विवेकानंद रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार
४० खाटा आरक्षित
बाधितांवर उपचारांसाठी
टास्क फोर्सची स्थापना
लातूर/ प्रतिनिधी: केंद्र व राज्य शासनाकडून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या विवेकानंद रुग्णालयात आता कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र इमारत आणि ४० खाटा आरक्षित करण्यात आल्या असून रुग्णावर उपचार आणि त्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्राच्या अध्यक्षा अरुणा देवधर यांनी दिली.
सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या विवेकानंद रुग्णालयाने आतापर्यंत विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये दायित्व निभावले आहे. आता कोरोना आजाराच्या रूपाने राष्ट्रीय आपत्ती आलेली असताना रुग्णालयाने आपली जबाबदारी ओळखून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. यासाठी रुग्णालयातील कार्डियाक विभागाची संपूर्ण इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.शासनाच्या निर्देशानुसार कोविड पॉझिटिव्ह आणि सारी या आजारांची लक्षणे असणाऱ्या व बाधित असणाऱ्या रुग्णांवर येथे उपचार केले जात आहेत.
विवेकानंद रुग्णालयात बाधित रुग्णावर उपचारासाठी ४० बेड उपलब्ध असून अतिदक्षता विभाग आणि स्वतंत्र वॉर्डचीही सुविधा आहे.मंगळवारी उपचारास प्रारंभ झाला असून १२ रूग्ण येथे दाखल झाले आहेत.अतिशय वाजवी दरात रुग्णावर उपचार केले जात असल्याचेही देवधर यांनी सांगितले .
बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र इमारत असून त्या इमारतीत प्रवेशासाठी वेगळा रस्ता आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा इतर रुग्णांशी संपर्क येत नाही.बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी वापरले जाणारे पीपीई किट डोमिंग व डोपिंग करण्याची सुविधाही रुग्णालयात उपलब्ध आहे.कोरोना संदर्भात आवश्यक असणारी औषधे आणि साहित्य रुग्णालयाच्या औषधालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचार आणि त्यासंदर्भात देखरेख करण्यासाठी चेस्ट फिजिशियन डॉ. संतोष देशपांडे यांच्या नेतृत्वात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. रामदास बोकील,डॉ.सुरज धूत, डॉ. गिरीश पत्रिके,डॉ.ब्रिजमोहन झंवर,डॉ.गौरी कुलकर्णी हे या फोर्समध्ये असून सदस्य म्हणून सौ.अरुणा देवधर, प्रशासकीय अधिकारी अनिल अंधोरीकर,अजय कुलकर्णी व अनिल जवळेकर यांचा समावेश आहे. डॉ. राधेश्याम कुलकर्णी हे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत.
बाधित रुग्णावर उपचारा संदर्भात टास्क फोर्सची दररोज बैठक घेतली जात आहे.या बैठकीत चर्चा करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
कोरोना बाधित रुग्णावर उपचार करताना त्याचा इतरांशी संपर्क येऊ नये याची काळजी घेतली जाते.त्यामुळे बाधित रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयात प्रवेश दिला जात नाही. नातेवाईकांनी सहकार्य करावे.काही माहिती हवी असल्यास रुग्णालयाच्या स्वागत कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संतोष देशपांडे यांनी केले आहे.
विवेकानंद रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णावर उपचार केले जात असले तरी रूग्णालयातील इतर सर्व सुविधा सुरू आहेत.
कर्करोग, कार्डियाक विभाग, सिटीस्कॅन यासह दैनंदिन तपासण्या सुरू असल्याची माहिती नोडल ऑफिसर डॉ. राधेश्याम कुलकर्णी यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्ण आणि नातेवाईकांचे प्रवेशद्वारावरच स्क्रिनिंग केले जात आहे.पल्स ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करून आत प्रवेश दिला जात असल्याचे ते म्हणाले.सध्या संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला जात आहे. परंतु लवकरच विवेकानंद रुग्णालयात ॲंटीजेन तपासणी सुरु होणार असून या तपासणीचा अहवाल अर्ध्या तासात मिळतो
.त्यामुळे रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.
पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका,डॉ.गोपीकिशन भराडिया यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयाची वाटचाल सुरू आहे.
रुग्णांवर उपचार करून कोरोना हद्दपार करण्यासाठी डॉक्टर कटिबद्ध आहेत.नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे,असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.