मांजरा प्रकल्पातील प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून
शहरास सात दिवसाआड पाणी देण्याची चाचपणी करण्याचे महापौर, उपमहापौर यांचे आदेश
महापौर, उपमहापौर यांनी मांजरा धरणास भेट देवून केली पाहणी
लातूर/ प्रतिनिधी जुलै महिन्यातच लातूरकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यामुळे ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून शहरात ७ दिवसाआड पाणी देता येईल का यासाठी नियोजन आणि चाचपणी करण्याचे आदेश महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.
पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे.या पावसाने प्रकल्पातील पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे .परतीच्या पावसाने पाणीसाठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात यावर्षी जुलै महिन्यातच पाणी वाढू लागले आहे. प्रकल्प अद्यापही मृत साठ्यातच असला तरी उपलब्ध पाणीसाठा लातूरकरांना दिलासा देणारा आहे. लातूर,केज, कळंब यासारख्या मोठ्या शहरांना आणि लहान-मोठ्या शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या या प्रकल्पातील पाणीसाठा २७.९० दशलक्ष घनमीटर इतका झाला.
प्रकल्पात पाणीसाठा वाढल्यानंतर शहरातील नागरिकांना १० दिवसांच्या ऐवजी ७ दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने केला जाणार आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली .त्यानंतर शहराला सात दिवसाआड पाणी देता येते का? हे पाहण्यासाठी नियोजन आणि चाचपणी करण्याचे आदेश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले.७ दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रशासन नियोजन करत आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून लातूरकरांना सात दिवसाआड म्हणजेच आठवड्यातून एक वेळा पाणी देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले. एकेकाळी लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. ही बाब लक्षात घेता भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याची गळती रोखण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. उपलब्ध पाणीसाठा अधिकाधिक दिवस पुरावा यासोबतच शहरातील नागरिकांना गरजेनुसार, वेळेवर पाणी मिळावे असा आमचा प्रयत्न असल्याचेही महापौर गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी यावेळी म्हणाले.
पालिका प्रशासनाच्या नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळित आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जात आहे. आता सात दिवसांनी पाणी मिळाल्यास कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना कांही अंशी दिलासा मिळणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.