यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*
· लातूरकरांच्या सहभागाने वृक्ष संवर्धनाची चळवळ रुजविणार
· 1 जूनपासून स्वागत, सत्काराला रोपटे देण्याचे आवाहन
· प्रत्येक कुटुंबाने गच्ची, आंगणात बगीचा साकारावा
लातूर, दि. 15 (जिमाका) : आपल्या जिल्ह्यात सर्वात कमी वृक्षाच्छादन असल्याने जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प प्रत्येक लातूरकराने करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, उपवन संरक्षक वैशाली तांबे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. भामरे, उपपर्देशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्यासह पर्यावरण, वन संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आवश्यक आहे. ही चळवळ केवळ ठराविक व्यक्तीपर्यंत मर्यादित न राहता, तिला लोकचळवळीचे स्वरूप येणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, घराच्या गच्चीमध्ये, शेतामध्ये यंदाच्या पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्या वृक्षाचे संवर्धन करावे. यासाठी ‘माय गार्डन, माय प्राईड’ मोहीम राबविण्यात येईल. तसेच स्वयंसेवी संस्थांनी शहरी भागामधील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून ‘ग्रीन कॉरिडोर’ निर्माण करण्याची संकल्पना राबवावी. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य घ्यावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
ग्रामीण भागामध्ये त्या-त्या क्षेत्रानुसार वृक्षांच्या प्रजातीची लागवड करण्यासाठी जिल्हा परिषदेने गावनिहाय प्रत्येकी दहा प्रजातीच्या वृक्षांची यादी तयार करावी. तसेच काही गावांमध्ये आमराई तयार करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने प्रयत्न करावेत. शाळा, महाविद्यालय स्तरावर विशेष उपक्रम राबवून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घरी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. नागरिकांना आपल्या घरी, अंगणात वृक्षारोपण करण्यासाठी स्वस्त दरात रोपे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यामध्ये जिल्ह्यातील सर्व नर्सरी यांचा सहभाग घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
*सत्कार आणि स्वागताला आता रोपे स्वीकारण्यात येणार*
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींकडून, तसेच एखाद्या कार्यक्रमास गेल्यानंतर सत्कार, स्वागताला बुके ऐवजी बुक (पुस्तक) स्वीकारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यापूर्वी घेतला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमांमध्येही पुस्तक देवूनच सर्वांचे स्वागत, सत्कार केले जात होते. आता 1 जूनपासून पावसाळा संपेपर्यंत बुके आणि बुक ऐवजी वृक्षाचे रोपटेच स्वीकारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी घेतला आहे. इतरही शासकीय कार्यालये, खासगी कार्यक्रमातही याप्रकारे सत्कार, स्वागताला रोपे देवून वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.