संचारबंदी काळातील निर्बंधावर 25 ते 31 जुलै पर्यंत अंशत: बदलचे आदेश जारी





*संचारबंदी काळातील निर्बंधावर 25 ते 31 जुलै पर्यंत

अंशत: बदलचे आदेश जारी*

लातूर,दि.24-(जिमाका)-कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे लॉकडाऊन दिनांक 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आले होते.

परंतु लातूर जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेता कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातुन खबरदारीचा उपाय म्हणून लातूर जिल्हयात दिनांक 15 जुलै 2020 ते 30 जुलै 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

               काही आस्‍थापना अत्‍यावश्‍यक बाबी / सेवा मर्यादित स्‍वरुपात व निर्बंधासह सुरु ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये  दिनांक 21 जुलै 2020 ते 24 जुलै  2020 या कालावधीकरीता कांही बाबींकरीता शिथीलता देण्‍यात आली होती. परंतु शिथिलता दिल्‍याने बाजारपेठ / सार्वजनीक ठिकाणी शारीरिक अंतराचे पालन करण्‍यात येत नसल्‍याचे तसेच कांही ठिकाणी नियमांचे उल्‍लंघन होत असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने सदर शिथिलता मागे घेवून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिनांक  25 जुलै 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीकरीता खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करण्‍यात येत आहेत.  

          लातूर जिल्‍ह्यातील सर्व आस्‍थापना दिनांक 25 जुलै 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीत खालील निर्देशांना अधिन राहून संपूर्णपणे बंद राहतील.

भाजीपाला व फळांची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील. Zomato, Swigy व तत्‍सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहील. सार्वजनिक/ खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उदयाने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी Morning walk  व Evening walk  प्रतिबंधीत राहील. उपहारगृह बार, लॉज, हॉटेल्‍स (कोविड-19 करीता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद राहतील. सर्व केश कर्तनालय/सलून/ब्‍युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील. मटन, चिकन, अंडी, मासे इत्‍यादी ची विक्री संपूर्णतः बंद राहतील. शाळा, महाविदयालय, शैक्षणिक संस्‍था, प्रशिक्षण संस्‍था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतःबंद राहतील.

          सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद राहतील तथापी, अत्‍यावश्‍यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्‍त वाहने व वैदयकीय कारणास्‍तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय राहील. सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्‍पो, ट्रेलर, ट्रॅक्‍टर इत्‍यादीसाठी संपूर्णतः बंद राहतील. तथापि, कोरोणा विषाणू प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे काम करणारे लातूर महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्‍य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्‍ट कर्मचारी व वाहने तसेच अत्‍यावश्‍यक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्‍या  आदेशानुसार वगळण्‍यात येत आहेत. तसेच अत्‍यावश्‍यक सेवा व वस्‍तु यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक सदरच्‍या आदेशातून वगळण्‍यात येत आहे. सर्व प्रकारचे बांधकाम / कंस्‍ट्रक्‍शनची कामे संपूर्णतः बंद राहतील तथापी ज्‍या बांधकामाच्‍या जागेवर कामगारांची निवास व्‍यवस्‍था (In-Situ construction) असेल तरच त्‍यांना काम सुरु ठेवता येईल.

          सर्व चित्रपटगृह, व्‍यायामशाळा,जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील.  मंगल कार्यालय, हॉल, लग्‍न समारंभ, स्‍वागत समारंभ संपूर्णतः बंद राहतील. या आदेशानुसार लागु करण्‍यात येत असलेल्‍या संचारबंदीच्‍या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) अनुज्ञेय असेल.  सामाजीक / राजकीय / क्रिडा / मनोरंजन / सांस्‍कृतीक / धार्मीक  कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील. धार्मीक स्‍थळे / सार्वजनिक प्रार्थनास्‍थळे संपूर्णतः बंद राहतील. लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

खालील अत्‍यावश्‍यक बाबी/ सेवा मर्यादीत स्‍वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील :-

