11 नोव्हेंबर जयंती
स्वतंत्रता लढ्यातील महान यौद्धा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझादः
🟦 स्वतंत्रता आंदोलनात त्यांनी 10 वर्षे सात महिने देशाच्या वेगवेगळ्या तुरूंगात अतोनात त्रास सहन केला.
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
१८८८ साली, मक्का येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म झाला. त्यांच्याहून मोठ्या तीन बहिणी त्यांना होत्या. सैनाब बेगम, फातिमा बेगम 'आरजू' आणि हनीझा बेगम "आबरु" अबू नस गुलाम यासीन "आह" नावाचा एक मोठा भाऊ होता.
मक्का या पवित्र भूमीत त्यांचे बालपण व्यतीत झाले. अरबी ही त्यांची मातृभाषा होती. त्यांनी ऐकलेले आणि उच्चारलेले पहिले अक्षर अरबी भाषेतील होते. अरबी भाषेतच विचार व्यक्त करीत, भावना आणि विचार व्यक्त करीत. अरबी भाषा-अभ्यासक म्हणूनच स्वतःची प्रतिभा निर्माण केली. आझाद यांचे शिक्षण औपचारिकरीत्या पाचव्या वर्षीच सुरू झाले. मौलाना आझाद यांनी कुरआनाचे पठण मक्केत पूर्ण केले. त्यावेळी त्यांचे वय नऊ वर्षाहून अधिक नव्हते.
१९०० साली, ते बारा वर्षांचे असताना त्यांनी अरबी आणि पर्शियन भाषेचे शिक्षण पूर्ण केले. पूर्वजांच्या अलौकिक बुध्दिमत्तेचा वारसा लाभलेला असल्याने, आझाद यांनी अरबी आणि पर्शियन भाषांवर लवकरच प्रभुत्व मिळविले. १८९९ - १९०० या काळात, अनेक महत्त्वाच्या लिखाणांचे उर्दुत भाषांतर करायला त्यांनी सुरुवात केली.
१८९९ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी इमाम गझालींचे चरित्र लिहायला सुरूवात केली. १९०९ साली त्यांनी ताझकिरा-ए-सादिका या मौलवी अब्दुल रहीम यांच्या 'अंदमानचा कैदी' या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. आझाद यांचे वय लहान असूनही लेखक म्हणून त्यांच्या विषयींच्या अपेक्षा खूपच वाढल्या होत्या, हेच यावरून स्पष्ट होते, खासगी आणि सार्वजनिक सभांतून भाषणे करायला त्यांनी १९०१ पासूनच प्रारंभ केलेला होता. त्यांचे वक्तृत्व तेव्हापासूनच श्रोत्यांना भारावून टाकू लागले होते.
१९०३ सालापर्यंत, मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण तर पूर्ण केलेच, शिवाय शिक्षक, विद्वान पंडित, कवी, निबंधकार, अनुवादक आणि वक्ता म्हणून त्यांना जेवढी मान्यता होती, तेवढी वचतच कोणा तरुणाला लाभली असेल. पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगवान प्रगती करीत असतानाच मौलानांनी राष्ट्रीय चर्चा सत्रात भाग घ्यायला प्रारंभ केला. १९०८ साली मौलानांनी ईजिप्तचा प्रवास केला होता. त्यापूर्वी थोडेसे दिवस ते बंगालचे क्रांतिकारक नेते श्यामसुंदर चक्रवर्ती यांना भेटले होते; आणि क्रांतीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ त्यांनी त्यांच्यासमोर घेतली होती.
१९२० साली गांधीजींच्या प्रस्तावावर विचार-विनिमय करण्यासाठी एक बैठक बोलवण्यात आली. स्वराज्य मिळविण्यासाठी आणि खिलाफतचा प्रश्न •सोडविण्यासाठी अहिंसा हाच सर्वात परिणामकारक उपाय आहे, असे गांधीजींनी ठासून सांगितले. या बैठकीचे अध्यक्षस्थान लाला लाजपत राय यांनी भूषविले होते. चित्तरंजन दास हेही हजर होते. या दोघांचे गांधीजींशी मतभेद होते. बिपिन चंद्र पॉल यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये तयार झालेल्या मालावर बहिष्कार घालणे, हेच सर्वोत्तम शस्त्र आहे. आक्षेप असूनही, अहिंसात्मक आंदोलन करण्याचा प्रस्ताव प्रचंड बहुमताने संमत झाले. त्यानंतर, गांधीजी, मौलाना आझ द आणि अन्य नेत्यांनी संबंध देशाचा दौरा केला. अहिंसेचा संदेश लोकांपर्यत पोचविला. मौलानांनी बहुतेक दौरा गांधीजी समवेतच केला. अनेकदा या गटात मौलाना महंमद अली आणि मौलाना शौकत अली हे असत.
