमिशन घ्यायचा प्रश्नच नव्हता.पन तसं झालं नाही.याउलट आहेत ते रुग्ण इतरत्र शिफ्ट करायला हवे होते पण ज्यांनी निर्णय घ्यायचे ते वरिष्ठ डॉक्टर घरीच थांबलेले होते.

👉🏽 द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा पुष्पा इंटरप्राईजेस कडून व्हायचा. त्यांचे 68 लाखांचे बिल बाकी होते. बिल मिळावे यासाठी त्यांनी 14 स्मरणपत्रे पाठवली, वारंवार पाठपुरावा केला. पंधरा दिवसाच्या आत पेमेंट होत राहील अशी वर्क ऑर्डर मध्ये नोंद होती, परंतु टक्केवारीच्या खेळात पेमेंट होऊ शकले नाही. त्यांनी पूर्व सूचना देऊन द्रवरूप ऑक्सिजनचा  पुरवठा थांबवला.

👉🏽BRD हॉस्पिटलमध्ये 20 टन ऑक्सिजनचे टॅंक आहे. ऑक्सीजन ची पातळी 4000 वर आल्याबरोबर हालचाल करणे आवश्यक होतं. याच वेळी पुढील पुरवठा होतो की नाही हे पाहून होत नसल्यास रुग्ण शिफ्ट करायला घ्यायला हवे होते. हे झालं नाही.

 प्रत्येकाला त्याची जबाबदारी लिखित स्वरूपात निश्चित करून न देणे हे त्यामागचं कारण असू शकतं. त्यामुळे टोलवाटोलवी झाली आणि पुढील अनर्थ घडला. जो टाळता येऊ शकला असता.

👉🏽 ऑक्सीजन टॅंक वर काम करणाऱ्या सेवकाने रीडिंग 900 वर आले असता लेखी कळवले. वरिष्ठांना व संबंधित कर्मचारी यांना त्यानंतरही परिस्थितीचे गांभीर्य ओळखता आलं नाही 

वरिष्ठ अधिकारी व संबंधित कर्मचारी यांची बेफिकीर वृत्ती भोवली आणि 63 बालकांचा हकनाक बळी गेला.

👉🏽 डॉक्टर कफिल खान यांनी जम्बो सिलेंडर मिळविण्याचा बऱ्याच प्रयत्न केला. फैजाबाद हून 250 जम्बो येण्याची वाट पाहत होते प्रत्यक्षात आले 50 जम्बो सिलेंडर. तरीही पुढील दोन दिवसात त्यांनी जवळपास 500 जम्बो ची व्यवस्था केली.

 मला असं वाटतं त्यांचे प्रयत्न प्रामाणिक असले तरी चुकीच्या दिशेने होते. पेशंटची संख्या 300 च्या वर असताना जम्बो सिलेंडर वापरणे शक्य नाही त्यासाठी बरेच मनुष्यबळ लागते. आहेत ते पेशंट इतरत्र शिफ्ट करणे,नवीन ऍडमिशन बंद करणे व लिक्विड ऑक्सिजन मिळवणे यावर फोकस असायला हवा होता.

👉🏽 व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्था म्हणून dura सिलेंडरची व्यवस्था करायला हवी होती.

👉🏽 घटनाक्रम सुरू झाला 10 ऑगस्ट 2017 ला सायंकाळी साडेसात वाजता. बालरोग विभागाच्या प्रमुख डॉक्टर महिमा मित्तल परिस्थितीला तोंड द्यायला नको म्हणून रजेवर जातात. पण जिल्हाधिकारी यांच्या फोनमुळे दिनांक 11 ऑगस्ट दुपारी तीन वाजता त्या कामावर येतात.
 ऑक्सिजन पुरवठा सुरळीत कसा होईल? अत्यावस्था रुग्णांना पाहणे अथवा इतरत्र शिफ्ट करणे हे न करता आपण स्वतः सुरक्षित कसे राहू यासाठी ते केविलवाणी धडपड करतात.

👉🏽 प्रिन्सिपल डॉक्टर राजीव मिश्रा हे न कळवता रजेवर असतात. त्यांचा कारभार घरातूनच त्यांची पत्नी डॉक्टर रश्मी शुक्ला चालवत असतात.

👉🏽 या घटनेचे जे मूळ गुन्हेगार आहेत तेच चौकशी समितीचे सदस्य होतात. यामुळे काही एक संबंध नसताना डॉक्टर कफिल खान यांचा व्यवस्थेने बळी घेतला जातो. त्यांना मीडिया ट्रायल, तुरुंगवास, बडतर्फी यास सामोरे जावे लागते.

👉🏽 बारा ऑगस्ट च्या रात्री दीडच्या सुमारास द्रवरूप ऑक्सिजनचा साठा मिळतो. तोपर्यंत नुकसान होऊन गेलेलं असतं.

👉🏽 राज्य सरकार बालमृत्युंच कारण लपविण्यासाठी बरेच प्रयत्न करत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉक्टर कपिल खान यांच्या आयुष्याची राख रांगोळी होते.

👉🏽 शेवटी सत्याचा विजय होतो असं म्हणतात.पण सरकारी दरबारात हे तत्व लागू होतच असं नाही.

👉🏽 इतर वैद्यकीय अधिकारी यांच्याप्रमाणे डॉक्टर कपिल खान यांनीही दुर्लक्ष करून घरीच थांबायला हवं होतं का? ते प्रोबेशन वर होते, नुकतेच रुजू झालेले.

 10 ऑगस्ट 2017 रोजी त्यांची सुट्टी असतानाही त्यांनी इस्पितळात धाव घेतली. आणि मुलांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या काळात त्यांनी एकूण 26 लोकांशी संभाषण केलं. यात वरिष्ठ अधिकारी होते. निविदा काढणं,मंजूर करणं व त्यांची बिल काढणं या कोणत्याही प्रक्रियेत त्यांचा समावेश नव्हता.

👉🏽 डॉक्टर कपिल खान म्हणतात अधिकाऱ्यांशी जुळवून घेतलं असतं तर माझी नोकरी वाचली असती कदाचित , पण मग मी एक नागरिक आणि नीतिमान डॉक्टर म्हणून ताठ मानेने जगू शकलो नसतो.

 दुबळ्यांच्या बाजूने न्यायासाठी कोणालातरी ठामपणे उभे राहावं लागतच हे मला आता कळून चुकलं आहे.

👉🏽 प्रशासनाची बेपरवाही आणि भ्रष्टाचार यामुळेच त्या रात्री ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि मृत्यू कांड घडलं.

👉🏽 डरना आता नही
     चाहे जितना भी डराले
     उठेंगे हर बार एक नई ताकत से
     चाहे जितना झुका ले - डॉ कफिल खान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या