प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा महापौरांनी घेतला आढावा
सर्व वयोगटातील आरोग्य तपासण्यांना गती देण्याची सूचना
विलगीकरण केंद्रांसाठी पर्यायी इमारतींची चाचपणी
लातूर /प्रतिनिधी:गेल्या काही दिवसात शहरात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आज बुधवारी ( दि.८ जुलै )पालिकेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. रुग्णसंख्या वाढत असल्याने संपर्कातील व्यक्तींची अधिक खोलात जाऊन तपासणी करावी,सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्य तपासण्यांना गती द्यावी आणि विलगीकरण केंद्रांसाठी जागा अपुरी पडू नये यासाठी नव्या इमारती ताब्यात घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, नगरसेविका रागिनीताई यादव यांच्यासह सहाय्यक आयुक्त आणि सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थिती होती. मागच्या आठवडाभराच्या कालावधीत शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीदेखील रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची अधिक खोलात जाऊन तपासणी करावी अशा सूचना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिल्या. रुग्णसंख्ये सोबतच संपर्कातील व्यक्तींची संख्याही वाढत जाते. त्यामुळे त्यांना विलगीकरण केंद्रात दाखल करणे आवश्यक ठरते.अशा व्यक्तींची संख्याही वाढत असल्याने विलगीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे.त्यासाठी पर्यायी इमारती ताब्यात घेऊन विलगीकरण केंद्र वाढवावेत, असे ते म्हणाले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांची तपासणी महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.घरोघर जाऊन पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनरद्वारे या तपासण्या केल्या जात आहेत. नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अथवा इतर रोग आहेत का? याची माहिती संकलित करून ती संगणकीय प्रणालीमध्ये संपादित केली जात आहे.यासाठी मनपाच्या आरोग्य सेविका, आशा सेविका आणि आरोग्य विभाग झोकून देऊन काम करत आहेत. आतापर्यंत तपासणीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून आता चौथी फेरी सुरू आहे. ही फेरी अधिक प्रभावीपणे पूर्ण करावी. सर्वेक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक साधने खरेदी करणे गरजेचे असेल तर ती तातडीने खरेदी करावीत,अशा सूचनाही महापौर गोजमगुंडे यांनी या बैठकीत बोलताना केल्या.
रुग्ण संख्या वाढू नये यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावेत. वेळोवेळी महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असेही ते म्हणाले.
या बैठकीस सहाय्यक आयुक्त सुंदर बोंदर,शैलजा डाके,मंजुषा गुरमे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.