स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी लिंगायत महासंघ झटत आहे - प्रा.सुदर्शन बिरादार
लातूर ः मागील काळात अनेक स्वाभिमानी लिंगायत माणसे होती. आयुष्यभर त्यांनी नितीमत्तेने व स्वाभिमानाने जीवन जगून समाजाला नावलौकिक मिळवून दिला हाता. तोच स्वाभिमान परत निर्माण करण्यासाठी लिंगायत महासंघ ही संघटना झटत असल्याचे मत रविवारी झालेल्या प्रमुख जिल्हा पदाधिकार्यांच्या बैठकीत बोलतांना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी मांडले.
लिंगायत महासंघाच्या नूतन प्रमुख पदाधिकार्यांची बैठक लातूर येथे रविवारी पार पडली. कोरोनाची साथ चालू असल्याने मोजक्याच व प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रा.सुदर्शनराव बिरादार बोलतांना पुढे म्हणाले, लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे मागील सरकारने आश्वासन देवूनही आरक्षण दिले नाही व समाजाला फसवले. निवडणूकीत आघाडी सरकारच्या बाजूने समाज उभा राहिला होता. आता या शासनाकडून लिंगायत आरक्षण हे मिळवून घ्यायचेच आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात सरकारला व प्रशासनाला यश आल्यानंतर आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करण्यात येईल. लिंगायत समाजाला पुढे नेण्यासाठी लिंगायत नेत्यांनी कांहीही केलेले नाही. लिंगायत समाजाची त्यांच्याकडूनही फसवणूक झालेली असून त्यामुळे समाजाची सर्वच क्षेत्रात घसरण झाली व समाजाचे वैभवाचे दिवस संपले. आता हे स्वाभिमानाचे व वैभवाचे दिवस परत आणण्यासाठीच लिंगायत महासंघ झटत आहे. कार्यकर्त्यांनी पुढार्यांच्या नादी न लागता स्वतःचे काम स्वतः करावे व त्यासाठी संघटना त्यांच्या पाठीशी नेहमीच राहिल अशी ग्वाही देवून नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्यांना निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
या बैठकीला मार्गदर्शन करतांना नूतन जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ.काशिनाथ राजे म्हणाले प्रा.सुदर्शनराव बिरादार हे अतिशय प्रामाणिक व ध्येयवादी व्यक्तीमत्व आहे. गेल्या 20 वर्षापासून त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. मला लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष केल्याबद्दल त्यांचे आभार मानले व मरेपर्यंत प्रा.सुदर्शन बिरादार सरांच्या पाठिशी तन-मन-धनाने उभे राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा सहसचिव जी.जी.ब्रम्हवाले, जिल्हा उपाध्यक्ष सिद्रामप्पा पोपडे, जिल्हा कोषाध्यक्ष माणिक मरळे, सुर्यकांत मळगे आदिंची भाषणे झाली.
या बैठकीला लिंगायत महासंघाचे जिल्हा संघटक नागनाथअप्पा भुरके, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुंजारे, लातूर शहराध्यक्ष परमेश्वर पाटील, उदगीर तालुकाध्यक्ष अमरनाथ मुळे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भातमोडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मुळे, जिल्हा सचिव माणिकअप्पा कोकणे, शहर सरचिटणीस सुर्यकांत थोटे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पाटील भडीकर, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य शिवदास लोहारे, सहसचिव विजयकुमार कुडूंबले, विश्वनाथ मिटकरी, जिल्हा सहसचिव राजेश्वर हुडगे, जिल्हा सदस्य रमेशप्पा वेरूळे, तुकाराम कावळे, मनोज पोतदार, जयराज बेलुरे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी जयशंकर लोहारे, सुर्यकांत मळगे, बालाजी मिरजगावे यांनी संघटनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक शिवाजी भातमोडे यांनी केले तर आभार शिवाजी मुळै यांनी मानले असल्याचे लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.