१९२० च्या अखेरीस, तर्क-ए-मावाला चालू असताना कलकत्त्यात मदरसा इस्लामिया जामा मशिदीची पायाभरणी करण्यात आली. तिचे औपचारिक उद्घाटन १३ डिसेंबर १९२० रोजी गांधीजींच्या हस्ते पार पडले. हिंदु आणि मुस्लिम यांचा मोठा मेळावा भरला होता. गांधीजींनी त्यांच्या समोर भाषण केले आणि सर्वेक्षण नोंदवहीत उर्दुत लिहिले:
मार्च १९२१ मध्ये मौलाना आझाद यांनी तिसऱ्यांदा गांधीजींबरोबर पंजाबचा दौरा केला. त्यावेळी लाहोर आणिअमृतसर येथे सार्वजनिक सभांना बंदी होती. गांधीजींनी मौलानांच्या दृष्टिकोनाला पाठिंबा दिला. शुक्रवारच्या खुद्बा नंतर मौलानांनी शाही मशिदीत अंतःकरण हेलावून सोडणारे भाषण केले. सिव्हिल अॅण्ड मिलिटरीगॅझेटने नमूद केले की, हा कायदा मोडण्याचा बुध्दिपुरस्सर प्रयत्न होता आणि सरकारने ताबडतोब या शिस्तभंगाविरुध्द कारवाई केली नाही, तर अशा कृत्यांना प्रोत्साहन मिळेल त्या वृत्ताचा मथळा असा होता : "मशिदीच्या चौकातझालेले क्रांतिकारक भाषण"
एका आठवड्यानंतर मौलाना आझाद अमृतसराला पोहोचले. तेथे त्यांनी आणखी एक प्रक्षोभक भाषण केले.
२५-२६ जून १९२१ ला बिहारच्या जमियत उल्-उलेमा चे अधिवेशन मौलाना आझादांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. बिहार ओरिसातून जवळजवळ तीनशे उलेमा हजर होते.
२५ ऑगस्ट १९२१ ला आग्रा येथे झालेल्या मजलिस-ए-खिलाफत च्या अध्यक्षपदावरून मौलाना आझाद यांनी आपले भाषण वाचले. धर्म आणि कुरआन या विषयीची त्यांची सहानभूती, त्यांचे राजकीय आकलन, त्यांच्या ब्रिटिश विरोधी भावना, त्यांचे हिंदु-मुस्लिम ऐक्यासंबंधीचे विचार आणि त्यांची तीव्र स्वातंत्र्यकांक्षा यांचे प्रतिबिंब त्यात पडले असल्याने ते भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुंबईत ५ ऑक्टोबर १९२१ ला भरलेली अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीची बैठक महत्त्वाची आहे, कारण तिच्यात पुढील ठराव संमत करण्यात आला:
ज्यादिवशी ब्रिटिश राजपुत्र हिंदुस्थानच्या भूमिवर पाऊल ठेवील, त्या दिवशी संबंध हिंदुस्थानने संपावर जावे, शहरातल्या त्यांच्या अधिकृत स्वागताच्या प्रत्येक कार्यक्रमावर परिणामकारक बहिष्कार घालावा. ११ नोव्हेंबर १९२१ चा पैगाम मध्ये सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाविषयी मौलाना आझाद यांनी पुढील विचार मांडले :
सविन कायदेभंग : भारतातील भक्कम एकजुटीचा आणि दृढनिश्चयी अशा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सविनय कायदेभंगाचा ठराव एकमताने मंजूर केला आहे त्यानुसार त्याने आपल्या अस्तित्वाचा, परिणामकारतेचा आणि प्रभावाचा चिरकाल टिकणारा पुरावा सादर केला आहे. काळाची आवश्यक गरज काँग्रेसने भागविली आहे: याची नोंद इतिहासात सदैव राहील.
ब्रिटिश राजपुत्र १७ नोव्हेंबर १९२१ ला येऊन पोहोचण्याची अपेक्षा होती. काँग्रेसने सार्वजनिक संपाची घोषणा दिली होती, आणि मौलाना आझादांनी घोषित केले होते की, "हिंदुस्थानच्या इतिहासात हा दिवस संस्मरणीय ठरेल", संपूर्ण हरताळ, फक्त एक दिवस शहरे आणि भरगच्च गर्दीची ठिकाणे संपूर्णतया निर्मनुष्य झाली पाहिजेत. काँग्रेस आणि खिलाफतला जबाबदार असलेल्यांनी आवश्यक वाटल्यास, संध्याकाळी एखादी सभा घ्यावी. बहिष्कार पूर्णपणे सशस्वी झाल्याचे जाहीर करावे.
