जलशक्ती मंत्रालयाचा सर्वाधिक फायदा लातूर जिल्ह्याला होणार ः आ.संभाजी पाटील निलंगेकर
मोदी सरकारची वर्षभरातील कामगिरी सुवर्ण अक्षरांनी नोंद करणारी
लातूर(प्रतिनिधी)ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात दुसर्यांदा सरकार स्थापन झालेले आहे. या सरकारची नुकतीच वर्षपुर्ती झालेली असून या वर्षभरात मोदी सरकारने केलेली कामगिरी सुवर्ण अक्षरांनी नोंद होणारी असून या दरम्यान घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा भागातील नागरिकांना अभिमान आहे. त्याचबरोबर कोरोना संकटाचा मुकाबला करतांना केंद्र सरकारने ज्या उपाययोजना केल्या त्याची संपूर्ण जगभरातून प्रशंसा होत असून मोदी सरकारच्या या कार्यकाळात जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंत्रालयाचा सर्वाधिक फायदा लातूर जिल्ह्याला होईल असा विश्वास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील दुसर्या टर्ममधील वर्षपुर्ती झालेली असून या वर्षभरात मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ.संभाजी पाटील निलंगेकर संवाद साधत होते. यावेळी लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष तथा आ.रमेश कराड, खा.सुधाकर श्रृंगारे, आ.अभिमन्यू पवार, जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात दुसर्यांदा सरकार स्थापन झालेले असून या सरकारने समाजातील प्रत्येक घटकांच्या अपेक्षापुर्तीसाठी विविध निर्णय घेतल्याचे सांगून आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी मोदी सरकारने कोरोनासारख्या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राने जी ठोस पावले उचलेली आहेत त्याचे जगभरातून कौतुक होत असून या ठोस पावलांमुळे आज कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यात यश आले असल्याचे स्पष्ट केले. जगातील 14 प्रगत देशांची एकत्रीत लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या एकसारखी असून या 14 देशांपेक्षा भारतातील मृत्यूदर कमी असल्याचेही सांगितले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोदी सरकारने व्हेंटीलेटर, पीपीई कीट, एन95 मास्क यासारख्या आवश्यक सामुग्री व निधी कोणताही दुजाभाव न करता देशातील सर्व राज्यांना दिला आहे. विशेषतः महाराष्ट्र सरकारला 28 हजार 104 कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर लॉकडाऊनचा फटका कामगारांसह सर्वसामान्य जनतेला बसू नये याची विशेष दक्षता घेतलेली असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 1 लाख 70 हजार कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा करीत 80 कोटी गरीब लोकांना 5 महिने दर महा प्रतीकुटूंब मोफत गहु, तांदुळ आणि दाळ याचा पुरवठाही केला आहे. जनधन खात्याच्या माध्यमातून 20 कोटी महिलांना 3 महिने दरमहा 500 रूपये खात्यात जमा करण्यात आले असून 8 कोटी घरांमध्ये 3 गॅस सिलेंडरही मोफत पुरवठा करण्यात आलेले आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 8 कोटी 70 लाख शेतकर्यांच्या खात्यात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात प्रत्येकी 2 हजार रूपये पाठविण्यात आलेले आहे. बांधकाम कामगार कल्याण निधीमधील रक्कम वापरण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला आदेशित केलेले असून या माध्यमातून सव्वा दोन कोटी कामगारांना 3 हजार 950 कोटी रूपयांची मदत करण्यात आलेली आहे. याप्रकारच्या विविध माध्यमातून लॉकडाऊन दरम्यान वेगवेगळ्या समाज घटकांना मोदी सरकारने मदत केलेली असून आता देशाला कायमस्वरूपी स्वंयपूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सुरूवात केलेली असून या योजनेच्या माध्यमातून भारत निश्चीतच जगभरात आपला वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अनेक एैतिहासिक निर्णय घेतलेले असून यामध्ये कलम 370 हटविणे, तीहेरी तलाक रद्द करणे. नागरीकत्व सुधारणा कायदा आमलात आणणे. यासोबतच राम मंदीर उभारणीचा शुभारंभही करण्यात आलेला आहे. या ऐतिहासिक निर्णयासोबतच बँकांचे विलगीकरण, तीन्ही सैन्य दलांचे एकत्रीत चीफ ऑफ डिफेन्स या पदाची निर्मिती करून आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गरजवंतांनाही वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळवून देण्यात मोठी मदत केली असल्याचे आ.निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. तर अटल भुजल योजना सुरू करून सात राज्यातील 8 हजार 350 गावांना या योजनेचा लाभही मिळवून दिलेला आहे. एक देश.. एक रेशनकार्ड..., प्रलंबीत असलेली निवासी बांधकाम योजना यासोबतच दहशतवाद रोखण्यासाठी कठोर कारवाईचे निर्णय घेतले गेलेले आहेत. विशेष म्हणजे या वर्षभरातच जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करून देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची योजनाही अंमलात आणण्यात येणार आहे. या मंत्रालयाचा सर्वाधीक फायदा पाणीटंचाई असलेल्या लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला होईल असा विश्वास आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अशा विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला विकास प्रवाहामध्ये सहभागी करून घेतलेले आहे. हि कामगिरी निश्चीतच सुवर्ण अक्षरांनी नोंद होणारी असून या सरकारच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम कार्यरत असणे आमच्यासाठी भाग्याचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या संकटकाळात लातूर जिल्हा भाजपाच्यावतीने गरजवंतांसाठी घरपोच जेवणाचे डब्बे, रेशन पीठ वाटप, यासोबतच डॉक्टरांसाठी पीपीई कीट, नागरीकांसाठी सॅनिटायझर वाटप यासारखे उपक्रम राबवून केंद्र व प्रदेश समितीच्यावतीने देण्यात आलेल्या सुचनेनुसार सर्व उपक्रम राबविले असल्याचे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावोळी सांगितले. जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अजुन टळलेले नसून या संकटाचा सर्वांनीच मुकाबला करणे आवश्यक असून याबाबत अधिकाधिक प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगून जिल्ह्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते या संकट काळात जिल्ह्यातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून केंद्र शासनासोबतच राज्य शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन जिल्हावासीयांनी करावे असे आवाहन यावेळी केले.
चौकट ः लोकहितासाठी बांधील
कोरोनाच्या या संकट काळात प्रत्येक लोकप्रतिनिधींनी लोकांपर्यंत पोहचून त्यांचे प्रश्न जाणून घेत त्यांना धीर देणे गरजेचे आहे. या कामात भाजपा सर्वाधीक पुढे असून सेवाभाव जोपासत जिल्ह्यातील गरजवंतांपर्यंत पोहचण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न केलेला असून आगामी काळातही लोकहितासाठी आम्ही बांधील असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या खरीप पेरणीचा हंगाम असून राज्यशासन व त्यांचे जिल्ह्यातील प्रतिनिधी शेतकर्यांना मदत पोहचविण्यात अपयशी ठरत असून याबाबत आम्ही जिल्हाधिकार्यांकडे तक्रारही दाखल केली असून याची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारही आ.रमेश कराड यांनी यावेळी दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.