महापालिकेच्या सिटीबसचे रुग्णवाहिकेत रूपांतर कोरोना लढ्यात आता परिवहन विभागाचाही सहभाग महापौर, उपमहापौर व आयुक्तांकडून नव्या रुग्णवाहिकेची पाहणी






महापालिकेच्या सिटीबसचे रुग्णवाहिकेत रूपांतर 

कोरोना लढ्यात आता परिवहन विभागाचाही सहभाग 

महापौर, उपमहापौर व आयुक्तांकडून नव्या रुग्णवाहिकेची पाहणी

 लातूर/ प्रतिनिधी: कोरोना विरुद्धच्या लढाईत महापालिकेचा प्रत्येक विभाग आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहे.आरोग्य व स्वच्छता विभागाच्या बरोबरीनेच आता परिवहन विभागही या लढाईत उतरण्यासाठी सज्ज झाला असून पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार  पालिकेच्या सिटीबसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले आहे.या नव्या रुग्णवाहिकेची महापौर, उपमहापौर व आयुक्त यांनी पाहणी करून कार्यपद्धतीचा आढावा घेतला.
 लातूर शहरात पहिला कोरोना रुग्ण आढळल्यापासून महापालिका प्रशासन तत्परतेने आपली जबाबदारी ओळखून काम करत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला परिसर बंदिस्त करून त्या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणे, निर्जंतुकीकरण, आरोग्य विभागाच्या माध्यमातून घरोघर जाऊन तपासणी तसेच स्वच्छता विभागाकडून संपूर्ण शहर स्वच्छतेची कामे कुठलाही खंड न पडू देता केली जात आहेत. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अखंडपणे आपल्या कामात गुंतलेले असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जबाबदारी ओळखून कामे करत आहेत. प्रत्येक विभाग सक्षमपणे कार्यरत असताना आता परिवहन विभागही या लढाईत उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
 जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या सिटीबसचे रूपांतर रुग्णवाहिकेमध्ये करण्यात आले आहे. कोरोना संशयित व सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधित व्यक्तींची ने -आण करण्याचे काम या रुग्णवाहिकेतून केले जाणार आहे. त्यासाठी सिटीबसमध्ये आवश्यक ते बदल करून घेण्यात आले आहेत.
  महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त शशीमोहन नंदा यांच्यासमवेत या नव्या रुग्णवाहिकेची पाहणी केली. सिटीबसमध्ये करण्यात आलेले बदल समजावून घेतले आणि सिटीबस रुग्णवाहिका म्हणून कशी काम करेल याचा आढावा त्यांनी परिवहन विभागाकडून घेतला.
  महानगरपालिकेचा परिवहन विभाग आणि कर्मचारी सक्षम असून स्वतःची काळजी घेत ते आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्ष राहून पार पडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालिकेचे सर्वच विभाग आता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत झाले असून आगामी काही दिवसात याचे चांगले परिणाम दिसणार आहेत.शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता या लढाईत प्रशासनाला  सहकार्य करावे,असे आवाहनही महापौर गोजमगुंडे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या