ग्रामीण भागातील नागरिकांनी covid-19 च्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे
- पालकमंत्री अमित देशमुख
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन सिलेंडर असला पाहिजे
आरोग्य विभागाने कोविड च्या अनुषंगाने औषधांचा किमान साठा उपलब्ध ठेवावा
कापूस खरेदी पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी
पीक कर्जाबाबत राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता केलीच पाहिजे
महापालिकेने "माझी हेल्थ माझ्या हाती" या धर्तीवर महापालिका क्षेत्रात साठी स्वतंत्र ॲप विकसित करावे
लातूर, दि.8:-(जिमाका):- शासन व प्रशासनाने जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे शहरी भागात चांगले पालन होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु ग्रामीण ग्रामीण भागात मास्क वापरणे व भौतिक अंतराचे पालनाबाबत अधिक प्रबोधनाची गरज असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण व संस्कृती कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित covid-19 च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी पर्यावरण, संसदीय कार्य, रोजगार हमी योजना, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे जिल्हा उपनिबंधक समृत जाधव एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी महेश कुमार मेगमाळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत सहज व सुलभ पद्धतीने मास्क पुरवठा झाला पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने रेशनिंग दुकानामधून मास्क व सॅनिटायझर चा पुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना करावा व ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तोंडावर मास्क लावणे व भौतिक अंतराचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान एक ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून ठेवावा. तसेच आरोग्य विभागाने covid-19 अनुषंगाने जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा राहील याची दक्षता घ्यावी ,असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
पानगाव येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राची सुरुवात झालेली असून या केंद्राद्वारे आतापर्यंत 700 शेतकर्यांचा कापूस खरेदी करण्यात आलेला असून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास 4700 इतकी असून उर्वरित सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झाला पाहिजे व जिल्ह्यातील एकही शेतकरी कापूस खरेदी पासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश देशमुख यांनी दिले. तसेच हरभरा व तुरीच्या खरेदीबाबत शासनाकडून मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांना पिक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पुर्तता केलीच पाहिजे। जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्जवाटप चांगल्या पद्धतीने होत आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बँका पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करत नसल्याने अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहतात. तरी जिल्हा प्रशासनाने पिक कर्ज वाटपात लक्ष घालून बॅंकांनी उद्दिष्ट पूर्तता करण्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली.
लातूर महापालिकेने शहर बस सेवा 50% क्षमतेने सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच शहर बससेवेचे मार्गाबाबत योग्य ते नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी देऊन औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर "माझी हेल्थ माझ्या हाती" या पद्धतीचे लातूर महापालिकेच्या हद्दीतील नागरिकासाठी स्वतंत्र ॲप तयार करावे असे त्यांनी निर्देशित केले.
उदगीर उपविभाग अंतर्गत आरोग्य, महसूल, पोलिस व संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत चांगले काम केले असून त्यामुळे उदगीर शहरातील कोरोना पॉझिटिव केसेस वर नियंत्रण मिळविण्यात यश आलेले आहे. याबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक असल्याचे संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी covid-19 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. सद्यस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यात 23 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असून आजपर्यंत 121 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहेत तर चार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तसेच आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेतून दहा रुग्णांना डिस्चार्ज मिळत आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या फक्त 23 इतकीच आहे. तसेच जिल्ह्यात कोठेही कोरोनाचा समुदाय संसर्ग झालेला नाही व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.