हिंगोली जिला बातमी कोरोना : नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी · नागरिकांची अँटीजेन टेस्टद्वारे होणार तपासणी

कोरोना : नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी   - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
·   नागरिकांची अँटीजेन टेस्टद्वारे होणार तपासणी
 
हिंगोली,दि.21: मागील तीन ते चार दिवसात जिल्ह्यात कोवीड-19 ने बाधीत झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना आता जास्त सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
आरोग्याच्या बाबतीत कुणालाही सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास इतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास नागरिकांनी घरच्या-घरी उपचार न करता तात्काळ नजीकच्या रुग्णालयात जावून आपली तपासणी करुन उपचार घ्यावेत. कारण सद्यस्थितीत सर्वत्र कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. याकरीता नागरिकांनी आपली तसेच आपल्या कुंटूंबाची आणि पर्यायाने समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याची आता खरी गरज आहे. जिल्हा प्रशासनाने अँटीजेन टेस्टचे नियोजन केले असून आता जिल्ह्यातील नागरिकांची याद्वारे तपासणी होणार आहे. या टेस्टद्वारे बाधीत निघणारे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तात्काळ उपचार देण्यास प्रशासनास मदत होणार आहे. ज्या नागरिकांना आरोग्य संबंधी काही त्रास जाणवत असल्यास नागरिकांनी तात्काळ अँटीजेन टेस्टद्वारे आपली आरोग्याची तपासणी करुन घ्यावी. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकांनी आपल्या आरोग्य संबंधीची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्यास तसेच घराबाहेर पडतांना मास्कचा वापर न केल्यास संबंधीता विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरानामुळे मृत्यू झालेल्यांपैकी एक रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी असल्याने कोरोनाचा संसर्ग हा ग्रामीण भागापर्यंत पोहचल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरील जिल्ह्यात किंवा गावात जाण्याचे टाळावे. तसेच कोणत्याही नातेवाईकांच्या घरी जावू नये किंवा कुणास आपल्या घरी येवू देवू नये. याबरोबरच लग्न संभारंभात किंवा इतर कार्यक्रमात देखील सहभागी होवू नये. कारण यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांनी स्वत:हून क्वारंटाईन व्हावे. जिल्ह्यात संचारबंदी शिथील केल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर पडतांना मास्कचा वापर करत नाही. तसेच बाजार आणि भाजीमंडीमध्ये सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी न घेतल्यास येणाऱ्या कालावधीत कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या नियमाचे पालन करुन आपले, आपल्या कुंटूंबाचे आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****

कोरोनावर नियंत्रणासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची-पालकमंत्री वषार्ताई गायकवाड
 
हिंगोली,दि.21 : कोरोनाशी लढा देताना शासकीय यंत्रणा कठोर मेहनत घेत आहेत. मात्र तरीही आता रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. या परिस्थितीत नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे अतिशय गरजेचे आहे. शासकीय यंत्रणांच्या सूचनांचा आदर करून जनतेने स्वत: व कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.       
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर वळणावर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे. मुळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेरच पडू नका. सर्वांनी एकत्रित व प्रामाणिक प्रयत्न केले तर कोरोना आटोक्यात येवू शकतो. हिंगोलीत अजूनही परिस्थिती चांगली आहे. मात्र ती हाताबाहेर न जाण्यासाठी शासन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परजिल्ह्यातून येणाºया प्रत्येकाने शासकीय क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. शिवाय कोरोनासदृश्य लक्षणे दिसून येत असल्यास तातडीने नजीकच्या शासकीय संस्थेत दाखल व्हा. आरोग्य यंत्रणा आपल्या सोयीसाठी तत्पर असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.  या आजाराची लागण एका व्यक्तीला झाल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होऊ शकते त्यामुळे आपले कुटुंब, परिसर, शहर-गाव सुरक्षित ठेवणे हीसुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे. वेळीच गांभीर्य ओळखा. कुणीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नका. कुठलीही अडचण आल्यास प्रशासनाने विविध हेल्पलाईन नंबर प्रसारित केले आहेत त्यावर संपर्क करा. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्ह्यात विविध पथक नियुक्त करण्यात आले असून अडचण आल्यास त्यांच्याशी  संपर्क साधा. आपणही दक्षता घ्या, इतरांनाही सुरक्षित करा, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री वषार्ताई गायकवाड यांनी केले आहे.
******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या