गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गाळ उपसा कामांची
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी
· घरणी प्रकल्पातील 6 लाख घनमीटर गाळाचा लोकसहभागातून उपसा
· उमरगा लघुपाटबंधारे तलावातील 32 हजार घनमीटर गाळ उपसा
लातूर, दि. 16 (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत शिरूर अनंतपाळ तालुक्याती घरणी मध्यम प्रकल्प आणि उमरगा लघु पाटबंधारे तलावातील गाळ उपसा करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या प्रकल्पांना भेट देवून तेथील कामाची पाहणी केली. या कामामुळे शेतजमीन सुपीक बनण्यासोबतच प्रकल्पाची साठवण क्षमता वाढण्यासाठीही मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, शिरूर अनंतपाळचे तहसीलदार गोविंद पेदेवाड यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत घरणी मध्यम प्रकल्पातून 8 ते 9 गावातील शेतकऱ्यांनी लोक सहभागातून गाळाचा उपसा केला आहे. सुमारे 6 लाख 10 हजार घनमीटर गाळ उपसा करून शेतकऱ्यांनी स्वखर्चाने आपल्या शेतात नेवून टाकला आहे. यामुळे प्रकल्पाच्या साठवण क्षमतेत अंदाजे 6 कोटी लिटरणे वाढ होणार आहे. तसेच उमरदरा लघु पाटबंधारे तलावातून 32 हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला असून जवळपास 46 शेतकऱ्यांनी हा गाळ आपल्या शेतात टाकल्याने जमिनीतील सुपीकता वाढणार आहे. यासोबतच प्रकल्पाच्या साठवण क्षमतेत 32 लाख लिटरने वाढ होणार असल्याचे लघु पाटबंधारे आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करून शेतात टाकल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होईल. या गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे, तसेच प्रकल्पाची साठवण क्षमता वाढल्याने या वाढीव पाणीसाठ्याचा सिंचनासाठीही लाभ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी व्हावे. गाळ उपसा करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या सभोवतील लोक सहभागातून वृक्षारोपण करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांनीही आपल्या शेताच्या बांधावर फळझाडे लावून वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होणायचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.