महापालिकेच्या वतीने लातुरात अतिरिक्त विलगीकरण केंद्र शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्तीगृहात १५० व्यक्तींची व्यवस्था





महापालिकेच्या वतीने लातुरात अतिरिक्त विलगीकरण केंद्र 

शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्तीगृहात १५० व्यक्तींची व्यवस्था 

लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने औसा रोड येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात अतिरिक्त विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी दीडशे व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व आयुक्त देविदास टेकाळे यांनी दिली.
 लातूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व आजाराचा वाढता प्रसार पाहता अतिरिक्त सुविधा उपलब्ध करण्याची गरज होती.
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनीही नागरिकांना अधिक सोयी उपलब्ध करण्याच्या हेतूने विलगीकरण केंद्र वाढवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने हे अतिरिक्त विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात दीडशे व्यक्ती राहू शकतील अशी व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. कोरोना संशयित तसेच बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना याठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
  येथे राहणाऱ्या सर्व व्यक्तींना दोन वेळचे जेवण, एक वेळ नाश्ता व दोन वेळा काढा देण्याची सोय आहे. प्रत्येक रूमसाठी स्वच्छतागृह आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विलगीकरण केंद्राच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या विलगीकरण केंद्रासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली असल्याची माहितीही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
   लातूर शहरात यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन परिसरातील समाज कल्याण वसतिगृह येथे २०० व्यक्तींच्या विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. गरज पडली तर आणखी विलगीकरण केंद्र वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात येणाऱ्या नागरिकांना सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.bविलगीकरण केंद्राच्या परिसरातील वातावरण प्रसन्न रहावे, परिसरात स्वच्छता रहावी  तसेच तेथील नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य योग्य राहील याची खात्री केली जात असल्याचेही महापौर गोजमगुंडे म्हणाले.
  हे केंद्र कार्यान्वीत करण्यात आले असून काही व्यक्तींना तेथे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या