मराठवाड्याचे सुप्रसिद्ध शायर शम्स जालनवी यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. उर्दू अदब आणि शायरी विश्वासाठी हा दुःखद प्रसंग आहे.




मराठवाड्याचे सुप्रसिद्ध शायर शम्स जालनवी यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. उर्दू अदब आणि शायरी विश्वासाठी हा दुःखद प्रसंग आहे. 
जालनवी समाजवादी शायर मानले जातात. मराठवाडा जशी संतांची भूमी आहे. तसेच ती साहित्यिक व कवींची व शायरांची भूमी आहे. येथे अनेक प्रसिद्ध व प्रतिभाशाली शायर होऊन गेलेले आहेत.
शम्स जालनवी मराठवाड्यातील त्या प्रतिभावंत शायरांच्या यादीमध्ये अग्रस्थानी होते. १९२९ला जन्मलेले शमसुद्दीन मराठवाड्यातील जालनाचे रहिवासी होते.
वयाच्या पंधरा वर्षापासून ते शायरी व गजल लेखन करायचे. उर्दू अदब, शायरी यांच्यावर होत असलेल्या चर्चा आणि गप्पांमधून ते घडत गेले. लिहू लागल्यापासून त्यांनी मुशायरामध्ये सादरीकरण सुरू केले.
शम्स जालनवी आपल्या सादरीकरणाच्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध होते. मुशायरामध्ये त्यांची तरन्नुम ऐकून श्रोते मंत्रमुग्ध होत. बशर नवाज म्हणतात त्याप्रमाणे, शायरी ही समाजाचा आरसा असते; या कथनानुसार जालनवी यांची शायरी होती.   समाजातील विविध आयाम त्यांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून रेखांकित केलेले आहेत. त्यांच्या शायरीत गल्लीच्या गप्पा पासून अमेरिकेपर्यंतचा राजकारण, गरिबी, उपासमार हलाखी, अस्वस्थता, बेरोजगारी, तिरस्कार, नैराश्य इत्यादी  घटक सातत्याने येत.
जालनवी अत्यंत साधं आयुष्य जगले. शेवटपर्यंत हलाखीची परिस्थिती मात्र काही बदलली नाही. साहित्य परिषद, शासकीय अस्थापना व विविध संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवले. त्यांच्या शायरीला देशभरातून मागणी असायची. गावाच्या मैफलीपासून देश पातळीवर ते मुशायरासाठी जात. अल्पशा मानधनावर त्यांची गुजराण चाले. 
आपला मूळ व्यवसाय बंद झाल्याने उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्यांनी पेपर वाटण्याचे काम सुरू केले.
वयाच्या चाळिशीत त्यांना ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे पेपर वाटण्याची वेळ आली. सत्तरीच्या वयातही अगदी हात थरथरताना ते सायकलीवर बसून शहरभरात पेपर वाटायचे.
रोज सकाळी साडेचारला उठून दुपारपर्यंत ते शहरभर पेपर वाटत. त्यांचा हा दिनक्रम अगदी थकलेल्या अवस्थेतही अनेक दिवस चालू होता. 
शम्स जालनवी भरभरून जगले. व्यक्तिगत नातेसंबंध विकसित करणारा हा व्यक्ती प्रचंड संवादी होता. हसत खेळत व चेष्टा करत संवाद साधण्याची त्यांची लकब होती अगदी कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ते सहजपणे बोलायचे व त्यांच्याशी तेवढ्याच आत्मीयतेने संवाद साधायचे.
अशा प्रतिभावंत शायर, कवी व व्यक्ती असलेल्या शम्स जालनवी यांना भावपूर्ण श्रध्दांजली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या