१० डिसेंबर १९२१ रोजी मौलानांना अटक झाली, विशेष (गुन्हा) शाखेचे डेप्युटी कमिशनर श्री. गोल्डी युरोपियन पोलिस इन्स्पेक्टरांना बरोबर घेऊन आले आणि त्यांनी मौलानांची चौकशी केली. १३ डिसेंबरपासून खटला सुरू झाला. ते न्यायालयात शेवटचे उभे राहिले ते ९ फेब्रुवारी १९२२ रोजी. मौलाना यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षाझाली. खटला चालू असताना मौलानांनी जे निर्भिड निवेदन केले, त्यायोगे संबंध देशात तीव्र प्रतिक्रिया उमटली. इतके ते महत्वाचे होते. स्वातंत्र्यविषयक साहित्यातील या महत्त्वाच्या वक्तव्यावर "यंग इण्डिया"त गांधीजींनी लिहिले: मौलानांनी न्यायालयात दिलेल्या जबानीची प्रत मला आताच मिळाली आहे. मौलानांच्या निवेदनाला आंतरिक असे वाडमयीन मूल्य आहे. ते जोरदार असूनही भावनेने ओथंबलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते निर्भिड आहे. त्यांचा रोख पाय मागे न घेण्याचा आणि कधीही तडजोड न करण्याचा आहे. तरीही ते गंभीर आणि पोक्त स्वरुपाचे आहे. त्याचा परिणाम सार्वत्रिक आहे, जणू आहेत. काही मौलाना खिलाफत आणि राष्ट्रवादावर व्याख्यान देत
मौलाना आझाद यांची सुटका होण्यापूर्वी सहा महिने अगोदर श्री. चित्तरंजन दास यांची शिक्षेची मुदत कमी करण्यात आली होती. ते १९२२ साल होते. काँग्रेसची बैठक गया येथे भरविण्याचे ठरले होते. स्वागत समितीने चितरंजन दास यांची अध्यक्षपदी निवड केली. अध्यक्षीय भाषणात चितरंजन दास यांनी सुचविले की, काँग्रेसने कौंसिल-प्रवेशाचा कार्यक्रम स्वीकारावा आणि घटना समितीत संघर्ष चालू ठेवावा. राजगोपालाचार्य यांच्या नेतृत्वाखालचा एक गट याविरुध्द होता, कारण त्याला अशी काळजी वाटत होती की, हा प्रस्ताव मान्य केल्यास गांधीजींचे नेतृत्व दुर्बलझाले आहे असा त्याचा गर्भितार्थ निघेल.
चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आणि हकीम अजमलखान यांनी मिळून ठरविले की, स्वराज्य पक्षात आणि कौन्सिलात प्रवेश करावा. गांधीजींच्या निकटच्या शिष्यांनी उघडपणे या भूमिकेला विरोध केला. परिणामी, काँग्रेस दोन गटात दुभंगली गेली. एका गटात चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू आणि हकीम अजमल खान हे होते. त्यांना "सुधारणावादी" असे म्हणत असत तर दुसऱ्या गटात राजाजी, सरदार पटेल आणि राजेंद्र प्रसाद होते त्यांना "सुधरणाविरोधी" म्हणत. दोन्ही गट हमरीतुमरीवर आले याचा परिणाम असा झाला की, ब्रिटिशांना व्हावयाचा खरा विरोध कमकुवत झाला.
दोन्ही बाजू मौलाना आझादांना आपल्याकडे वळविण्यात प्रयत्नशील झाल्या होत्या. परंतु मौलानांनी स्वतःला अलिप्त ठेवले. या दोन्ही गटातील दरी बुजविण्याचे अखण्ड प्रयत्न त्यांनी केले. शेवटी, दोन्ही गटांनी मुंबईला विशेष अधिवेशन बोलविण्याचे कबूल केले. ऑगस्ट १९२३ मध्ये भरलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद हेच होते. नंतर सप्टेंबर मध्ये हीच बैठक दिल्लीत भरली. त्यावेळी मौलाना आझाद यांचे वय ३५ वर्षे होते. आतापर्यंत एवढ्या तरुण वयात काँग्रेसचे अध्यक्षपद कोणालाही मिळाले नव्हते. अध्यक्षीय भाषणात, मौलाना आझाद यांनी तत्कालीन प्रश्न, तुर्कस्थानातील महान विजय, आधुनिक पौर्वात्य देश, अरबी द्वीपकल्प, कॉन्स्टॅन्टिनोपल, कायदे मंडळातील ऐक्य, राष्ट्रीय लढा आणि अहिंसा या सर्वांचा ऊहापोह केला. ह्या विषयांच्या पृथक्करणाने त्यांनी श्रोत्यांना आपल्या जागी खिळवून मंत्रमुग्ध केले.
