स्कुलबस चालकांच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन






स्कुलबस चालकांच्या विविध मागण्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
लातूर ः आपल्या विविध मागण्यांसाठी शहरातील स्कुलबस चालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे आमच्या परिवाराच्या पोटा-पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून मार्च महिन्यापासून आम्हाला दर महिना 10 हजार रूपये मासिक मानधन देण्यात यावे. जोपर्यंत राज्यातील सर्व शाळा नियमीत रूपाने चालू होत नाही तोपर्यंत आम्हाला सपूंर्ण महाराष्ट्रात प्रवासी वाहतुक करण्याची परवानगी द्यावी. तसेच आम्ही बँकेकडून कर्ज घेवून वाहन घेतले आहे. शासनाने वाहन कर्ज भरण्यासाठी सहा महिन्याची मुदत दिली होती परंतू आता व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने आणि शाळाही बंद असल्याने आम्ही वेळेवर कर्जफेड करू शकत नाही. अशातच अनेक खाजगी फायनान्सनी कर्जासाठी तगादा लावल्याने आणि आमच्या उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने कुटूंबांचे पोट भरणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे स्कुलबस धारकांचे वाहन कर्जाचे हप्ते संपूर्णपणे माफ करावे असेही या निवेदनात म्हटले  आहे.
राज्यातील शाळा पूर्णपणे नियमीत चालू झाल्यानंतर तीन महिन्यांनी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी अन्यथा येणार्‍या काळात शिवसम्राट विद्यार्थी वाहतुक सेना संलग्न महाराष्ट्र राज्य चालक-मालक शालेय विद्यार्थी वाहतुक संघटना विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
हे निवेदन लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे देण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष हणमंत गोत्राळ, मराठवाडा संपर्कप्रमुख राजु माळी, प्रदेशाध्यक्ष राम देवकत्ते, जिल्हाध्यक्ष दत्ता होळकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश गुंजे, कोषाध्यक्ष विशाल होके, तालुकाध्यक्ष उत्तम औसेकर, कार्याध्यक्ष रामकृष्ण साळूंके, सदस्य विठ्ठल चपटे, रतीकांत नंदगे, दत्तात्रय जोगदंड, नरसींग देवकत्ते, लक्ष्मण तुपे, संदीपान मोरे, संदीप पारवे, अशोक कापसे, शिवशंकर स्वामी, सुभाषप्पा मेंगशेट्टी, राम चाळक, गणेश खटके, राजु हिबारे, महादेव गुंजे, संतोष नादरगे, बालाजी नागिमे आदिंच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या