सर्व किराणा दुकानाची ठोक विक्रेते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्‍यांना दुपारी 12.00 पर्यंत दुकान न उघडता घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल. दुध विक्री व वितरण सकाळी 10.00 वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील. तथापी दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल.  सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, पशुचिकित्‍सा सेवा त्‍यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील. सर्व रुग्‍णालये व रुग्‍णालयाशी निगडीत सेवा आस्‍थापना त्‍यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्‍णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्‍णांना आवश्‍यक सेवा नाकरणार नाही. अन्‍यथा संबंधित संस्‍था  कारवाईस पात्र राहील. ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्‍याबाबतअसलेली औषध विक्री दुकाने दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत 24 तास सुरु ठेवता येतील. इतर ठिकाणी असलेले मेडीकल दुकाने दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत सुरु ठेवता येतील.

          E-Commerce सेवा उदा. Amazon, Flipkart  व तत्‍सम सेवा ( अत्‍यावश्‍यक व इतर ) घरपोच सुरु  राहतील. सर्व मा. न्‍यायालये व राज्‍य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्‍थानिक संस्‍थेची कार्यालये शासन निर्देशानुसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील. शक्‍य  असल्‍यास Work from home चा पर्याय वापरण्‍यात यावा. शासकीय कर्मचा-यांसाठी आवश्‍यक पासची आवश्‍यकता राहणार नाही, तथापि स्‍वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्‍यक राहील.  पेट्रोलपंप व गॅसपंप सुरु राहतील. परंतु सदर ठिकाणी अत्‍यावश्‍यक सेवेतील (पोलीस, आरोग्‍य विभाग इतर शासकीय विभाग) वाहने, अत्‍यावश्‍यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने, अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारे खाजगी आस्‍थापनाचे ( घरगुती गॅस वितरक, पिण्‍याचे पाणी पुरविणारे, इत्‍यादी ) वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्‍यात येईल. स्‍वतःचे ओळखपत्र, गणवेश असणे आवश्‍यक राहील.  

          एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे.  सॉ-मील (लाकडाचे दुकान) केवळ स्‍मशानभुमीच्‍या बाजुला असेल तरच सुरु ठेवता येईल. इतर ठिकाणी बंद राहतील.   औदयोगीक व इतर वस्‍तुची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्‍यासाठी आवश्‍यक अशी स्‍थानिक, आंतरजिल्‍हा, आंतरराज्‍य वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहील. दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्‍यवस्‍था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 06.00 ते 09.00 या वेळेमध्‍येच अनुज्ञेय राहील. पाणीपुरवठा करणारे टॅंकरला नियमानुसार परवानगी राहील. संस्‍थात्‍मक अलगीकरण / विलगीकरण व कोव्हिड केअर सेंटर करता शासनाने ताब्‍यात घेतलेल्‍या व मान्‍यता दिलेल्‍या कार्यालयाच्‍या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील. सर्व राष्‍ट्रीयकृत व आरबीआयने मान्‍यता दिलेल्‍या बॅंका नियमानुसार किमान मनुष्‍यबळासह सुरु राहतील. बॅंकेच्‍या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील.

          संपूर्ण लातूर जिल्‍ह्यातील मा. न्‍यायालयाचे कर्मचारी, अधिकरी, मा. न्‍यायाधीश, वकील,शासकीय राज्‍य / केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्‍टर नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्‍यावश्‍यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे,खते, गॅस  वितरक,  पाणी पुरवठा,  आरोग्‍य व स्‍वच्‍छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिःसारण तसेच पूर्वपावसाळी  व पावसाळया दरम्‍यान करावयाची अत्‍यावश्‍यक कामे करणारे व विज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसुल विभागाचे कर्मचारी तसेच कंन्‍टेमेंट झोन करीता नियुक्‍त  कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्‍वतः करीता फक्‍त) वाहन वापरण्‍यास परवानगी राहील. या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्‍वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्‍वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. वाहन फक्‍त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्‍थेने दिलेल्‍या वेळेतच वापरता येईल. 