१९२८ च्या प्रारंभीच भारतीय लोक सायमन कमिशनाच्या अधिकाधिक विरोधात गेले. त्या शिष्टमंडळाविरुध्द मौलानांनी रावळपिंडी, लाहोर, अमृतसर आणि दिल्ली येथे भाषणे दिली.
भारत स्वातंत्र्य हासिल करतो या ग्रंथात मौलाना आझाद यांनी लिहिले की, सायमन कमिशनच्या नेमणुकीने आणि आगमनाने संताप वाढविला आहे. ३ फेब्रुवारी १९२८ ला कमिशन मुंबईला पोचले, तेव्हा त्यांच्यावर संपूर्ण बहिष्कार टाकण्यात आला होता.
२५ डिसेंबर १९२९ ला जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची योजना सादर केली, ती एकमताने मंजूर झाली. त्यासभेच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद हे होते. त्या योजनेची माहिती ब्रिटिश सरकारला देण्यात आली. आणि सरकारला कळविण्यात आले की, एका वर्षाच्या आत ती त्यांनी स्वीकारली नाही, तर राष्ट्रीय आंदोलन छेडण्यात येईल. योजना स्वीकारण्यास ब्रिटिशांनी साफ नकार दिला. मिठावरची कराचा निषेध म्हणून जेव्हा काँग्रेसने सत्याग्रह घोषित केला, तेव्हा त्याच्या यशाबद्दल लोक सांशक होते. तथापि, लौकरच त्या आंदोलनाने राष्ट्रीय स्वरुप धारण केले. मौलाना आझाद यांच्या प्रभावाने बंगाल, पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांतातील मुसलमानांनी त्या सत्याग्रहात भाग घेतला. आंदोलनाचे यश पाहून सरकार नाराज झाले. प्रत्त्युतर म्हणून कॉंग्रेस संघटना बेकायदा असल्याचे सरकारने जाहीर केले. संघटनेच्या किंग कमिटीच्या सदस्याचा धरपकड करण्याच आदर्श सरकारने काढले. प्रत्येक अध्यक्षाला आपला वारसदार नेमण्याचे अधिकार दिलेला होता. प्रथम गांधीजींना अटक करण्यात आली; नंतर अबुल कलाम यांना ते अध्यक्षपदावर फक्त अकरा दिवस होते. अटकेपूर्वी त्यांनी आपला वारसदार म्हणून डॉ. अन्सारी यांना नियुक्त केले. ५ मे १९३० ला मौलानांना मीरत येथे अटक करण्यात आली तेथील तुरुंगात त्यांना नऊ महिने डांबून ठेवण्यात आले. तेथेच १६ नोव्हेंबर १९३० ला मौलाना यांनी तरजुमान-उल्- कुरआन ची प्रस्तावना पूर्ण केली. तेव्हा ब्रिटिशांविरुध्दचा संघर्ष चांगलाच तीव्र झाला होता. शेवटी १९३१ साली "गांधी आयर्विन करारानुसार" लॉर्ड आयर्विन यांनी सर्व राजबंद्यांची सुटका केली.
१९३२ साली काँग्रेसने पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. १५ फेब्रुवारीला त्यावेळचे प्रमुख सत्याग्रही सरदार शार्दुल सिंग कोईशार यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्या जागी मौलाना आझाद यांची नियुक्ती झाली. सरकारने त्यांच्यावर असा निर्बंध घातला की, एक महिना राजकारणात भाग घ्यायचा नाही. परंतु मौलाना आझाद यांनी तो पाळला नाही. ह्या उघड कायदेभंगाचा परिणाम म्हणजे त्यांना पुन्हा दिल्लीत तुरुंगवास सोसावा लागला. हा त्यांचा चौथ्यांदा तुरुंगवास होता. १ जानेवारी १९३३ ला त्यांची त्यातून सुटका झाली.
३ सप्टेंबर १९३९ ला दुसऱ्या जागतिक महायुध्दाचा भडका उडाल्याबरोबर हिंदुस्थानातही भीतीची लाट उठली. त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्षपद ही मोक्याची नेमणूक होती. एक वर्षापूर्वी हे अध्यक्षपद मौलानांनी नाकारले होते. आता त्यांना ते स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता; कारण देताना ते म्हणाले :
यावेळी नकार देणे म्हणजे मी माझ्या कर्तव्यापासून पदच्युत होणे होय. ह्या संदवेदनाक्षम कालखंडात आपण अवश्य कोणत्याही प्रकारे देशाची सेवा -करावी, अशी मौलानांची विचार सरणी होती. म्हणून, गांधीजींनी जेव्हा अध्यक्षपद स्वीकारा, अशी वारंवार विनंती केली, तेव्हा मौलाना कबूल झाले. १५ फेब्रुवारी १९४० ला एम. एन. रॉय यांच्याविरुध्द त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविली आणि १८३ विरुध्द १८३४ मतांनी मौलाना जिंकले.
