शिक्षकांचे डिजिटल कौशल्य विकसित करण्यासाठी व्हिडीओ सीरिज
रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचा उपक्रम
लातूर /प्रतिनिधी :कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षण गरजेचे झाले आहे. याकाळात स्मार्ट टीचिंगसाठी शिक्षकांना उपयोगी ठरणारी कौशल्य आत्मसात करण्यासाठी रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ अंतर्गत रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन मदत करणार आहे. क्लबच्या वतीने १५ डिजिटल कौशल्यांची व्हिडीओ सीरिज सुरू करण्यात येत असून जवळपास ७०० शिक्षकांना याचा लाभ होणार आहे.
कोरोनामुळे शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येत नाही.त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा एकमेव पर्याय शिल्लक आहे.यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनने १५ डिजिटल स्किल्स फॉर स्मार्ट टीचिंग हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाच दिवसांच्या या मोफत उपक्रमातून आवश्यक असणारी कौशल्य व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांना सांगितली जाणार आहेत. प्रत्येक कौशल्याचा एक स्वतंत्र व्हिडीओ पाठवला जाणार आहे. त्यावर आधारित काही प्रश्नही सोबत पाठवले जातील.दुसऱ्या दिवशी त्या प्रश्नांची उत्तरे देणारा एक व्हिडीओ,नवीन कौशल्याचा एक व्हिडीओ आणि त्यावरील प्रश्न पाठवले जातील.
शिक्षकांना सहजतेने आणि कमी वेळात डिजिटली सक्षम करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनने हा उपक्रम हाती घेतला आहे. 'कृतीतून शिका' या संकल्पनेतून ही व्हिडिओची मालिका व्हाट्सअप वरून प्रसारित केली जाणार आहे.पाच दिवसांच्या या सीरिजनंतर सहावा दिवस सरावाचा असेल.सातव्या दिवशी एक चाचणी घेतली जाणार असून शिक्षकांना सहभागाचे प्रमाणपत्र ई मेलवरून पाठवले जाणार आहे.
मंगळवार दि.१४ जुलै रोजी या उपक्रमास प्रारंभ होणार आहे. आतापर्यंत ६३५ शिक्षकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यात सहभागी होऊन शिक्षकांनी आपले सहकारी आणि विद्यार्थ्यांसाठी याचा उपयोग करावा,असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन अविनाश भोसले, लिटरसी डायरेक्टर जगदीश कुलकर्णी,अध्यक्ष अनुप देवणीकर,सचिव रविंद्र बनकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सतिष सातपुते यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.