बहुजनांच्या शिक्षणावर बंदी असणारे रामराज्य आणि राममंदिर कोणाला हवे आहे? -- श्रीमंत कोकाटे

#प्रभू #रामचंद्र #की #जय !

                  एके दिवशी रामाच्या दरबारात एक ब्राह्मण हातात मयत झालेले स्वतःच्या लहान बाळाचे प्रेत घेऊन आला आणि रामाला मोठमोठ्याने ओरडून बोलू लागला "अरे रामा तुझ्या राज्यात अधर्म माजला, त्यामुळे माझ्या लहान मुलाचा मृत्यू झाला" चिडलेल्या ब्राह्मणाचा शोकमग्न आवाज ऐकून प्रभू रामचंद्र दरबारातून बाहेर आले आणि ते अत्यंत नम्रतेने त्या ब्राह्मणाच्या जवळ गेले. 

                   अत्यंत आदबीने प्रभू रामचंद्र कोपलेल्या ब्राह्मणाचे सांत्वन करु लागले. त्यांनी  अधोवदन होऊन अत्यंत विनयाने त्या ब्राह्मणाला शोकाचे कारण विचारले. तेव्हा आपल्या हातातील लहान बाळाचे प्रेत दाखवून तो बोलू लागला  "तुझ्या राज्यात एक शूद्र(ओबीसी,एसईबीसी) ज्ञानार्जन करू लागला, त्यामुळे माझा मुलगा मृत्यू पावला. हे ब्रह्महत्येचं पातक आहे. हा अधर्म आहे. रामा ज्ञानार्जन करणाऱ्या शूद्राला शिक्षा केल्याशिवाय माझा मुलगा जिवंत होणार नाही. ब्राह्मणांचे रक्षण करणे हा तुझा धर्म आहे"

                    तेव्हा प्रभू रामचंद्र धर्मरक्षणासाठी सैन्य घेऊन नगराच्या बाहेर पडले. कोणता शूद्र ज्ञानार्जन करून धर्म बुडवत आहे, त्याचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्राने जंग जंग पछाडले. सर्व दऱ्याखोऱ्यातुन जंगल तुडवत प्रभू रामचंद्राने सर्व राज्य पिंजून काढले. शेवटी त्यांना एका निबिड अरण्यात एक शंबुक  नावाचा  शूद्र एका घनदाट अरण्यात ज्ञानार्जन करत होता,हे दिसले. हे त्याचे कृत्य वर्णधर्मविरोधी होते. त्याच्या या ज्ञानार्जनमुळे रामाच्या राज्यातील ब्राह्मणाचा मुलगा मृत्युमुखी पडला होता.

                     त्या ब्राह्मणाच्या मुलाला जिवंत करण्यासाठी प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला आणि निबिड अरण्यात एकांतात ज्ञानार्जन करणाऱ्या शंबुकाचा शिरच्छेद केला. शंबुक मृत्युमुखी पडल्याबरोबर त्या ब्राह्मणाचा मुलगा एकदम जिवंत झाला.
                                               (संदर्भ-वाल्मिकी रामायण)

                     शुद्राने(ओबीसी) ज्ञानार्जन करणे म्हणजे अधर्म, हेच ते रामराज्य होते. बहुजन समाजाला शिक्षण,सत्ता यापासून वंचित ठेवणे,गुलाम बनविणे,ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवणे, हाच उदेश राम-रामायण-राममंदिर यामागे आहे.बहुजन शिकला तर ब्राह्मण मरतो, हे ब्रह्महत्येचे मोठे पातक आहे,त्यामुळे बहुजनांनी शिकायचेच नाही,ही अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या जनमानसात रुजविण्याचे अत्यंत क्रूर काम रामायण आणि त्यांच्या समर्थकांनी केलेले आहे. रामराज्यात शूद्रांची ही अवस्था तर अतिशूद्र तथा स्त्रियांची काय अवस्था होती, हे समजून घेण्यासाठी जागतिक कीर्तीचे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील लिखित रामायण-महाभारतातील वर्णसंघर्ष हा महत्त्वपूर्ण ग्रंथ जरूर वाचावा.

                बहुजनांच्या शिक्षणावर बंदी असणारे रामराज्य आणि राममंदिर कोणाला हवे आहे?

                                                        -- श्रीमंत कोकाटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या