निवडणूकीनंतर त्यांनी डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि वर्किंग कमिटीत : सरोजिनी नायडू, वल्लभभाई पटेल, शेठ जमनालाल बजाज, जे. बी. कृपलानी, खान अब्दुल गफार खान, भुलाभाई देसाई, शंकरराव देव, प्रफुल्लचंद्र घोष, राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचार्य, सर सय्यद अहमद आणि असफ अली हे सभासद होते. एकोणिसाव्या सभासदाचे नाव अद्याप जाहीर व्हायचे होते, पण अधिवेशनानंतर लगेचच त्यांना अटक झाल्याने, ती नेमणूक घोषित करायची राहून गेली.
त्या कालखंडात प्रसिध्द अमेरिकन पत्रकार जॉन गंथर यांनी हिंदुस्थानला भेट दिली. ते राजकीय पुढाऱ्यांना भेटले; आणि काही काँग्रेसजनान विषयी त्यांनी आपली मतेही व्यक्त केली. गंथर लिहितात : प्रादेशिक त्रिमूर्तीपैकी नंतरचे सदस्य मौलाना अबुल कलाम आझाद हे पटेलांपेक्षा खूपच वेगळे पुढारी आहेत. हे दोघे अगदी भिन्न जगांचे प्रतिनिधित्व करतात. पण त्यांच्या विविधतेवर काँग्रेसचा पूल आहे. पूर्वेकडील एक अत्यंत मोठा विद्वान, पुस्तकातील किडा, बुध्दिजीवी, प्रकाण्डपंडित, कुराणावरील सर्वोत्तम आधुनिक समीक्षेचे लेखक, धर्मशास्त्रज्ञ असे मोलाना हे पन्नाशीचे गृहस्थ आहेत. धर्मशास्त्रीय प्रशिक्षणाचे पाईक आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा अद्वितीय संगम म्हणजे मौलाना आझाद, या त्रिमूर्ती पैकी पटेल हे कठोर वज्रमुष्टी आहेत, तर मौलाना आझाद म्हणजे अध्यात्मिक प्रगल्भता आणि बुध्दीचे प्रतीक आहेत, तर राजेंद्र प्रसाद है
हृदयासारखे आहेत.
महत्त्वाच्या परदेशी पत्रकाराने आझादांची तोंडभर स्तुती केली, यावरून हेच सिध्द होते की, त्यांनी स्वदेशातच आपली राजकीय प्रतिमा यशस्वीरीत्या उभी केली, आणि मायदेशात आपले वेगळेपण सिध्द केले असे नव्हे, तर त्यांची ख्याती संबंध पत्रकार जगतात पसरलेली होती.
२७ मार्च १९४० ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ५३ वे अधिवेशन बिहारमध्ये भरले. त्यावेळी मौलानांनी केलेले भाषण राजकीय इतिहास घडविणारे होते. समस्त कलकत्त्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता :
मी मुसलमान आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. त्यांची तेराशे वर्षापूर्वीची परंपरा हा माझा वारसा आहे. त्यातला अगदी छोटासा भाग सुध्दा वाया जाऊ द्यायला मी तयार नाही. इस्लामचे शिक्षण, इतिहास, तत्वज्ञान आणि संस्कृती हा माझा खजिना आहे. त्याचे संरक्षण करणे, हे माझे कर्तव्य आहे. त्याच्या धार्मिक सांस्कृतिक वातावरणात एक मुसलमान म्हणून माझी खास ओळख आहे. त्यात कुणी ढवळाढवळ केलेली मला मुळीच खपणार नाही. ह्या संवेदनाक्षमतांखेरीज माझ्यापाशी आणखी एक विशेष भावना आहे ; ती माझ्या वास्तव्य जीवनातून उदयाला आलेली आहे. इस्लामची सेवा मला थोपवू शकत नाही. खरे तर तीच या मार्गावरील माझी मार्गदर्शक आहे. मी भारतीय आहे, हे मी अभिमानाने सांगतो. भारतीय राष्ट्रीयत्वाचा मी एक अविभाज्य असा भाग आहे. माझे महत्व असे की, त्याच्या अभिमानाला लावलेला शुभसूचक तीळ अपुरा आहे. त्याच्या घडणीचा मी एक अविभाज्य घटक आहे. ही माझी श्रध्दा मी कधीही सोडणार नाही. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मौलाना आझाद पंजाबला निघाले. ते परत येताच त्यांना अलाहाबादच्या पुरुषोत्तम पार्क येथे पाचव्यांदा अटक झाली. १३ डिसेंबर १९४० ला झालेली ही अटक स्फोटक भाषणाबद्दल होती. त्यांना १८ महिने अलाहाबादच्या नैनी तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. नंतर कैलास नाथ काटजू यांनाही त्याच तुरुंगात आणण्यात आले.
