आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक निर्णय
पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक सत्रास प्रारंभ होणार
नाशिकः (दि. 21) –
आरोग्य शिक्षणाचे पदवीपूर्व विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्रास प्रारंभ करणेबाबत विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.श्री. अमित देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्राबाबत विचारविनीमय व सवितस्तर चर्चा करणेसाठी मा. वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. श्री. अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीस विद्यापीठाचे मा.कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ.मोहन खामगांवकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आयुष विभागाचे संचालक वैद्य कुलदीप राज कोहली, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.ना.श्री. अमित देशमुख यांनी सांगितले की, कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव पहाता तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरु करण्यात यावे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भावामुळे शक्य नसल्यास ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने वर्ग घेण्यात यावेत याबाबत विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना सूचीत करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करणे अन्य शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाचे प्रति-कुलपती यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाकडून त्वरीत कार्यवाही करण्यात येईल. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिध्द करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अफवा व खोट्या बातम्या व माहितीपासून सजग रहावे असे त्यानी सांगितले.
शिक्षक, पालक, विद्यार्थी व सर्वांनी कोव्हिड-19 करीता शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी केले आहे. परीक्षेसंदर्भात अधिक माहिती विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल त्यानुसार अनुपालन करावे असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.