*नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे*
*- पालकमंत्री सुभाष देसाई*
औरंगाबाद: (जिमाका) दि 7: औरंगाबाद शहर व वाळूज परिसरात १० ते १८ जुलैदरम्यान जनता कर्फ्यू (लॉकडाऊनची) जिल्हा प्रशासनाने घोषणा केली असून सर्व नागरिकांनी त्याची काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सखोल चर्चा करून १० ते १८ जुलैदरम्यान जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) करण्याची घोषणा केली आहे. या लॉकडाऊन दरम्यान, शहर व वाळूज परिसरात संचारबंदी असेल. या काळात सर्व उद्योग, कारखाने, दुकाने, आस्थापना बंद असतील.
सर्व रुग्णालये व रुग्णालयांशी संलग्न असणारी औषधाची दुकाने यादरम्यान सुरू राहतील. नागरिकांना जनता कर्फ्यू (लॉकडाऊनबाबत) चार दिवस आधीच पूर्वकल्पना दिल्यामुळे व बंदचा कालावधी हा केवळ ९ दिवसांचा असल्यामुळे हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी औरंगाबादच्या जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन करताना श्री. देसाई यांनी नाईलाज म्हणून तसेच रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊनच जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) करण्यात येत आहे असे सांगितले. या लॉकडाऊननंतर पुन्हा अशाप्रकारचा लॉकडाऊन होणार नाही हा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे .
बंद दरम्यान महापालिकेमार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याद्वारे अधिकाधिक रुग्ण शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाळूज व परिसरात सद्यस्थितीत सुरू असलेले सर्वेक्षण अधिक तीव्र करण्यात येईल, तरी यासाठी सर्वांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.