४ डिसेंबर १९४९ ला मौलाना आझाद आणि जवाहरलाल नेहरू यांची चौदा महिन्यांच्या कारावासानंतर सुटका झाली. त्यावेळी मौलाना आझाद यांनी मानसिक आणि भावनिक स्थिती काय होती ते पुढील लिखाणावरुन कळले :
माझ्या सुटकेचा हुकूम हातात पडला, तेव्हा माझ्या मानसिक प्रक्षुब्ध्तेला उधाण आलेले होते. हे स्वातंत्र्य म्हणजे माझ्या स्वाभिमानावर तडाखा होता. पूर्वीमाझी सुटका व्हायची, तेव्हा माफक प्रमाणावर का होईना, यश मिळाल्याची भावना असायची. युध्द सुरू होऊन दोन वर्षे झाली, तरी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही कोणतेही धाडसी पाऊल टाकलेले नव्हते, या विचारानेच मी फार अस्वस्थ होतो. जणू काही आम्ही आमच्या भविष्याचे शिल्पकार नव्हे, तर परिस्थितीचे बळी होतो.
एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने प्रश्न सोडविण्यात गेले. याच कालखंडात त्यांची पत्नी झुलेखा बेगम यांची प्रकृती खालावत चालली आहे, ही आझादांच्या लक्षात आले नाही. प्रकृतीला आराम पडावा म्हणून त्यांना रांचीला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्या परतल्या, तेव्हा मौलाना तीन आठवड्यांसाठी कलकत्त्याला गेले.
२९ जुलैला ते परत आले, ते इन्फलुएन्झाने आजारी होऊनच. दरम्यान, झुलेखा बेगम यांची प्रकृती आणखीच बिघडली होती. मौलाना मुंबईला रवानाझाले, तेव्हा त्या खूपच आजारी होत्या. ४ ऑगस्टला मौलाना मुंबईला पोचले, तेव्हा ते स्वतः आजारी असूनही धांदल-गडबडीच्या कार्यवाहीत गुंतून पडले. ४ ते ७ ऑगस्ट परिषदेचे अधिवेशन भरले. ७ ऑगस्टला दुपार पासून ते अ. भा. काँग्रेस समितीची बैठक सुरूझाली. ही कार्यकारी ८ ऑगस्टला रात्री ११ वाजेपर्यंत चालली. दुसऱ्याच दिवशी मौलानांना सहाव्यांदा अटक झाली.
त्यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, डॉ. सय्यद मेहमूद, अली आणि गांधीजीही होते. गांधीजी वगळून बाकीच्यांना अहमदनगरच्या तुरुंगात धाडण्यात आले. मौलानांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याचे २ ऑगस्टचे पत्र तेथेच त्यांना मिळाले. आपले दुःख मौलानांनी कोणालाही दाखवले नाही. झुलेखा बेगम मृत्युशय्येवर असल्याची आणखी दोन पत्रे पाठोपाठ आली. मौलाना प्रगाढ दुःखात बुडून गेले.
१९ एप्रिल १९४३ ला मौलानांना त्यांच्या पत्नीच्या निधनाची दुःखद वार्ता मिळाली. मौलानांच्या जीवनातील तो खडतर काळ होता. व्यक्तिगत दुःख भोगीत असलेले ते राजकीय कैदी होते. तरीही त्यांनी स्वतःला कोलमडून पडू दिले नाही. मरण समयी त्यांच्या पत्नीचे वय पंचेचाळीस वर्षांचे होते.
एप्रिल १९४५ मध्ये मौलानांना अहमदनगर येथून बांकुरा तुरुंगात हलविण्यात आले. त्यानंतर थोड्याच महिन्यांनी, जून १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.
७ जुलै १९४६ ला अ. भा. काँग्रेस समितीचे अधिवेशन मुंबईत बोलाविण्यात आले, ६ जुलैला वकिंग कमिटीने अ. भा. काँग्रेस ह्या सगळ्या घटना घडत असताना अ.भा. काँग्रेस समितीच्या ठरावाला प्रतिसाद म्हणून व्हाईसरॉयनी हंगामी सरकार बनविण्यासाठी नेहरूंना पाचारण केले; मात्र नेहरूंच्या या हंगामी सरकारात सामील व्हायला जिना यांनी नकार दिला.
