७५ मृतदेहांवर महापालिका कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
धर्माच्या चालीरीतीनुसार
होतो अंत्यविधी
आठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
लातूर/ प्रतिनिधी: कोरोना संकटाच्या काळात जिवंत व्यक्तीलाही स्पर्श करण्यास कोणी तयार नाही परंतु अशा स्थितीत कोरोना संशयित आणि कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांवर त्या-त्या धर्माच्या चालीरीतीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे काम महापालिकेच्यावतीने केले जात आहे. गेल्या काही दिवसात अशा ७५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम पालिकेच्या ८ बहाद्दर कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने पार पाडले आहे.
कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांना दिला जात नाही. अशावेळी लातूर येथे निधन झालेल्या कोणत्याही कोरोना व्यक्ती वर अंत्यसंस्कार करिता महापालिकेकडून ही जबाबदारी पार पाडली जात आहे.
अंत्यसंस्काराचा सर्व खर्च महापालिकेच्यावतीने केला जात आहे.
कोरोना बाधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवले जाते. त्याच पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खाजगी रुग्णालय येथे त्याच्यावर उपचारही होतात. दुर्दैवाने उपचारादरम्यान एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचे निधन झाले तर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जाते. मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला तर त्यातून आणखी लागण होण्याची भीती असल्याने मृतदेह कुटुंबियांना दिला जात नाही. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील दोन व्यक्तींच्या समक्ष अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला जातो. मरण पावलेला व्यक्ती ज्या समाजातील असेल,ज्या धर्माचा असेल त्या धर्माच्या चालीरिती नुसार पालिकेकडून अंत्यसंस्काराचा विधी केला जातो. यासाठी लागणारा संपूर्ण खर्च पालिका प्रशासन करते. महापालिकेच्यावतीने आजपर्यंत ७५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ मोरे व सुरेश कांबळे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी मुकिंद सरवदे, विलास सुरवसे, सचिन बनसोडे, भीमा टेंकाळे, गौतम गायकवाड आणि चालक राजू सोंट हे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
याबाबत माहिती देताना महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले की,आजपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ७५ पैकी बहुतांश रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते तर काही संशयितांचा मृत्यू झालेला होता. या सर्वांवर पालिकेच्या या आठ कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.
या सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या वतीने सुरक्षेची साधने पुरविली जातात. पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर आणि इतर आवश्यक वस्तूंचा त्यात समावेश आहे.
कोरोना संकटाच्या काळात मानवतेच्या भूमिकेतून पालिका आपली जबाबदारी पार पाडत आहे. कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कार्याला तोड नसल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी म्हटले आहे.
चौकट
गॅस दहिनीचाही लवकरच वापर करण्यात येणार.
कोरोना बाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत असताना अधिक खबरदारीच्या उपाययोजना बघण्याकरिता गॅस धाहिणी ही वापरात आणण्यात येत आहे. खासगी सस्थेच्या अखत्यारीत असलेली गॅस दाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. आवश्यक प्रसंगी अग्निसंस्कार ऐवजी गॅस दाहिणी च्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.