लातूरात आता घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस
घनकचरा व्यवस्थापनात अधिक सुलभता येणार
लातूर शहर महानगरपालिकेने आता घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस बसवले आहेत. या माध्यमातून घंटागाडी नेमकी कोठे आहे? ती थांबली आहे की रस्त्यावरून धावत आहे? यासह सर्व माहिती मोबाईलच्या साह्याने उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून महापालिकेने तंत्रज्ञानाच्या मदतीने घन घनकचरा व्यवस्थापनाकडे सक्षम पाऊल टाकले असून लवकरच शहरातील नागरिकांनाही या प्रणालीशी जोडून घेण्याचा मनोदय महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी व्यक्त केला. या व्यवस्थेमुळे अधिकाऱ्यांना कार्यालयातून घंटागाडी वर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असून मनपा च्याा वाहतूक व्यवस्थेवरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे तसेच नागरिकांना अधिक प्रभावी सुविधा देता येणार आहे.
लातूर शहर स्वच्छ,सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी कल्पक नियोजन राबवणाऱ्या महापालिकेने आता तंत्रज्ञानाच्या मदतीने एक पाऊल पुढे टाकले आहे.शहर व परिसरात दररोज जमा होणारा शेकडो टन कचरा महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने संकलित करून तो कचरा डेपोवर नेला जातो.पालिकेचा स्वच्छता विभाग हा उत्तम घनकचरा व्यवस्थापनासाठी ओळखला जातो. स्वच्छता विभागाच्या कामगिरीमुळेच लातूर शहर स्वच्छ व सुंदर व राहण्यासोबतच निरोगी राहण्यासही मदत होते. आता महापालिकेने तंत्रज्ञानाचा वापर करून
कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व पारदर्शक करण्यासाठी सर्व घंटागाड्यांना जीपीएस ट्रेकिंग डिव्हाइस बसवले आहेत.सॉफ्टवेअर व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता घंटागाड्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांना या प्रणालीत सामावून घेतले जाणार आहे. पुढच्या काळात शहरातील नागरिकांनाही या प्रणालीशी जोडून घेण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर घंटागाडी आपल्या परिसरात आल्याची माहिती नागरिकांना मोबाईल नोटिफिकेशनच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. शिवाय घंटागाडीचे काम कुठल्या ठिकाणापासून सुरू झाले? आता ती कुठे आहे? याचीदेखील माहिती नागरिकांना घर बसल्या मिळू शकणार आहे.
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या कामी तंत्रज्ञानाची मदत घेऊन ही कामे अधिकाधिक पारदर्शक करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे.मोबाईल ॲपच्या माध्यमातून घंटागाड्या कोठे आहेत? त्या आपल्या परिसरात केव्हा येणार आहेत किंवा आल्या आहेत याची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार असून त्यामुळे कचरा व्यवस्थापन पारदर्शक होण्यास मदत होणार असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांना लवकरात लवकर या प्रणालीशी जोडून घेण्यासाठी पालिका प्रशासन कार्यरत असल्याचेही ते म्हणाले. या उपक्रमामुळे घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून आपले लातूर शहर स्वच्छ,सुंदर आणि निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.