ब्रिटिश सरकारने काँग्रेसला हंगामी सरकार बनविण्यास सांगितले त्यानुसार १७ ऑगस्टला आझाद, जवाहरलाल नेहरू, पटेल आणि राजेंद्रप्रसाद यांची दिल्लीत एक बैठक झाली आझादांनी सरकारमध्ये सामील व्हावे, अशी गांधीजींची आणि अन्य काही नेत्यांची इच्छा होती. पण खूप विचार केल्यानंतर आझादांनी हा देकार नाकारला.
हंगामी सरकारात मुस्लिम लीगने सामील व्हावे, अशी वॅव्हेल यांची इच्छा होती; तदनुसार जिनांना दिल्लीला आमंत्रित करण्यात आले. अनेक बैठकी आणि चर्चाझाल्यानंतर १५ ऑक्टोबर १९४६ ला मुस्लिम लीगकडे अर्थखात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. ह्याविरुध्द मौलाना प्रथमपासून विचार मांडीत होते. त्यामुळे दीर्घकालीन समस्या निर्माण होतील, हे त्यांना ठाऊक होते. मौलानांची भीती खरी होती, हे काळाने सिध्द केले.
११ डिसेंबर १९४६ ला घटना समितीची पहिली बैठक आली. ह्या असेंब्लीचे अध्यक्ष कोणी व्हावे?, असा प्रश्न उपस्थितझाला. सरकार बाहेरच्या कोणाची तरी निवड करावी, असे जवाहरलाल आणि सरदार पटेल या दोघांनाही वाटत होते. हे पद स्वीकारण्यासाठी मौलानांचे मन वळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जेव्हा मौलानांनी नकार दिला, तेव्हा डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड करण्यात आली. १५ ऑगस्ट १९४७ ला मौलानांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारली.
त्यानंतर भारताच्या गव्हर्नर-जनरल पदावर लॉर्ड मॉंटबॅटन यांची नेमणूकझाली. ३० जून १९४८ पूर्वी सत्तांतर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. २२ मार्चला ते भारतात पोचले, अणि २४ मार्च रोजी त्यांनी गव्हर्नर-जनरल पदाची सूत्रे स्वीकारली. आगमनानंतर जवळ जवळ लगेचच त्यांनी मौलानांची भेट घेतली; आणि ताबडतोब सत्तांतर व्हावे, अशी ब्रिटिशांची इच्छा असल्याचे त्यांना सांगितले.
कार्यकारी मंडळाच्या पातळीवर परस्पर अविश्वासामुळे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या दरम्यानचे संबंध बिघडत चालले होते. परिणामी देशाची फाळणी करण्याच्या दृष्टीने लॉर्ड मॉंटबॅटन यांना वातारवण निर्मितीसाठी अनेक चांगल्या संधी मिळाल्या, त्यांनी प्रथम फाळणीचा प्रस्ताव सादर केल्यावर त्यास अनुकूल असे सरदार वल्लभभाई पटेल हेच एकटे नेते होते. नंतर जवाहरलाल नेहरूंचा विरोध कालौघात सैल करण्यात लॉर्ड मौंटबॅटन यांना यश आले.
नेहरू आणि सरदार पटेल यांची मते फाळणीला अनुकूल करून घेण्यात मॉंटबॅटन यशस्वी झाल्याचे मौलानांना कळले, तेव्हा त्यांची दारुण निराशा झाली. नंतर ते जेव्हा गांधीजींना भेटले, तेव्हा प्रारंभी फाळणी या शब्दाचा तिटकारा असलेला नेता आता तिला अनुकूल बनू लागलाआहे, असे मौलानांना दिसले. निराश होऊन त्यांनी मौंटबॅटन यांना आपली कार्यवाही दोन वर्षे रोखून ठेवण्याची विनंती केली. 'कॅबिनेट मिशन' ची योजना सरकार फेटाळणार नाही, अशी त्यांची खात्री होती. लौकरच त्यांचा अपेक्षाभंगझाला. मॉंटबॅटन इंग्लंडला पोचताच, दोन दिवसांच्या आत फाळणीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.
