अन्नसुरक्षा ,अंत्योदय कुटुंब याद्यांची पडताळणी करावी
राज्य अन्न आयोगाचे सदस्य
महेश ढवळे यांची मागणी
लातूर /प्रतिनिधी :राज्यातील गरीब आणि गरजूंसाठी शासन अन्नधान्य पुरवठा करते पण अनेक ठिकाणी ते गरजूंना मिळत नाही. अन्नसुरक्षा आणि अंत्योदयच्या यादीत इतरांचाही समावेश असल्याने गरजुंवर अन्याय होत असून या याद्यांची पडताळणी करावी, अशी मागणी राज्य अन्न आयोगाचे सदस्य महेश ढवळे यांनी आयोगाच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
ढवळे यांनी निवेदनात म्हटले आहे की ,लॉकडाऊन काळामध्ये लातूर शहरी भागात धान्याचे वितरण लाभार्थ्यांपर्यंत होते का नाही हे पाहण्यासाठी आम्ही दौरे केले.काही भागात पात्र लाभार्थी अन्नसुरक्षा व अंत्योदयच्या लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले. ज्यांचे स्वतःचे घर आहे ,नोकरदार आहेत किंवा घरात दुचाकी,चार चाकी वाहन आहे अशांना अंत्योदयचा लाभ देण्यात येत आहे.ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशांनाही अन्नसुरक्षेचा पण लाभ देण्यात येत आहे. याबाबत विचारणा केली असता अन्नसुरक्षा व अंत्योदयचे जे सर्वेक्षण केले जाते ते तलाठी,ग्रामसेवक किंवा शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत न करता रास्त भाव दुकानदारामार्फत करण्यात आलेले आहे असे सांगण्यात आले.रास्त भाव दुकानदाराला हा अधिकार कोणी दिला ? लाभार्थी निवडले कसे ? असा प्रश्न आहे.
आज पुरवठा विभागामध्ये पारदर्शकता आलेली आहे.आणखी पारदर्शकता आणावयची असेल तर बदल करणे गरजेचे आहे. खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत अन्नसुरक्षा व अंत्योदय यांचा लाभ पोहोचणे गरजेचे आहे.याबाबत वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करतो.आयोगाचे अध्यक्ष,सचिव यांनी या पत्राची दखल घेऊन पडताळणी करावी.पात्र लाभार्थी निवडले जावेत जेणेकरून राज्य अन्न आयोग खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देऊ शकेल.अध्यक्षांनी जिल्ह्याच्या सर्व जिल्हा तक्रार निवारण अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अंत्योदय व अन्नसुरक्षा लाभार्थी पडताळणी बाबत सूचना कराव्यात
अशी मागणीही महेश ढवळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.