शहरातील 263 कोरोनो कंटेन्टमेंट झोनचा ढिसाळ कारभार थांबेना !! मनपाचे दुर्लक्षः कंटेन्टमेंचा झोनचा उद्देश साध्य होत नसेल तर झोन उभारण्याचा फार्स कशासाठी ?





शहरातील 263 कोरोनो कंटेन्टमेंट झोनचा ढिसाळ कारभार थांबेना !!
मनपाचे दुर्लक्षः कंटेन्टमेंचा झोनचा उद्देश साध्य होत नसेल तर झोन उभारण्याचा फार्स कशासाठी ?

लातूर दि.24/07/2020
लातूर शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 263 कोरोना कंटेन्टमेंट झोन उभारलेले आहे. परंतु याकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे शहरातील कंटेन्टमेंट झोनचा ढिसाळ कारभार समोर आल्याचे वास्तव चित्र शहरातील विविध भागात दिसून येत आहे. कोरोनाबाबत मनपा गांभिर्याने घेत नसल्याने शहरातील बहतांश नागरिक कायम भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यावर कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर लातूर महानगरपालिकेच्या महापौर,उपमहापौरांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
देश, राज्याबरोबरच लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. त्या-त्या भागातील रूग्णांची संख्या नियंत्रणात रहावी यासाठी महानगरपालिकेच्यावतीने कोरोग्रस्त रूग्ण निघेल त्या भागात कंटेंन्टमेंट झोन उभारण्याचे काम महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात कंटेंन्टमेंट झोन उभारण्याचा दर्जा चांगला होता. परंतु, आता मात्र कुठल्याही लग्न समारंभाचे थातूर-मातूर टेंट उभारून रूग्णांची सेवा केल्याचे दाखविले जात आहे. परंतु, यामुळे कंटेंन्टमेंट झोनचा ढिसाळ कारभार समोर आला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाढती रूग्णसंख्या  लक्षात घेता लातूर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरांनी लातूरकरांच्या आरोग्यासाठी कंटेंन्टमेंट झोनचा दर्जा सुधारावा, अशी मागणी शंकरपुरम् नगर, मजगे नगर, माताजी नगर या भागातील नागरिकांतून केली जात आहे.
दर्जाच नसेल तर कंटेंन्टमेंट झोन उभारण्याची गरज काय?
शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्या वाढत आहे. पंरतु, रूग्णसंख्या कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कंटेंन्टमेंट झोनचा दर्जा कायम ठेवला जात नाही. त्यामुळे शंकरपुरम् नगर,मजगे नगर, माताजी नगर या भागातील नागरिकांनी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांच्याकडे समस्या मांडली असता त्यांनी या भागातील कंटेन्टमेंट झोनची पाहणी केली. दरम्यान त्यांना लातूर महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार दिसून आला. शहरात रूग्णसंख्या वाढत असताना त्यांची काळजी घेण्याऐवजी दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रूग्णांच्या आरोग्यासाठी उभारण्यात येणार्‍या कंटेंन्टमेंट झोनचा दर्जाच नसेल तर कंटेन्टमेंट झोन उभारण्याची गरज काय? असा सवाल भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी उपस्थित केला.
झोनच्या नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची गरज
कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. याला नियंत्रित ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडे आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची कमतरता आहे.परिणामी कंटेन्टमेंट झोनमधील नागरिक बाहेर ये-जा करीत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कंटेन्टमेंट झोन बाहेरील नागरिकांना भीतीच्या सावटाखाली रहावे लागत आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थाना कंत्राट देऊन कंटेंन्टमेंट झोनच्या नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी केली आहे.
-----



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या