३० मे रोजी मौंटबॅटन दिल्लीला परतले. २ जूनला त्यांनी काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या प्रतिनिधीना बोलणी करण्यासाठी पाचारण केले; आणि ३० जूनला "श्वेतपत्रिका" प्रसिध्द झाली. भारताची फाळणी झाल्याची बातमी बाहेर फुटली.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ३० जून रोजी वकिंग कमिटीची बैठक भरली. वायव्य सरहद्द प्रांताचे काय, हा पहिला प्रश्न कमिटीपुढे होता. १४ जुलैला अ.भा. काँग्रेस समितीची सभा झाली. पं. गोविंदवल्लभ पंत यांनी फाळणीवर भाषण केले. सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांचा त्यांना पाठिंबा होता. आपल्या भाषणात मौलाना म्हणाले:
वर्किंग कमिटीने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी घटनांचा परिपाक आहे. फाळणी ही भारताची शोकांतिका आहे. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करूनही अपयशी ठरलो. एवढेच आम्ही म्हणू शकतो. तथापी, राष्ट्र हे एक आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आपण पराभव स्वीकारू या. पण आपली संस्कृती अविभाज्य आहे याची खात्री असावी म्हणून प्रयत्न करू या.
२६ जानेवारी १९५० ला भारत हे लोकशाहीवादी प्रजासत्ताक बनले, आणि डॉ. राजेंद्रप्रसाद हे राष्ट्रपती, जवाहरलाल नेहरु हे पंतप्रधान आणि मौलाना आझाद शिक्षण मंत्री झाले.
देशाच्या विविध भागातल्या संस्थातून तांत्रिक शिक्षण द्यायची मौलानांची इच्छा होती. खरगपूर इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे मौलानांच्या प्रयत्नांचे फळ होते; आणि आजमितीला ती प्रतिष्ठित संस्था मानली जाते. १९ ऑगस्ट १९५१ ला तिचे उद्घाटन करताना मौलाना म्हणाले :
मी शिक्षण मंत्र्यांचे पद स्वीकरल्यापासून घेतलेला पहिला निर्णय असा की, आपण तांत्रिक शिक्षणात स्वयंपूर्ण व्हावे. आपली तरूण मुले तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने परदेशात जातात. आपण अशी अत्युकृष्ट केंद्रे इथेच स्थापन करावीत, की इतर देश उच्च शिक्षणासाठी आपले विद्यार्थी इकडे पाठवतील.
वैज्ञानिक शिक्षणाचीही मोलानांना तितकीच काळजी होती. म्हणून डॉ. शांती स्वरुप भटनागर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक समिती गठित केली. वैज्ञानिक क्षेत्रात असाधारण बुध्दिमत्ता दाखविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे, हा तिचा हेतू होता. त्यांना शक्य तेवढे सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यात यावे, असे मौलानांना वाटे.
अशा रीतीने वैज्ञानिक आणि तांत्रिक संघटना निर्माण करण्यात मौलानांना यश आले. आज या संघटना अत्यंत कार्यक्षमतेने कार्य करीत आहेत. ह्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या युगात आपला देश इतर अनेक देशांच्या तुलनेत पुढे चालला आहे, याचे श्रेय ह्या संस्थांना आहे. शैक्षणिक प्रशासन आणि संशोधन क्षेत्रातील सुधारणा घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
१९ फेब्रुवारी सकाळी मौलानांना हृदयविकाराचा झटका आला. थोड्याच वेळात त्यांच्या आजारपणाची बातमी देशभर पसरली. तीन दिवस मौलाना अर्धवट शुध्दित होते. एकदा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा पंडित नेहरु त्यांच्या जवळ होते. मौलाना म्हणाले, "बरयं येतो"
कलकत्त्याचे डॉ. बिधनचंद्र रॉय यांच्यासह सर्वोत्तम डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. २२ फेब्रुवारी १९५८ रोजी पहाटे २-१५ वाजता मौलाना इहलोक सोडून गेले. दुपारी १ वाजता हजारो शोकग्रस्तांनी मौलानांचे पार्थिव जामा मशिद आणि लाल किल्ला यांच्या दरम्यानच्या खुल्या मैदानावर नेले. नमाज-ए-जनाजाला जवळ जवळ दोन लाख लोक होते. त्यांच्या पसंतीच्या मैदानावर मृत देहाच्या अवशेषांचे दफन केल्यावर लोक परतले, ते कधीही भरुन न येणाऱ्या हानीची भावना घेऊनच.
◆◆◆◆◆◆◆◆ ◆ ◆■◆◆◆
संदर्भ - 1)स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लिमांचे योगदान
-- सोमनाथ रामचंद्र देशकर
2)स्तोत्र :लेखक: अब्दुल क्वाकी देसनवी लिखित मौलाना अब्दुल कलाम आझाद
अनुवादक : रंगनाथ कुलकर्णी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
संकलन- अताउल्लाखा रफिक खा पठाण सर
सेवानिवृत्त शिक्षक
टूनकी,बुलढाणा महाराष्ट्र
9423338726
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.