'डिझेलगाडी' मूल्यगर्भ बालकविता - डॉ.श्रीपाल सबनीस-पुणे.
शफी बोल्डेकर या ग्रामीण भागातील प्रतिभावंताचा ' "डिझेलगाडी " हा बालकवितासंग्रह मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहात स्वतंत्रपणे लक्ष वेधून घेणारा काव्यात्म पराक्रम ठरावा. " डिझेलगाडी " पुस्तकातील रंगीत चित्रे आणि बालकविता यांचा कलात्मक अनुबंध सर्वार्थाने सौंदर्यपूर्ण उतरलाय. मुखपृष्ठ आणि आतील सर्व निर्मिती आशय, कलासौंदर्य आणि कागदाची छपाईची गुणवत्ता या सर्वच दृष्टीने श्रीमंत आहे. पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत हिंदू - मुस्लीम मित्रांची नावे आहेत. कवी शफी बोल्डेकरांच्या सेक्युलर भूमिकेचा हा प्रारंभच मानता येतो.
कवी शफीला राष्ट्रीय महामानवाच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे. म्हणून तर छत्रपती शिवाजी, पंडित नेहरू, महात्मा गांधी, महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग .इत्यादी अनेक महापुरुषांच्या विचारांचा संस्कार या बालकवितेने आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने गोंदवून ठेवलाय. कर्मठ मुस्लीम प्रवृत्तीच्या संकुचित मानसिकतेतून मुक्त होऊनच विभिन्न धर्मप्रवाहातील नायकांची थोरवी कवी बोल्डेकराना शब्दबद्ध करता आली.
" तिरंगी झेंडा तीन रंगाचा,
त्याग ,शांती अन् समृध्दीचा'.
असा सार्थ गौरव राष्ट्राची अस्मिता असलेल्या तिरंगा झेंड्यासंदर्भात कवीने काव्यात्म केलाय. ' कुटुंब छोटे सुख मोठे ' सारखा आधुनिक सुविचार आणि बहुसांस्कृतिक राष्ट्रीयत्व याच बालसुलभ काव्यात्म अनुबंध कवी शफी यांनी कलात्मकतेने जुळवलाय.
कवीची धार्मिक सुसंवादाची परिपक्व जाणीव अनेक सूत्रांतून या बालकाव्यात अधोरेखित झालीय.
' हिंदू मुस्लीम बौध्द शिख
चार्ल्स बॅबेजचे संगणक शिक '
या रचनेतून सर्वधर्मीय मूल्यात्मकतेचा आदर आणि औदार्य पेरले जातेच , पण येणार्या सर्व नव्या पिढ्यांसाठी संगणकाचे ज्ञान गरजेचे आहे. याच व्यापक परिप्रेक्षात सम्राट अकबर , टिपू सुलतान, हुतात्मा कुर्बान हुसेन ते अब्दुल हमीद - अब्दुल कलाम यांच्या कतृत्वाचा सुगंध या बालकवितेत दरवळत राहतो. ही मालिका केवळ मुस्लीम महानायकाची नाही . याच मालिकेत सम्राट अशोकाची नोंद आहे. बाबासाहेब आंबेडकर , बुध्द, संत तुकाराम, रवींद्रनाथ टागोर, संत नामदेव, कुसुमाग्रज, वामनदादा अशा सांस्कृतिक मानदंडाच्या गौरवाचा संस्कार कवी बोल्डेकरांची बालकविता आनंदाने मिरवते. या बालकवितेला कोणत्याही मानव कल्याणकारी कलावंत प्रतिभावंताचा विटाळ नाही. म्हणून तर ही कविता सर्व जात-धर्मीय प्रवाहातील मानदंडात्मक कर्तृत्वाचा स्वीकार करते. या कविला ब्राम्हण- ब्राम्हणेतर वादाने ग्रासलेले नाही. हिंदूद्वेषाने पछाडलेले नाही. कवीच्या मनातच सर्व मानवतावादी संत - महंत - महापुरूषाचा आदर आहे. इतिहासात कुणाचेही वैर रुजलेले असो ! कवीची मनोभूमी सर्व दिशांनी येणाऱ्या मानवहितकारी सामर्थ्याची काव्यात्म पूजा बांधणारी आहे. शफी बोल्डेकरांची शब्दकळा बालमनाला मोहून टाकते.
" एक्सप्रेस आली बांधून बाशिंग,
दोन गाड्यांची होते क्रॉसिंग '
अशी लय व ठेका पेलणारी बालसुलभ रचना सर्वच वयोगटातील रसिकमनाला घायाळ करते. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचे मानदंड शफी बोल्डेकरांच्या बालकवितेत एकात्मतेचा प्रत्यय देऊन जातात. रानडे , गोखले, आगरकर या ब्राम्हण जातीत जन्मलेल्या सुधारकांना जातीच्या तुरूंगात बंदिस्त करणार्या ब्राम्हणेतर विद्वानांच्या सांस्कृतिक पापात शफी बोल्डेकर सामील होत नाहीत. त्यांनी भेदभाव न करता जात वजा करूनच या महापुरूषांना येणार्या बालकांच्या प्रत्येक पिढीच्या टप्प्यात गौरविले. " माय जिजाई" आणि कस्तुरबा गांधी या प्रातिनिधिक महिलांचा सन्मानही या बालकाव्यात करण्यात आलाय. आदर्श स्रित्वाचा यथोचित सन्मान करण्याचा संस्कार बालकांना उपयुक्तच आहे. त्याचप्रमाणे
" शरीर धड तर मन धड ,
वृक्ष जोपवा पिंपळ वड "
असे नव्या युगाचे नवे चिंतनही या बालकवितेचे अंतरंगात पेरले गेलेय.
