नियमित वीज पुरवठ्यासाठी हिप्परसोगा ग्रामस्थांचे उपोषण
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
औसा/प्रतिनिधी: तालुक्यातील हिप्परसोगा येथील वीज पुरवठा दोन-अडीच महिन्यांपासून खंडित असल्याने ग्रामस्थ व शेतकरी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने ग्रामस्थांकडून उपोषण मागे घेण्यात आले.
हिप्परसोगा येथे दोन-अडीच महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित झालेला होता. वारंवार तक्रारी करूनही तो सुरळीत होत नव्हता. यासंदर्भात गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनी तसेच पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकार्यांना निवेदनही दिले होते.उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महावितरण कडून गावातील वीजपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला. परंतु तो अखंडित रहावा अशी मागणी करत बुधवार दिनांक 22 जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर उपोषण सुरू करण्यात आले. सरपंच कविता कांबळे,हेमंत पाटील, मदन सोमवंशी, विठ्ठल संपते,संभाजी यादव, सचिन पाटील,समाधान कांबळे, बापू शिंदे,अंगद गोरे,हनुमंत मंदाडे,तुकाराम सोमवंशी, बालाजी आळंदकर, मारुती चेवले,सुहास पाटील यांनी उपोषणात सहभाग घेतला.
यावेळी ग्रामस्थांनी लोदगा येथील कनिष्ठ अभियंता मुंडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकरी व ग्रामस्थांना पूर्ण दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा, ग्रामस्थांना रीडिंगनुसार वीजबिल द्यावे,शेतीसाठी असणाऱ्या डीपी दुरुस्त कराव्यात, गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी केबल टाकण्यात यावे,आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे. या मागण्यांची तात्काळ दखल घेत आगामी आठ दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन कनिष्ठ अभियंता मुंडे यांनी यावेळी दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.