सोयाबीन उगवण न झालेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन
कृषी विभागाने पंचनामे करावेत
-संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर, दि.25(जिमाका):- उदगीर व जळकोट तालुक्यासह जिल्ह्याच्या इतर भागातून ही सोयाबीन उगवण न झाल्या बाबतच्या तक्रारी येत आहेत. या संदर्भात कृषी विभागाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत, असे निर्देश संसदीय कार्य, पर्यावरण रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
उदगीर येथे सोयाबीन उगवण न झाल्या बाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने , उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी , तहसीलदार व्यंकटेश मुंढे ,जळकोट तहसीलदार संदीप कुलकर्णी, , बसवराज पाटील नागराळकर , पंचायत समिती उप सभापती बाळासाहेब मरलापल्ले , शिवाजी मुळे , कल्याण पाटील , श्याम डावळे , ज्ञानोबा गोडभरले , गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण , तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे , तालुका कृषी अधिकारी जळकोट श्री .पवार व कृषी व महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, या वर्षीचा पाऊस वेळेवर झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी वेळेत केली होती. त्यात लातूर जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचा पेरा अधिक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती परंतु उदगीर जळकोट सह जिल्ह्याच्या इतर काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून सोयाबीन बियाण्याची उगवण झालेली नाही अशा तक्रारी येत आहेत अशा तक्रारींचे महसूल विभाग व कृषी विभागाने दखल घेऊन त्याबाबतचे पंचनामे तात्काळ करावेत असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी उदगीर व जळकोट तालुक्यातील गाव निहाय आलेल्या तक्रारींचा आढावा घेऊन त्या तक्रारीबाबत तात्काळ निपटारा करण्याचे निर्देश श्री बनसोडे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले.
* शेतकऱ्याच्या बांधावर भेट*
इसमालपूर येथील शेतकरी श्री परमेश्वर कुंडगिर यांच्या शेतात जाऊन सोयाबीन उगवण न झालेल्या क्षेत्राची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्याची सोडवणूक तत्काळ करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांवर दिल्या .यासोबतच एकूर्का येथील शेतकरी श्री .विनायक पाटील यांचे शेतात रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी क्षेत्राची पाहणी करून जास्तीत जास्त क्षेत्रावर या पेरणीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या व शेतकऱ्यांना या पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन केले.


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.