" नद्या अडवून बांधलं धरण
दुतर्फा रस्त्याचे सुशोभीकरण "
अशा लोकोपयोगी भौतिकवादी शहाणपणाचा उपदेशही या बालकवितेचा अविभाज्य भाग बनलाय.
'मुली वाचवा, मुली शिकवा.'
चा सांस्कृतिक सामाजिक संदेश महात्मा फुल्यांच्या सत्यधर्माच्या आणि जागतिक स्तरावर स्रिशिक्षणाचे धैर्य सिध्द करणार्या मलालाच्या अर्थपूर्ण अनुबंधासह कवी बोल्डेकरांनी काव्यात्म केलाय. " संविधानाचे आम्ही सवंगडी " सारखी काव्यात्म रचना बालवयापासूनच राज्यघटनेच्या निष्ठेचे संस्कार करून जाते. त्यामुळे कवी शेख शफी बोल्डेकरांची बालकविता राष्ट्रवादाच्या बांधिलकीने स्वयंसिद्ध आहे. कवी शफी यांची इस्लामी श्रध्दा त्यांच्या जीवनात असणे स्वाभाविकच ! पण त्यांची बालकविता इस्लामच्या प्रभावातून मुक्त आहे. मुस्लीम म्हणून जीवन जगताना त्यांना बहुसंख्याक हिंदूचे शिव्याशाप इतर मुस्लिमांप्रमाणे झेलावे लागले असतील, पण त्याच कटुता या बालकाव्यात औषधालाही दिसत नाही. अर्थात कवी शफी यांना त्यांच्या मित्रांचा अनुभव धर्मापलीकडील आत्मीयतेचा असावा. म्हणून तर या काव्यरचनेत सर्व धर्माच्या सांस्कृतिक मूल्यांना कवटाळण्याचा कवीचा प्रयत्न दिसतो.
ताजमहाल, काश्मीर , कर्नाटकी पर्यटन, कुतुबमिनार, चारमिनार, माऊंट एव्हरेस्ट , मुंबई नगरी , अरबी समुद्र, मुळा - मुठा नद्या , नागपूर दीक्षाभूमी , वेरूळ लेणी, संस्कृत कवींचा नांदेड जिल्हा , देवगिरीचा दौलताबाद किल्ला, महानुभवांच्या आठवणींचा ग्रंथ लिळा असा सर्व धर्मपंथीय सांस्कृतिक संचिताचा खजिना शफी बोल्डेकरांच्या बालकाव्यात बालमनाला प्रेरणा देतो. सर्व भेदापलिकडे जाऊन प्रत्येक बालक या काव्यात रमतो. कारण ही सांस्कृतिकता शुध्द व सात्विक आहे. भारतीय संस्कृतीची विविधता एकात्म होऊन या काव्यात श्रीमंत व समृद्ध झालीय.
या कवितेला भारतीय परिप्रेक्ष अपुरा ठरतो. कारण मॅकमिलन,
डेम्लर , इगाॅर सिकोस्की, डेव्हिड बुशनेल या परदेशी तंत्रज्ञ व विद्वानासह वास्को द गामा , नील आर्मस्ट्राँग अशा जागतिक कीर्तीच्या महानायकांची थोरवी कवी शेख शफी बोल्डेकरांनी वस्तुनिष्ठपणे बालकांच्या मनाच्या अंगणात रुजवलीय.
इकोफ्रेंडली उपदेश, शौचालयाचा संदेश, सूफी पंथाची नीती, शेख महंमदाचा सत्संग अशा अनेक प्राचीन आधुनिक शहाणपणाचा संस्कार
मानवी नात्यांच्या अर्थपूर्णतेसह डिझेलगाडी मध्ये साकारला गेलाय . आदिम मानवता आणि अत्याधुनिक तात्विकता यांना पेलून नेत शफी बोल्डेकरांनी विवेकी संस्काराची डिझेलगाडी
नव्या पिढीपर्यंत आणून सोडलीय. बालसाहित्य प्रवाहातील ही क्रांतिकारक सांस्कृतिक असल्याने त्यांचे स्वागत व गौरव करणे कर्तव्य ठरते.
* डॉ. श्रीपाल सबनीस ,
फ्लॅट नं. २०२ , दुसरा मजला, पोस्ट ऑफिस बिल्डींग, सर्वे नं .६७७ , सदाशिव पेठ, कुमठेकर रोड , पुणे ४११०३०
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.