औषध व अन्‍न उत्‍पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उदयोग व त्‍याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील. बी-बियाणे, शेतीसाठी लागणारे औषधे, रस्‍सी, ताडपत्रीची दुकाने सकाळी 07.00 ते 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. अन्‍न प्रक्रिया (Food Processing) व शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उदयोग, कारखाने सुरु ठेवता येतील, मात्र कर्मचा-यांनी त्‍यांची ओळखपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्‍थापनांनी work from home  चा पर्याय वापरावा. अत्‍यावश्‍यक वाहनांना साहित्‍य पुरविणारे अॅटोमोबाईल्‍स, शेतीसाठीचे फवारणी यंत्र दुरुस्‍ती दुकाने यांना सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत आस्‍थापना सुरु ठेवता येतील. सर्व वेद्यकीय, व्‍यवसायीक, परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅम्‍बुलन्‍स यांना जिल्‍ह्यातर्गत वाहतुकीसाठी  परवानगी  राहील.  वाहनांचे अधिकृत सर्विंस सेंटर फक्‍त अत्‍यावश्‍यक सेवेतील वाहनांना (वैद्यकीय सेवेतील, पोलीस व इतर शासकीय यंत्रणेची वाहने) यांना सुविधा पुरवितील. त्‍यांच्‍या कर्मचा-यांना गणवेश व ओळखपत्र बंधनकारक राहील.

वृध्‍द व आजारी व्‍यक्‍तीकरीता नियुक्‍त केलेले मदतनीस यांच्‍या सेवा सरु राहतील. अंत्‍यविधीसाठी 20 व्‍यक्‍तींच्‍या उपस्थितीस परवानगी असेल. शेतीच्‍या मशागतीस मुभा असेल. मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. कामाच्‍या ठिकाणी शारीरिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. स्‍वस्‍त धान्‍य दुकाने सुरु राहतील. ज्‍याठिकाणी ग्राहकांना आत प्रवेश देवून खरेदी केली जाते अशी सुपर मार्केटस् (डी मार्ट, पुरुषोत्‍तम मार्केट, विश्‍व सुपर मार्केट, बिग बाझार इत्‍यादी) बंद राहतील. परंतु ऑनलाईन/दूरध्‍वनी वरुन प्राप्‍त ऑर्डरनुसार दुपारी 12.00 वाजेपर्यंत घरपोच साहित्‍य वितरीत करता येईल. घरपोच सेवा पुरविणा-या व्‍यक्‍तीस गणवेश व ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे. शिवभोजन थाळीचे उपहारगृह बंद राहतील.  अत्‍यावश्‍यक सेवेशी निगडीत नसलेले कारखाने/उद्योग कामाच्‍याठिकाणी मजुरांच्‍या राहण्‍याची व जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील.

पाणी पुरवठा (जार, टॅंकर) दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.  इंटरनेटसारख्‍या संपर्क साधनांसंबंधी सेवा पुरविणा-या संस्‍थांना त्‍यांच्‍या आस्‍थापना आवश्‍यकते नुसार सुरु ठेवता येईल.  सर्व ऑनलाईन सेवा पुरवणिारे CSC नियमानुसार अनुज्ञेय असलेल्‍या वेळेप्रमाणे सुरु राहतील. अत्‍यावश्‍यक सेवेतील संस्‍था ( CSC घरगुती गॅस वितरक, पेट्रोलपंप धारक इत्‍यादी ) यांना दैनिक व्‍यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्‍यवहारासाठी बॅकेत ये-जा करणेसाठी व व्‍यवहार करणेसाठी परवानगी असेल. बॅकेतील व्‍यवहारासाठी  ये-जा करणा-या व्‍यक्‍तीस संस्‍थेचा गणवेश अथवा ओळखपत्र किंवा आवश्‍यकतेनुसार दोन्‍ही बाबी बंधनकारक राहतील.

          या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न  करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. असेही आदेशात नमुद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या