लातुरात आता खाजगी रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार
लातुरातील दोन
रुग्णालयांचा पुढाकार
महापौर व उपमहापौरांनी
मानले आभार
लातूर/प्रतिनिधी:जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या आवाहनास प्रतिसाद देत लातुरातील खाजगी रुग्णालयांनी कोरोना बाधितांवर उपचार करण्यास सहमती दर्शवली असून शहरातील फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलमध्ये सोमवारपासून उपचार सुरू होणार आहेत. डॉ. भराटे यांच्या गायत्री हॉस्पिटलमध्येही लवकरच उपचारास सुरुवात होणार आहेत. उपचारासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलला भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
लातूर शहरात कोरोनाला अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात होते. तेथील उपचार सुरू असले तरी गतिमानता यावी तसेच कोरोना बाधित रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावेत आणि ते बरे व्हावेत यासाठी खाजगी रुग्णालयांनीही पुढाकार घ्यावा,असे आवाहन पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी नुकतेच केले होते. त्याला प्रतिसाद देत फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी संपूर्ण तयारी केली आहे.
सोमवारपासून या रुग्णालयात उपचार सुरू होणार आहेत. बनसोडे हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी सध्या १० बेड कार्यरत होणार असून टप्प्याटप्प्याने व गरजेनुसार त्यात वाढ केली जाणार आहे. कोरोना बाधित रुग्णांकरिता हॉस्पिटलमध्ये येण्याकरीता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून स्वतंत्रपणे आइसोलेशन वॉर्ड निर्माण करण्यात आली आहेत प्रत्येक रूम मध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा निर्माण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करणारे फुलाबाई बनसोडे हे लातूर शहरातील पहिले खाजगी रुग्णालय ठरले आहे.यामुळे शासकीय यंत्रणेवरील बराच ताण कमी होणार आहे.महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलला भेट देऊन तेथील तयारीची पाहणी केली.पालिका आयुक्त देविदास टेकाळे,उपायुक्त शशीमोहन नंदा हे देखील त्यांच्यासमवेत होते. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास सहमती देऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी केल्याबद्दल रुग्णालयाचे प्रमुख डॉ. गानू ,डॉ. राहुल सुळ, डॉ. राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महापौरांनी आभार व्यक्त केले. कोरोना लढ्यात सहकार्य करणाऱ्या फुलाबाई बनसोडे रुग्णालयास महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहाय्य करण्याची हमी यावेळी महापौरांनी दिली.
कोरोना विरुद्ध लढत असताना खाजगी रुग्णालयांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरणार आहे. या माध्यमातून रुग्णांना पर्याय उपलब्ध होणार असून नातेवाईकांची धावाधाव थांबणार आहे. शिवाय शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. डॉ.भराटे यांच्या गायत्री हॉस्पिटलमध्येही लवकरच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार आहेत. या रुग्णालयात सुरुवातीस ८ बेड कार्यरत होणार आहेत.शहरातील इतर खाजगी रुग्णालयांनीही कोरोना विरुद्धच्या या लढाईत सक्रिय सहभागी होऊन उपचारासाठी पुढे यावे. या रुग्णालयांना आवश्यक ती सर्व मदत प्रशासनाकडून केली जाईल, असे आवाहनही महापौर गोजमगुंडे यांनी याप्रसंगी बोलताना केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.